नगरचा चेहरा बदलण्यासाठी मोठी विकासकामे करण्याची गरज आहे. सेनाभाजपच्या सत्ताकाळात ते शक्य नाही, त्यामुळे नगरकरांना राष्ट्रवादी व काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन करत माजी महापौर संग्राम जगताप यांनी मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर जगताप यांनी लगेचच मनपाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पदावर निवड झाल्याबद्धल त्यांचा कैलास नागरी सहकारी पतसंस्था व गवळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी मनपातील सत्ताधारी सेनाभाजपवर टिकेची धार धरली व शहराच्या दुरावस्थेबद्धल त्यांना जबाबदार धरले.
मागील ५ वर्षांत मनपावर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. या काळात केंद्र तसेच राज्य सरकारच्या अनेक योजना शहरात आणल्या गेल्या. विकासकामे सुरू झाली. मात्र सेनाभाजपची सत्ता आली व नगरचा विकास खुंटला. सुरू असलेली कामे बंद पडली व नवी कामे, नव्या योजना सुरू होणे बंदच झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेमुळे मिळालेली नगरोत्थान योजना सुरू करणेही त्यांना जमेनासे झाले आहे अशी टिका जगताप यांनी केली.
नव्या योजना आणण्यासाठी अभ्यास, सतत पाठपुरावा करावा लागतो. मुंबई, दिल्लीत जावे लागते. सध्याच्या सेनाभाजपच्या सत्ताकाळात नगर सोडून कोणाही कुठे जाताना दिसत नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत नगरकरांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मागे खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन जगताप यांनी केले. अंबादास पंगुडवाले व भाऊ हुच्चे यांच्या हस्ते जगताप यांचा सत्कार झाला. रखमाजी निस्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. थानसिंग गोडळक यांनी प्रास्तविक केले. चंद्रकांत औशीकर यांनी आभार मानले. दत्तात्रय बहिरवाडे, जिवाप्पा बहिरवाडे, लक्ष्मण भागानगरे, नागप्पा हरबा, हिरामण बेद्रे, विजय महाकांळ, सवाजी हरबा, भिमाजी धजाळ, गणेश औसरकर यांनी संयोजन केले.