धुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी प्रारंभ होताच चार तालुक्यांच्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारून विजयी सलामी दिली. परंतु, नंतर या दोन्ही पक्षांचा जोर ओसरला. मात्र, शिवसेना व भाजपला दमदार अस्तित्व सिध्द करता आले नसल्याचे पहावयास मिळाले. दुसरीकडे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीला काँग्रेसने प्रारंभीच जोरदार हादरे दिल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.
धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि ११२ गणांसाठी रविवारी मतदान झाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या चारही ठिकाणी मतमोजणीला सुरूवात झाली. प्रथम जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांनी आघाडी घेतली. धुळे तालुक्यात लाभकाणी गटात काँग्रेसच्या राजाबाई महाले यांनी शिवसेनेच्या सुलोचना पवार यांना पराभूत केले. या गणातही काँग्रेसच्या पुष्पलता वाणी यांनी शिवसेनेच्या हिराबाई पाकळे यांचा पराभव केला. बोरीस गणात शिवसेनेच्या मीनाताई देवरे तसेच सोनगीर गटात मका या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढविणारे शामलाल भील या दोघांनी काँग्रेसच्या उमेदवारांना धुळ चारून विजय मिळविला.पडणे गटात काँग्रेसचे नुतन निकंभ विजयी झाले. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या वरखेडे गटात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला. नगाव गटात लक्षणिय मते घेऊन अपक्ष उमेदवार आशाबाई ठाकरे विजयी झाल्या. निमडाळ गटात काँग्रेसचे प्रमोद पाटील तर नेर गटात भाजपचे तुळशीराम गावित यांनी विजय मिळविला. देवूर गटात राष्ट्रवादीचे किरण पाटील यांनी काँग्रेसचे रवींद्र देवरे यांना पराभूत केले.
धुळे तालुक्यातील निकालाप्रमाणे साक्री, शिरपूर, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील निकालाची उत्सुकता वाढली होती. शिरपूर तालुक्यात आ. अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांचा विजय झाला असून काँग्रेसचे दहा, अपक्ष व भाजपचा प्रत्येकी एक असे १२ गटातील निकाल दुपापर्यंत जाहीर झाले होते. शिंदखेडा तालुक्यात भाजप व काँग्रेसने दुपापर्यंतच्या निकालात समसमान संख्या कायम राखली. साक्री तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही भागात काँग्रेसचा वरचष्मा राहिल्याचे दिसत होते. काँग्रेस व राष्ट्रवादीतील तीव्र मतभेदांमुळे लक्षवेधी ठरलेल्या नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसत होते. नंदुरबार जिल्हा परिषदेवरील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. या सत्तेला काँग्रेसने सुरुंग लावल्याचे पहावयास मिळाले. दुपापर्यंत गटांचे सर्व निकाल जाहीर झाले. डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश करणारे दीपक पाटील यांच्या पत्नी जयक्षी पाटील, विद्यमान बांधकाम सभापती एम. एस. गावित, विद्यमान कृषी सभापती भगवान पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. नवापूर पंचायत समितीत काँग्रेस तर नंदुरबार पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. शहादा पंचायत समितीत संमिश्र स्वरुपाचे निकाल लागले. अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धडगाव आणि अक्कलकुवा पंचायत समितीच्या निकालाची माहिती दुपापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.
धुळ्यात काँग्रेस व राष्ट्रवादी, तर नंदुरबारमध्ये काँग्रेसची आघाडी
धुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी प्रारंभ होताच चार तालुक्यांच्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारून विजयी
आणखी वाचा
First published on: 03-12-2013 at 07:22 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp and panchayat election