एकेकाळी ‘शून्य अपघातां’साठी प्रसिद्ध असलेल्या ‘बेस्ट’ने आपला हा लौकिक आता पूर्णपणे गमावला आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील वाढती रहदारी, बेशिस्त दुचाकीस्वार, रस्त्यांवरील खड्डे असे अनेक महत्त्वाचे घटक अपघातांना कारणीभूत ठरत असले, तरी ७० टक्क्यांहून अधिक अपघात ‘बेस्ट’चालकांच्या बेदरकारपणामुळे होत असल्याचे समोर आले आहे. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत ‘बेस्ट’च्या अपघातांत १४ जणांचा जीव गेला असून ३५ जण जखमी झाले आहेत. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या वर्षभरात २६ जणांना ‘बेस्ट’च्या अपघातांत आपला जीव गमवावा लागला होता.
‘बेस्ट’चे चालक बेदरकारपणे बसगाडय़ा चालवत असल्याच्या तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने होत आहेत. तत्पूर्वी अनेक दशके बेस्ट ‘शून्य अपघातां’साठी प्रसिद्ध होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा लौकीक ‘बेस्ट’ने गमावला आहे. ‘बेस्ट’ने कंत्राटी चालक घेतल्यानंतर या घटनांमध्ये वाढ झाली, असाही आरोप अनेकदा केला गेला. मात्र सध्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात कंत्राटी चालक नसूनही हे प्रमाण कमी झालेले नाही. अर्थात शेकडो कंत्राटी चालकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतल्याच्या वस्तुस्थितीकडेही काहींनी अंगुलीनिर्देश केला आहे.
‘बेस्ट’चे चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचे अधिकारी खासगीत मान्य करतात. पण त्यांच्या मते केवळ चालकांनाच दोष देऊन चालणार नाही. सध्या मुंबईतील वाहतूक प्रचंड वाढली असून वाहनचालक, खासकरून दुचाकी चालक खूपच बेशिस्तपणे गाडय़ा चालवतात. ‘बेस्ट’च्या अपघातांपैकी बहुतांश अपघात हे दुचाकी चालकांनी चुकीच्य बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे झाले आहेत, असेही हे अधिकारी सांगतात.
मात्र आकडेवारीकडे नजर टाकली असता हा दावा फोल असल्याचे सहज लक्षात येते. एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या वर्षांत २६ अपघातांमध्ये २६ जणांचा जीव गेला होता. यापैकी फक्त सात अपघातांमध्ये ‘बेस्ट’चे चालक निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. मात्र उर्वरित १९ अपघातांसाठी या चालकांना कारवाईला सामोरे जावे लागले. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत झालेल्या १४ अपघातांत १४ जण ठार झाले. यापैकीही फक्त ४ अपघातांत चालकाची चूक नसल्याचे निष्पन्न झाले होते. म्हणजेच जीवघेण्या अपघातांपैकी ७० ते ७५ टक्के अपघात हे बेस्ट चालकांच्या चुकीमुळेच होतात.
अपघात झाला की..
‘बेस्ट’च्या चालकाकडून एखादा जीवघेणा अपघात झाला की, सर्वप्रथम अपघात विभाग कामाला लागतो. ‘बेस्ट’चे अपघात अधिकारी त्वरीत घटनास्थळी धाव घेतात. चालकाला पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर त्याला अटक होऊ नये, यासाठी जामीन मिळवून देणे हे या अधिकाऱ्याचे महत्त्वाचे काम असते. त्याशिवाय अपघाताची तपशीलवार माहितीही त्याला गोळा करावी लागते. त्यानंतर वरिष्ठ वाहतूक अधिकारी खातेनिहाय चौकशीचे काम चालू करतो. सहा महिन्यांच्या आत खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर चालकावर कारवाई केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बेस्ट’साठी अपघातप्रवण विभाग
मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र तरीही ‘बेस्ट’च्या गाडय़ांचे अपघात काही ठरावीक विभागांतच होत असल्याचे समोर आले आहे. यात सांताक्रुझ पूर्व ते भाईंदर, घोडबंदर ते कापुरबावडी, कुर्ला काटा ते विद्याविहार, साकीनाका ते कमानीरस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांचा समावेश आहे.

‘बेस्ट’साठी अपघातप्रवण विभाग
मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर सध्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र तरीही ‘बेस्ट’च्या गाडय़ांचे अपघात काही ठरावीक विभागांतच होत असल्याचे समोर आले आहे. यात सांताक्रुझ पूर्व ते भाईंदर, घोडबंदर ते कापुरबावडी, कुर्ला काटा ते विद्याविहार, साकीनाका ते कमानीरस्ता आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांचा समावेश आहे.