पळशी येथील रुख्मिणी विद्यालयात पुरलेल्या पोषण आहाराच्या तांदळाचा मुद्दा विरोधकांनी जि. प.च्या सभेत जोरकसपणे उचलून धरला. या बरोबरच जि. प.च्या जागेवरील अतिक्रमण, कहाकर (खु.) व सावरखेडा पुलाचे बांधकाम, माध्यमिक शाळेतील उर्दू शिक्षकांच्या रिक्त जागेसह इतर प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पोषण आहारप्रकरणी गुन्हा दाखल करणे, पुलाचे बांधकाम स्थगित ठेवण्याबाबत विरोधकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या सभेत गजानन देशमुख, मुनीर पटेल, विनायक देशमुख यांनी रुख्मिणी विद्यालयातील पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अजून फिर्याद दिली नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली. यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. या प्रकरणात फिर्याद देऊन गुन्हा नोंदविणे, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरले. याचप्रमाणे कहाकर (खु.) व सावरखेडा येथील ६० व ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पंतप्रधान सडक योजनेंतर्गत पुलाच्या बांधकामाची गुणनियंत्रकामार्फत चौकशी करावी, तोपर्यंत काम थांबवावे, अशी विनायक देशमुख यांची मागणी सभागृहाने मान्य केली.
उर्दू माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागेवर तात्पुरती व्यवस्था करण्याचे ठरले. अतिक्रमणाच्या मुद्दय़ावर सेनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचावर कारवाई करण्याबरोबरच हिंगोलीतील जागा जि. प.च्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती नावावर होताच अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले.