निवड झाल्यानंतरही चातकासारखी नियुक्ती पत्राची वाट बघणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवड झालेल्या १०६ उमेदवारांपैकी ६६ उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी प्रदीप पी यांनी हे नियुक्ती पत्र उमेदवारांना दिले.
सहा महिन्यापूर्वी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, संवर्ग अधिकारी, पर्यवेक्षक, लेखा परीक्षक आदी विविध पदांसाठी जिल्हा परिषदेमध्ये परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर निवड यादी जाहीर करण्यात आली. परंतु निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळाले नसल्याने निवड यादीत घोळ झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यातच जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने हा मुद्दा उपस्थित करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र केव्हा देणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. या पाश्र्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांनी निवड झालेल्यांपैकी ६६ उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले. एकूण १२२ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार होती. परंतु १६ पदांसाठी योग्य पात्रतेचे उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे १०६ उमेदवारांची निवड यादी घोषित करण्यात आली. निवड झालेल्या उर्वरित उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्र दिले जाणार आहे.
भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्यात आली. तीनदा पेपर तपासण्यात आले. कुणावर अन्याय होणार नाही, याची दखल घेण्यात आली. एका पात्र उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेचे एक पान दबले गेले होते. त्यामुळे त्याला २४ गुण कमी मिळाले. दुसऱ्यांदा जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा ही चूक लक्षात आली. यानंतर त्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली.
दुसऱ्यांदा जेव्हा पेपरची तपासणी करण्यात आली तेव्हा काही विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले तर काहींच्या गुणात वाढ झाली. उमेदवारांच्या मनात काही शंका राहू नये यासाठी तपासणीनंतर विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका दाखवण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा