वीस वर्षांपूर्वी महेश कोठारे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून साकारलेला ‘झपाटलेला’ चित्रपटाचा सिक्वल आणि तात्या विंचूचा थरार ‘झपाटलेला २’ या थ्रीडी चित्रपटातून बघायला मिळणार आहे. कोठारे अ‍ॅन्ड कोठारे व्हिजन निर्मित व्हायकॉम १८ आणि मूव्हिंग पिक्चर्स प्रस्तुत ‘झपाटलेला २’ येत्या ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, सोनाली, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, महेश कोठारे, विजय चव्हाण, विजय पटवर्धन, दीपक शिर्के आणि दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार भूमिका यामध्ये बघायला मिळणार आहेत.    
चित्रपटाची पूर्ण कथा जत्रेमध्येच घडते. त्यामुळे जत्रेचा एक मोठा सेट यासाठी तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये विविध खेळांचे तंबू, टुरिंग टॉकीज, लावणीचा फड, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, खाऊ गल्ली ते जायंट हिल अशा सर्वच गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. याच जत्रेत मकरंद (मकरंद अनासपुरे) यांचा बोलक्या बाहुल्यांचा आणि सोनालीचा लावणीचा तंबू आहे. माघी गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने भरलेली ही जत्रा कव्हर करण्यासाठी एका वृत्तवाहिनीची पत्रकार असलेली गौरी वाघ सई (ताम्हणकर) तिथे पोहचली असते. इंजिनिअरिंग केलेला आणि बोलक्या बाहुल्यांच्या खेळाची आवड असलेल्या आदित्य बोलके म्हणजे आदिनाथ त्याच गावचा रहिवासी आहे. त्यामुळे तो पण जत्रेत सहभागी आहे आणि या सर्वाच्या आयुष्यात अचानकपणे तात्या विंचूची एंट्री होते आणि एकच धम्माल होते.    
महेश कोठारे यांच्या सोबतीने चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद अशोक पाटोळे यांनी लिहिले आहेत. चित्रपटात गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेली तीन गाणी असून ती अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केली आहेत. फोर के वर चित्रित झालेला मराठीतीलच नव्हे तर भारतातील या पहिल्या थ्रीडी चित्रपटासाठी खास परदेशी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. सुरेश देशमाने यांचे छायांकन, रामदास पाध्ये यांनी आपल्या करामतीसोबतच सेन्सर्स, अ‍ॅनिमेट्रीक्स तंत्रज्ञांचा वापर करून अधिक खतरनाक बनविलेला तात्या विंचू, जत्रेचा पूर्ण सेट कल्पकतेतून तयार करणारे नितीन देसाई आणि प्रस्तुती व वितरण व्यवस्था सांभाळणारी व्हायकॉम १८ असे एक ना अनेक दिग्गज या निमित्ताने एकत्र आले आहेत.