जिल्हा परिषदेच्या लागोपाठ तीन सभांना महसूल अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याची दखल अखेर पालकमंत्री मधुकर पिचड यांनी घेतली आहे. ते व विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांची एकत्रित बैठक सोमवारी (दि. ५) आयोजित करण्यात आली आहे. त्यास जिल्हाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान दुष्काळी उपायांसाठी बोलावलेल्या सभांना महसूल अधिका-यांनी उपस्थित न राहणे ही अक्षम्य चूकच आहे, अधिका-यांनी अशाप्रकारे कोणत्या राजकारणास बळी पडण्याचे कारण नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
जिल्हा प्रशासन टँकर बंद करताना अतिशय घाई करत आहे, अद्यापि जिल्ह्य़ात पुरेसा पाऊस झालेला नाही. भिजपावसामुळे केवळ जनावरांच्या चा-याचा प्रश्न सुटला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढलेली नाही, त्यामुळे वस्तुस्थिती तपासून नंतरच टँकर बंदचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेलार यांनी केली. पिचड सोमवारी सकाळी १० वाजता पक्षकार्यालयात पदाधिका-यांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर दुपारी १२ वाजता जि. प. सभागृहात बैठक घेतील, जिल्हा राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २२ जुलैपासून सुरू केलेल्या ५४ हजार रोपे लावण्याच्या मोहिमेचा समारोप पिचड यांच्या उपस्थितीत ५ वाजता चाँदबीबी महालावर होईल, त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात अद्यापि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम असल्याने कर्जत, जामखेड, श्रीगोंदे, राहुरी तालुक्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी होत आहे, विसापूरसह मांगी, जवळा, चोंडी, आगी आदी तलाव भरून घेण्याची मागणी आहे, तसेच तेल्या रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, शेततळ्यांचे अनुदान रखडल्याने शेतकरी वैतागले आहेत, या प्रश्नांकडेही पिचड यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. पक्षाचे पदाधिकारी सोमनाथ धूत, दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.
आपल्यावर नाराजी नाही!
जिल्हाध्यक्ष शेलार हटवण्याची माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या गटाने सुरू केलेली मोहीम बारगळल्याने शेलार यांनी आपले स्थान बळकट झाल्याचे पक्ष पदाधिकारी, युवक पदाधिकारी व जि. प. सदस्यांच्या आज सलग बैठका आयोजित करून दाखवून दिले. मात्र, जि. प.चे बहुतेक पदाधिकारी व सदस्य अनुपस्थित राहिले, त्यामुळे त्यांना नोटिसा बजावल्या जाणार असल्याचे समजले. आपल्याविरुद्ध मोहीम सुरू असल्याची माहिती वृत्तपत्रांतूनच समजली, पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणे हा आपला स्वभाव आहे. आपल्या कामावर जिल्ह्य़ात कोणी नाराजी व्यक्त केली नाही किंवा आपल्याकडून काही चूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले नाही, असे शेलार यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

Story img Loader