मेहेकरी (ता. नगर) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा, इमारतीसह बेकायदा परस्पर विकण्याच्या प्रकारात, जि. प. न्यायालयात दावा दाखल करणार आहे. जि. प.च्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी या जागेचा खरेदी-विक्री व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य समितीची सभा आज जि. प. उपाध्यक्ष तथा समितीच्या सभापती मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कारभारी खरात यांनी याबाबतची माहिती दिली. गेली २८ वर्षे आरोग्य केंद्र म्हणुन वापरात असलेली जागा इमारतीसह विकण्यात आली. या बेकायदा व्यवहाराबाबत जि. प.ने वकिलांचा अभिप्राय मागवला होता, त्यानुसार दावा दाखल केला जाणार आहे. सध्या न्यायालयांना सुट्टय़ा आहेत, दि. १२ नंतर न्यायालयाचे नियमित कामकाज सुरु होईल, त्या वेळी दावा दाखल केला जाईल, त्याचबरोबर फौजदारी कारवाई करण्यासाठीही वकिलांशी चर्चा केली जात आहे, असे खरात म्हणाले.
सन १९८५ मध्ये मेहेकरी गावातीलच एकाने ८१ आर जागा केंद्रासाठी जि. प.ला दान दिली होती. दान देणाऱ्यानेच त्यातील ४० आर जागा दुसऱ्याला विकली. या जागेची वहिवाटदार जि.प. होती. जागा दान मिळाल्यानंतर सातबाऱ्यावर जि. प.चे नाव लावायचे राहिले होते. आता त्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.
सभेस डॉ. स्वाती अंकुश कानडे, अश्विनी मालदंड, सुनीता बनकर, भगवान मुरुमकर, मंदा भोसले, चित्रा बर्डे, डॉ. भास्करराव खर्डे तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आजार नियंत्रण कक्ष कार्यान्वित
पावसाळ्यास सुरुवात होत असल्याने जि. प.च्या आरोग्य विभागात (दूरध्वनी क्र. २३२६९२३, २३२३७५२) व तालुका पातळीवर साथीचे आजार नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक किटसह ‘तत्काळ पथके’ही तैनात करण्यात आली आहेत. साथीच्या आजार नियंत्रणासाठी १ कोटी ६० लाख रुपये औषध खरेदीचा प्रस्ताव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा