जिल्हा परिषदेच्या नावावर अजून जागाच नसताना जि.प.च्या ७ नोव्हेंबर २०१२च्या सर्वसाधारण सभेत नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला. आता जि.प.च्या नावावर ही जागा करून घेण्याचे प्रयत्न अध्यक्षांकडून होत असले, तरी राज्य सरकारकडून या प्रक्रियेस मान्यता कधी मिळणार, हा चर्चेचा विषय आहे. जिल्हा निर्मिती झाल्यानंतर राज्य सरकारने येथील शेत सव्‍‌र्हे क्र. १०१ व १०२ या जमिनीवर जि.प.ची प्रशासकीय इमारत, वर्ग १ ते ४च्या कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधली. त्याचा वापर सुरू झाला. जि.प. प्रथमच शिवसेनेच्या ताब्यात आली. वर्षभराच्या त्यांच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधारी व विरोधकांत निधी खर्चाच्या कारणावरून सुरू असलेला वाद, पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्याकडून निधी खर्चास मिळालेली स्थगिती हा विषय आता वादग्रस्त झाल्याने जिल्हय़ात यावर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड यांनी पालकमंत्र्याला घेराव घालण्याचा इशारा दिला. जि.प.च्या गेल्या ७ नोव्हेंबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत नाटय़गृह, व्यापारी संकुल व उद्यान बांधकामाचा प्रस्ताव सभागृहाने मंजूर केला. ही कामे लवकर व्हावीत, म्हणून माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, गजानन घुगे यांनी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सतत भेटी घेऊन तगादा लावला. पण ही जमीनच जि.प.च्या नावावर नसल्याचे आढळून आले. त्यामुळे जि. प. अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे यांनी ३ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना हिंगोली येथे नाटय़गृह, व्यापारी संकुल व उद्यान बांधण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दुसरीकडे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १० डिसेंबरला हिंगोली तहसीलदारांना दिलेल्या लेखी पत्रामध्ये जि.प.ला दिलेल्या जागेचे मालकी हक्काचे फेरफार करून सात-बाराचा उतारा त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना १९ डिसेंबरला दिलेल्या लेखी पत्रामध्ये जि.प.ला शासनाने दिलेल्या जागेच्या मालकी हक्कामध्ये फेरफार करून सात-बाराचा उतारा देण्याची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास सव्‍‌र्हे क्र. १०० व १०१ची जमीन मोजून देण्याचे पत्र दिले असता यासाठी ८८ हजार रुपये मोजणी शुल्क भरण्याचे पत्र या कार्यालयाने १० जानेवारीला दिले. ही जागा जि.प.च्या नावावर करण्याचा निर्णय मात्र आता राज्य सरकारवर अवलंबून आहे.

Story img Loader