शालीन, सोज्वळ सौंदर्य, विनम्र कलासक्त व्यक्तिमत्त्व व उपजत कलागुणांच्या जपणुकीचा ध्यास या सगळ्याच्या जोरावर अमला शंकर नावाचा नृत्याचा झंझावात जगभरात थिरकला. भारतीय नृत्यशैली व आधुनिक नृत्याची सांगड घालत सर्जनशील नृत्याविष्कार करणाऱ्या अमला शंकर यांना प्रतिभेच्या जोरावर स्वत:ची स्वतंत्र प्रतिमा निर्माण करता आली असती. पण श्वासातच नृत्य असलेल्या अमला यांना प्रसिद्धीचा विचार जराही शिवला नाही. त्याउलट, ज्यांना गुरूस्थानी मानले ते जगप्रसिद्ध नर्तक, नृत्यदिग्दर्शक उदय शंकर यांची सावली, त्यांची सहचारिणी म्हणून त्यांनी आपली ओळख कायम ठेवत नृत्यसेवेचा वसा आयुष्यभर जपला. ते आयुष्य २४ जुलै रोजी निमाले. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी वडिलांसह फ्रान्समध्ये पोहोचलेल्या छोटय़ा अमलाला त्या वेळी पॅरिसच्या विश्वात भारतीय नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिशीतल्या उदय शंकर यांनी नृत्य करून दाखवण्यास सांगितले. हे नृत्य पाहताक्षणी पसंत पडलेल्या उदय शंकर यांनी आपल्या आईच्या मदतीने अमला यांच्या वडिलांना विनंती करून त्यांना आपल्या नृत्यपथकाच्या दौऱ्यात सामील करून घेतले. नृत्याशी झालेली ही पहिली ओळख, नृत्याने दिलेला आनंद घेऊन घरी परतलेल्या अमला यांची नृत्याशी लागलेली लग्नगाठ ही त्यानंतर वयाच्या शंभरीपर्यंत टिकली. उदय शंकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने त्यांच्या जगण्याचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या नृत्यप्रकाराचा अविभाज्य भाग झाल्या. स्वत: उदय शंकर यांनी कु ठल्याही एका नृत्यप्रकाराचे रीतसर शिक्षण घेतले नव्हते. त्यांनी कथकली, भरतनाटय़म्, कथ्थक, मणिपुरी, ओडिसी आणि कु चिपुडी अशा भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींच्या संगमातून स्वत:ची वेगळी नृत्यशैली विकसित केली. अमला यांनीही निरीक्षणाच्या जोरावर उदय शंकर यांची नृत्यशैली आत्मसात केली. किंबहुना उदय शंकर यांनी निर्माण केलेली नृत्यशैली जगभर पोहोचवण्याचे श्रेय अमला यांनाच दिले जाते. अमला यांनी स्वत: मणिपुरी, कथकली आणि भरतनाटय़म्चे दिग्गजांकडून प्रशिक्षण घेतले होते. या अभ्यासाला, उदय शंकर यांच्या नृत्यशैलीतून आत्मसात केलेली देहबोली, पदन्यास, हावभाव यांची जोड मिळाली. मात्र एका प्रतिभेच्या छायेखाली वावरताना दुसऱ्यावर येणारा झाकोळ त्यांच्याही वाटय़ाला आला. उत्तम नृत्यांगना, खाण्यापासून वावरण्यापर्यंत सगळीकडे शिस्तीचा ध्यास घेऊन शिकवणारी प्रेमळ नृत्यशिक्षिका, आई, पत्नी प्रत्येक भूमिके तून चोख वावरणाऱ्या अमला शंकर या सर्वोत्तम प्रतिभेचा एक झंझावात होत्या, असे त्यांचे शिष्य मानतात. ‘कल्पना’ या उदय शंकर यांनी दिग्दर्शित के लेल्या एकमेव चित्रपटातून अमला शंकर यांचे वेगळे रूप पाहायला मिळते. अत्यंत प्रतिभावान अशा अमला शंकर भारतीय संगीत-नृत्यविश्वात उपेक्षितच राहिल्याची भावना त्यांचे सुहृद व्यक्त करतात.