मतदानासाठी ओळख म्हणून वापरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २९ खातेदारांची ओळखपत्रे जिल्हा बँकेच्या येथील मार्केट यार्ड शाखेने परत मागितली असून, ही खाती तडकाफडकी गोठविण्याचा निर्णय घेतल्याने नाशिक जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इंधन कंपन्यांचे केंद्र म्हणून महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी होत आहे. या निवडणुकीतील मतदार यादीत नावे असलेल्या २९ जणांची ओळख पटावी यासाठी ३० ऑगस्ट रोजी येथील मार्केट यार्ड शाखेत बचत खाते उघडण्यात आले व पासबुक देण्यात आले. याविरुद्ध नागापूर येथील राजेंद्र पवार यांच्यासह इतर ग्रामस्थांनी आक्षेप घेत बँक शाखाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. या सर्व तक्रारींचा विचार करून जिल्हा बँकेच्या मनमाड मार्केट यार्ड शाखेत ३० ऑगस्ट रोजी उघडण्यात आलेले खाते नं. २३७३१ ते २३७५९ ही २९ खाती गोठविण्यात येत असून, खातेदारांना देण्यात आलेले पासबुक रद्द करण्यात आल्याचे पात्र शाखा व्यवस्थापकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.
खाते उघडण्याच्या अर्जासोबत रेशनकार्ड व निवडणूक आयोगाचे ओळखपत्र जोडले नसल्याचे आढळले. त्यातील फोटो वेगळे व व्यक्ती वेगळी असल्याचे निदर्शनास आले असून बँकेची फसवणूक केल्याचे शाखाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या सर्व २९ खातेदारांसाठी ओळख म्हणून देविदास उगले (रा. माळेगाव कर्यात) यांची ओळख देण्यात आली असली तरी या व्यक्तीचा व खातेदारांचा कुठलाही संबंध नसून कोणत्याही मतदानासाठी ओळख म्हणून हे पासबुक ग्राह्य़ धरू नये, असेही शाखा व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.
रविवारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी संवेदनाक्षम ग्रामपंचायत म्हणून विशेष लक्ष द्यावे आणि बोगस मतदान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी राजेंद्र पवार यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा