इंग्रजी पत्रकारितेत बालमानसशास्त्र समजून घेणारा लिहिता हात, राजकीय क्षेत्रात इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण अशा राजकीय दिग्गजांशी संपर्क, उद्योगक्षेत्रात जे.आर.डी. टाटा यांच्यापर्यंत पोहोच, त्यातून निर्माण झालेले समाजभान राखताना वृत्तपत्रांतील रविवारच्या पुरवण्यांमध्ये वाचकांना कोणता मजकूर योग्य ठरेल, याची जाण असणाऱ्या महिला पत्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील दर्जा टिकायला हवा यासाठी आत्मसात केलेले कार्यकर्तेपण, या गुणांचे मिश्रण म्हणजे पद्माश्री फातिमा झकेरिया! मराठवाड्यासारख्या मागास भागात अनेक वर्षे नेटाने शिक्षणसंस्था चालविताना गरीब आणि शोषित वर्गास दर्जेदार शिक्षणासाठी त्यांनी धरलेला आग्रह नव्या जाणिवा निर्माण करणारा ठरला.
फातिमा झकेरिया यांचा जन्म मुंबईचा. भावांच्या शिक्षणासह वडिलांचा व्यवसाय पुढे हातात घेत त्यांनी लखनऊच्या आय. टी. कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुन्हा मुंबई येथे त्यांनी ‘निर्मला निकेतन’मधून सामाजिक कार्याची अधिकृत पदवी मिळविली. या अभ्यासक्रमादरम्यान त्यांना लहान मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करता आला. त्या अनुभवाचा उपयोग करून इंग्रजी वर्तमानपत्रांत मुलांसाठी त्या मजकूर उभा करत. पत्रकारितेच्या कारकीर्दीत मार्गारेट थॅचर, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, जयप्रकाश नारायण यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. १९८४ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी वर्तमानपत्रातून वाचकांपर्यंत पोहोचवली. नामांकित इंग्रजी नियतकालिकांमध्ये आणि दैनिकांमध्ये पत्रकारितेत ठसा उमटविणाऱ्या फातिमा झकेरिया यांना १९८३ मध्ये ‘सरोजिनी नायडू एकात्म पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते. एका बाजूला पत्रकारिता सुरू असतानाच पती डॉ. रफिक झकेरिया यांनाही त्यांचे राजकीय विचार मांडण्यासाठी आणि ते संपादित करण्यासाठी फातिमा झकेरिया यांनी मदत केली. मराठवाड्यासारख्या भागात गरीब, शोषित वर्गासाठी उच्च शिक्षणाच्या संधी तुलनेने कमी उपलब्ध होत्या. मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालय असावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. औरंगाबादसारख्या ठिकाणी पर्यटन आणि आदरातिथ्य हे व्यावसायिक क्षेत्र असू शकते, असा आडाखा बांधून त्यांनी या क्षेत्रातील महाविद्यालय सुरू केले. मौलाना आझाद शिक्षण संस्थेमार्फत झकेरिया दाम्पत्याने औरंगाबाद शहरात विविध प्रकारची १५ महाविद्यालये सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. उच्च शिक्षणात संशोधनावर अधिक भर द्यायला हवा आणि त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत पायाभूत सुविधा शैक्षणिक संस्थेमध्ये सुरू राहाव्यात यासाठी फातिमा झकेरिया प्रयत्नशील होत्या. शिक्षणक्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन २००६ मध्ये फातिमा झकेरिया यांना ‘पद्माश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पत्रकारिता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा अमिट ठसा फातिमा झकेरिया यांनी उमटविला. कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात काहीशा करारी आणि नंतरच्या टप्प्यात संस्था वाढावी, टिकावी यासाठी खासे प्रयत्न करणाऱ्या फातिमा झकेरिया यांनी विश्वस्त संस्थेवर आवर्जून चांगली माणसे यायला हवीत, असा आग्रह धरला. ती केवळ एकाच धर्माची आणि जातीची असू नयेत असेही प्रयत्न त्यांनी केले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.