डोंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाइन्स कंपनीच्या एक हजार चौरस मीटरच्या आवारातच शून्य प्रदूषण आणि शून्य सांडपाणी निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प तयार केला आहे. कंपनीच्या आवारात तयार होणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर, वायूवर कंपनीच्या आवारातच प्रक्रिया करून मगच ते पाणी, वायू योग्य त्या मार्गाने सोडण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे प्रदूषण या विषयालाच कंपनीने आपल्या आवारातून हद्दपार केला असल्याचा दावा कंपनीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष कृष्णा देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक विजय पालकर, राहुल पालकर, उपाध्यक्ष मुकुंद रोंगे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. शिरीष देशपांडे, मनुष्यबळ विकास प्रमुख जयश्री महाडिक, निशिकांत सुळे, अरुण देशपांडे या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेप्रमाणे प्रदूषण मुक्तीच्या या प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे.  
इंडो अमाइन्स कंपनी रासायनिक कंपनीच्या पट्टय़ात येते. या कंपनीच्या बाजूला एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. बाजूने रासायनिक सांडपाणी वाहून नेणारा नाला आहे. या केंद्र व नाल्याच्या बाजूला निवासी वसाहती, शाळा आहेत. त्यामुळे परिसरात उग्र दर्प पसरला की प्रदूषण नियंत्रण मंडळातून इंडो अमाइन्स कंपनीवर नाहक कारवाई केली जाते. कंपनीतून रंग, कपडा, औषधे, शेती, खतांसाठी लागणारा कच्चा माल चाळीस देशांत पाठविला जातो. दोनशेहून अधिक कामगार येथे कार्यरत आहेत. स्थानिक रोजगार मोठय़ा प्रमाणात आहे. केवळ प्रदूषणाच्या कारणामुळे कंपनी बंदच्या नोटिसा एमपीसीबीकडून पाठविण्यात येत असल्याने कंपनीने आवारातच रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सुमारे ३५ लाख खर्चाचा प्रकल्प सुरू केला आहे. रासायनिक प्रक्रियेचा हवेत मिसळणारा वायू कमी करून तो स्क्रबर यंत्रणेद्वारे प्रक्रियेमध्येच जाळून टाकण्यात येत आहे. आवाजाचे प्रदूषण कमी करण्यासाठी अ‍ॅक्वॉस्टिक एन्क्लोजर बसविण्यात आले आहेत, कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी झाडांची लागवड करण्यात आली आहे, असे विजय पालकर यांनी सांगितले.
एमआयडीसीने आपल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची योग्य देखभाल घेतली तर कंपनीवर दरुगधी पसरविण्याचा आरोप होतो तो कमी होईल. अनेक कंपन्यांना कंपनीच्या आवारात दुसरे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे एमपीसीबीने बजावले होते. अनेकांनी ते प्रस्ताव रद्द करून घेतले असल्याची माहिती आहे. कंपनीजवळ विस्तारित जागा नसल्याने अनेक कंपन्या हे दुसरे प्रक्रिया केंद्र सुरू करू शकत नाहीत, असे पालकर यांनी नमूद केले. कंपनी आयएसओ असून केमिक्सीलचे तीन गौरव पुरस्कार इंडो अमाइन्सला मिळाले आहेत, असे पालकर यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा