सध्याची तरुणाई फेसबुक, इंटरनेट आणि मोबाइलमध्ये अडकून पडली आहे असे म्हटले जात असले तरी हे विधान तितकेसे खरे नाही. दुर्गम, आदिवासी भागांतील प्रकल्प पाहण्यासाठी तरुणाईचे जथ्थेच्या जथ्थे येत असतात. त्यामुळे तरुणाईचे सामाजिक भान कायम आहे, असे प्रतिपादन मॅगसेस पुरस्कार विजेचे डॉ. प्रकाश आमटे यांनी आगरी महोत्सवात केले. अशा हरहुन्नरी तरुणांची आमच्या सामाजिक कार्याला गरज आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. प्रकाश व मंदाकिनी आपटे यांची मुलाखत विद्याधर रिसबूड यांनी घेतली. डॉ. आमटे म्हणाले, आदिवासी मुले ही काटक, शूर असतात. अनेक क्रीडास्पर्धामध्ये ही मुले आघाडीवर असतात. या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते देशाचे नाव जगाच्या पातळीवर उज्ज्वल करतील. आताची तरुण पिढी मोबाइलमध्ये अडकून पडली आहे, असे म्हटले जात असले तरी आदिवासी भागातील आमच्या प्रकल्पांना भेटी देण्यासाठी सर्वाधिक तरुण येत असतात. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. अशा कार्याची आवड असणाऱ्या तरुणांनी आमच्या प्रकल्पात यावे. दोन वर्षे सेवाभावी काम करावे. आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे, असे आवाहनही डॉ. आमटे यांनी या वेळी केले. शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यामुळे एकीकडे अलोट पैसा तर दुसरीकडे एक वेळचे अन्न मिळत नाही, असे विदारक चित्र आदिवासी भागात आहे. शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्यक्ष आदिवासीपर्यंत पोहोचत नाहीत, अशी खंत आमटे यांनी व्यक्त केली. या वेळी आगरी युथ फोरमतर्फे आमटे यांच्या प्रकल्पाला २५ हजारांचा व विनायक पाटील यांनी ५० हजारांचा धनादेश दिला.
आगरी महोत्सवाचा शेवटचा दिवस..
आगरी महोत्सवाचा बुधवारी शेवटचा दिवस असून सायंकाळी सात वाजता ‘आर्थिक नियोजन’ या विषयावर चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान मुख्य व्यासपीठावर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा