क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखालील सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील दिग्विजयी वेस्ट इंडियन संघाची ओळख सर्वाना आहे. पण या संघाची किंवा विजयभावनेची पायाभरणी त्याच्या काही वर्षे आधीपासून सुरू होती. १९५०चे दशक सुरू व्हायच्या अलीकडे-पलीकडे वेस्ट इंडिजतर्फे काही असामान्य क्रिकेटपटू खेळू लागले, यांत ज्यांची नावे आवर्जून घेतली जातात ते ‘डब्ल्यू’ त्रिकूट म्हणजे सर फ्रँक वॉरेल, सर क्लाइड वॉलकॉट आणि सर एव्हर्टन वीक्स. यांपैकी वॉरेल आणि वॉलकॉट यांच्या आयुष्याची इनिंग्ज पूर्वीच आटोपली. सर एव्हर्टन वीक्स गुरुवारी निवर्तले. त्यांना त्यांच्या इतर दोन मित्रांशेजारीच चिरविश्रांती मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, या त्रिकुटासाठी तो अपूर्व योगायोग ठरेल. तिघा डब्ल्यूंचा जन्म एकाच वर्षी, जवळपास तीन चौरसमैल परिघात, वेस्ट इंडिजमधील बार्बेडोसमध्ये झाला. तिघेही तीन आठवडय़ांच्या अंतराने कसोटी क्रिकेट खेळू लागले! तिघेही महान फलंदाज बनले. सर फ्रँक वॉरेल वेस्ट इंडिजचे पहिले अश्वेत कर्णधार बनले. सर क्लाइड वॉलकॉट ब्रिटिश गयाना, तर सर एव्हर्टन वीक्स बार्बेडोसचे पहिले अश्वेत कर्णधार बनले.
पण या तिघांपैकी वीक्स हे नि:संशय अधिक गुणवान फलंदाज. ४८ कसोटी सामन्यांमध्ये ५८.६१च्या सरासरीसह ४४५५ धावा, ज्यात १५ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश. ती सरासरी किमान २०हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजांच्या क्रमवारीत सातवी. पण त्याहीपेक्षा थक्क करणारी कामगिरी वीक्स यांच्या नावावर नोंदवली गेली – सलग ५ कसोटी शतकांची. यांतील पहिले इंग्लंडविरुद्ध, उर्वरित चार भारताविरुद्ध भारतातच. ही शतके सहा असती, पण मद्रासमध्ये आपल्याला संशयास्पदरीत्या धावबाद ठरवले गेले, अशी तक्रार ते अलीकडेपर्यंत करत असत. अर्थात त्यात कधीच कोणती कटुता नसे. उत्तम तंदुरुस्ती आणि उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभलेला हा रांगडा कॅरेबियन गडी. गरिबीत जन्माला आला. सुरुवातीला एका क्रिकेट क्लबमध्ये किरकोळ काम करण्यासाठी सोडले जायचे, पण खेळता येत नव्हते. कारण क्लब केवळ गोऱ्यांसाठी राखीव होता. एव्हर्टन वीक्स पिकविक या गावात फुटबॉल आणि क्रिकेट एकाच वेळी खेळू लागले. आजूबाजूच्या वस्तीतील खिडक्यांच्या काचा फुटू नयेत यासाठी जमिनीलगत फटके मारायची सवय जडली, ती कायमचीच. कारकीर्दीत त्यांनी केवळ एकच षटकार लगावला, कारण त्याची फारशी गरजच भासली नाही. तरीदेखील कसोटी इतिहासात सर्वात कमी १२ डावांमध्ये पहिल्या हजार धावा जमवणारे ते एकमेव. सतत पोहण्याची सवय. विनोदी आणि आनंदी व्यक्तिमत्त्व. शिवाय स्वत:ची कामे स्वत:च करण्याची शिस्त. क्रिकेटबरोबरच ब्रिजमध्येही पारंगत. तरीही गोतावळा जमवून क्रिकेटचे सामने पाहण्याची सवय. त्यामुळे दीर्घायुषी, रसरशीतही राहिले. एकदा बार्बेडोसला आलेल्या इयन चॅपेलना एक पार्टी संपवून मध्यरात्री त्यांच्या मुक्कामी जायचे होते. त्या वेळी हातात बीअरचा ग्लास असूनही वीक्स म्हणाले, ‘‘मी सोडतो तुम्हाला.’’ चॅपेल यांनी बजावले, ‘‘ब्रेथलायझरचे काय कराल?’’ वीक्स मिष्कीलपणे उत्तरले- ‘‘आम्ही सभ्य आहोत. असल्या वाईट सवयी आम्हाला नाहीत!’’