छाप्रुनगरातील दंतरोगतज्ज्ञ डॉ. मुकेश चांडक यांचा आठ वषार्ंचा मुलगा युगचे अपहरण करून निर्घृण खून केल्याच्या घटनेने संपूर्ण समाजातच तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच डॉक्टरांचा आपल्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांशी योग्य सुसंवाद असला पाहिजे, गुन्हेगारी वृत्तीच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवू नये, त्यांच्याशी प्रेमाने वागावे, असा सूर उमटू लागला आहे. कुणी दुखावणार नाही, याची काळजी स्वत:च घ्यावी, अशी आत्मचिंतनपर प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच कुणावर विश्वास ठेवावा, असा प्रश्नही या घटनेने निर्माण झाला आहे.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, लोकांचा संयम लवकरच सुटत आहे. क्षुल्लक कारणावरून राग येतो. त्यावरून भांडणे होतात. त्यामुळे डॉक्टरांनीच नव्हे तर समाजातील नागरिकांनी इतरांशी बोलताना भान ठेवायला पाहिजे. कुणाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. अनेक डॉक्टर्स-कर्मचारी ठेवताना त्याची पाश्र्वभूमी बघत नाही. यापुढे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती ठेवणे आवश्यक झाले आहे. त्याबरोबरच कर्मचाऱ्यांशी योग्य संवाद साधावा. कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढताना त्याला सन्मानाने निरोप द्या. युग चांडकची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत व्यक्त करून प्रत्येकानेच आता सावध राहण्याची वेळ आली आहे, अशी भावना अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विराज शिंगाडे यांनी व्यक्त केली. कर्मचाऱ्याला रुग्णालयात कामावर ठेवताना त्याचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती तपासून घेतली पाहिजे. माझ्या रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांशी योग्य संवाद साधून त्यांच्याकडून कामे करवून घेतो. प्रत्येक गोष्ट समजाऊन सांगतो. शक्यतो अनोळखी व्यक्तीला कामावर ठेवू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सध्या सामाजिक व्यवस्था ढासळून गेली आहे. सायकलचा धक्का लागल्यावरून खून झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे कुणाच्या मनात नेमके काय आहे, हे सांगता येत नसल्याचे मत आयएमएचे सचिव डॉ. कुश झुनझुनवाला यांनी व्यक्त केले. ९० टक्के डॉक्टर्स कर्मचाऱ्यांची पाश्र्वभूमी न तपासता त्यांना कामावर ठेवतात. या घटनेने कर्मचाऱ्यांचा इतिहास गोळा करणे आवश्यक झाले आहे. आपण चांगले वागलो तर प्रत्युत्तरही चांगलेच मिळेल. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत अपमानास्पद वागू नये, वाईट शब्दांचा प्रयोग करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. चांगला कोण आणि वाईट कोण, हेच शोधणे सर्वात कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे प्रत्येकावरच विशास ठेवावा लागत असल्याची प्रतिक्रिया बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद माने यांनी व्यक्त केली.
डॉ. माने म्हणाले, आरोग्य क्षेत्रात कर्मचारी मोठय़ा मुश्किलीने मिळतात. त्यातच कौशल्य नसलेली मुलेही ठेवावी लागतात. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हातीच अर्थव्यवहार असतो. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. या घटनेने मात्र डॉक्टरांनी सजग राहणे आवश्यक झाले आहे. कर्मचारी ठेवताना तो कुठल्या भागातील रहिवासी आहे, तो काय करतो, त्याचे संबंध गुन्हेगारी क्षेत्राशी आहे काय, याची संपूर्ण माहिती गोळा करावी. त्याची एक प्रत सबंधित पोलीस ठाण्यात द्यावी. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या तरुणांना कामावर ठेवूच नये, असेही ते म्हणाले.
हॉस्पिटलमध्ये कामावर ठेवताना कर्मचाऱ्यांची पाश्र्वभूमीच तपासली जात नाही. त्यामुळे कालचा प्रकार घडला, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव मोहता यांनी व्यक्त केले. या घटनेने मात्र शहरातील डॉक्टरांचे डोळे उघडले आहे. हॉस्पिटलमध्ये कामावर ठेवताना कर्मचाऱ्यांची पाश्र्वभूमी माहिती असणे आवश्यक झाले आहे. बरेच कर्मचारी तीन-चार महिने एका रुग्णालयात, नंतर तीन-चार महिने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याप्रमाणेच आणि मालकाने मालकाप्रमाणेच वागले पाहिजे. प्रत्येकांनी आपले कर्तव्य काय आहे, हे जाणून घेतले तर संघर्षांचे प्रकार घडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करून युग चांडकच्या हत्येविषयी अत्यंत दुख होत असल्याचे डॉ. मोहता यांनी सांगितले.

Story img Loader