आठ वर्षांचा युग चांडक याच्या अमानुष हत्येने अवघे समाजमन सुन्न झाले. मध्यरात्रीपासून बुधवारी दुपारी त्याच्या अंत्ययात्रेपर्यंत जमलेल्या जमावातील प्रत्येकजण झाल्या घटनेप्रति त्याची भावना व्यक्त करीत होता. त्यात संतापही होता आणि युगविषयीची सहानुभूतीही होती.
बुधवारी सकाळपासूनच युगच्या छाप्रूनगरातील निवासस्थानी नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. नागरिक व त्यांच्या वाहनांची गर्दी झाल्याने सेंट्रल अॅव्हेन्यू तसेच जुना भंडारा रोड या दरम्यानच्या रस्त्यावर पोलिसांना कठडे लावावे लागले. गुरु वंदना अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर डॉ. मुकेश चांडक राहतात. त्यांना भेटायला येणाऱ्यांची गर्दी वाढू लागल्याने दुपारी बारा वाजताच्या सुमारास मुकेश, त्यांची पत्नी, आई-वडील व इतर कुटुंबीय खाली आले. झाल्या घटनेने चांडक कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे कुणाशीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत ते नव्हते. बाहेर जमलेल्या गर्दीत काही लोक संतापाने पण दबक्या आवाजात बोलत होते. लकडगंज, इतवारी परिसरातून अंत्ययात्रा काढण्याचा त्यांचा आग्रह होता. मात्र, ज्येष्ठ त्यांना शांत राहण्याविषयी समजावत होते. संताप व्यक्त करण्यापेक्षा झाल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला गेला.
दुपारी १.५० वाजता युगचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आणण्यात आला. केवळ दहा मिनिटे तो कुटुंबीयांच्या अंत्यदर्शनासाठी अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आला. दोन वाजता युगची अंत्ययात्रा निघाली तेव्हा मुकेश व चांडक कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. इमारतीत राहणाऱ्या इतर कुटुंबातील सदस्य तसेच युगचे सवंगडी यांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध थांबत नव्हता. लहान मुले व त्यांच्या पालकांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा पाहून इतर उपस्थित हजारो नागरिकांना शोकावेग आवरला नाही. रस्त्यावर हजारो महिला-पुरुष व तरुण तर आजूबाजूंच्या इमारतींच्या गॅलरी व गच्चींवर नागरिकांची गर्दी होती. इमारतीपुढे गणवेशातील पोलीस नव्हते. मात्र, साध्या वेषातील पोलीस मोठय़ा संख्येने तैनात होते. दूर अंतरावर तसेच सेंट्रल अॅव्हेन्यूवर तसेच गंगाबाई घाटात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
मंगळवारी मध्यरात्री आठ वर्षांच्या निष्पाप युगची अमानुष हत्या झाल्याचे समजताच अवघे समाजमन सुन्न झाले. मेयो रुग्णालयात त्याचे पार्थिव आणण्यात आल्याचे समजताच तेथे नागरिकांची गर्दी झाली. रुग्णालय परिसर असल्याने पोलिसांनी सूचना देऊनही जमाव न हटल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. हा जमाव लकडगंज पोलीस ठाण्यापुढे आला. आरोपींना ताब्यात देण्याची मागणी करू लागला. त्यासाठी रस्त्यावर टायरची जाळपोळ सुरू झाली. कुणीतरी दगड भिरकावल्याने पोलिसांनी लाठीमार केला. नंतर जमाव चांडक यांच्या इमारतीपुढे गोळा झाला. तेथेही पोलिसांनी लाठीमार केला.
दरम्यान, राजेश उर्फ राजू डवारे व अभिलाषसिंह या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता. विविध पैलू तपासताना मंगळवारी डॉ. मुकेश चांडक यांनी रुग्णालयातील दोनजणांना काढून टाकले असल्याचे समजले. त्यांनी तेथे तपास केंद्रित केला. विद्यमान व माजी कर्मचाऱ्यांना लकडगंज ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. दुपारी इतर काही गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यात राजेशचा समावेश होता. यासर्वानीच घटनेशी संबंध नसल्याचे पोलिसांना सांगितले. सायंकाळी मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री पोलिसांनी आरोपी राजेशला पोलिसी हिसका दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. त्याला पोलीस घटनास्थळी गेले. शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील एका पुलाखाली युगचा मृतदेह आढळला. त्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचले होते. नाका-तोंडात रेती व चिखल होता. गुदमरून त्याचा मृत्यू झाला असण्याची शंका पोलिसांना आली. त्यानंतर अभिलाषसिंह याला पोलिसांनी अटक केली. या दोघांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता यात आणखी दोघे सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून सायंकाळपर्यंत ते हाती लागले नव्हते. राजेश व अभिलाष या दोघांना लकडगंज पोलिसांनी दुपारी न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
युगच्या हत्येने समाजमन सुन्न
आठ वर्षांचा युग चांडक याच्या अमानुष हत्येने अवघे समाजमन सुन्न झाले. मध्यरात्रीपासून बुधवारी दुपारी त्याच्या अंत्ययात्रेपर्यंत जमलेल्या जमावातील प्रत्येकजण झाल्या घटनेप्रति त्याची भावना व्यक्त करीत होता. त्यात संतापही होता आणि युगविषयीची सहानुभूतीही होती.
First published on: 04-09-2014 at 08:20 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yug chandak murder in nagpur