जगभरात आतापर्यंत ७५ हजार बळी घेणाऱ्या करोना विषाणूवर कुठलाच उपाय नाही, सध्या तरी महासत्तेपासून सारे देश करोनापुढे हतबल आहेत. अनेक नामवंतांचे बळी या विषाणूने घेतले, त्यातच जगातील ख्यातनाम विषाणूशास्त्रज्ञ असलेल्या गीता रामजी यांचा नुकताच करोनाने बळी घेतला आहे. त्यांचे मूळ नाव गीता पारेख. नुकत्याच त्या लंडनहून दक्षिण आफ्रिकेत परत आल्या होत्या. नंतर त्यांना कुठलीही लक्षणे दिसली नव्हती तरी त्यांना करोना संसर्ग अचानक वाढून त्यांचा मृत्यू झाला. रामजी अवघ्या ६४ वर्षे जगल्या. अधिक जगत्या, तर त्यांनी एचआयव्हीप्रमाणेच करोना विषाणूवर लस शोधण्यात मोठी भूमिका पार पाडली असती. द. आफ्रिकेत एचआयव्ही प्रतिबंधक संशोधन केंद्राच्या त्या प्रमुख वैज्ञानिक होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या देशातील एचआयव्ही लशींच्या चाचण्या घेतल्या गेल्या. सुरुवातीला एड्स हाही असाध्य असाच रोग मानला जात होता, पण गीता यांच्यासारख्या विषाणूतज्ज्ञांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. युरोपियन डेव्हलपमेंट क्लिनिकल ट्रायल्स पार्टनरशिप या संस्थेने त्यांना सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कार लिस्बन येथे प्रदान केला होता. जोहान्सबर्ग येथे ऑरम इन्स्टिटय़ूट ही ना नफा संस्था एचआयव्ही व क्षयावर संशोधन करीत आहे. त्याच्या त्या मुख्य वैज्ञानिक अधिकारीही होत्या.

रामजी यांचा जन्म युगांडातला. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. नंतर इदी अमिन या हुकूमशहाची सत्ता आल्यानंतर त्या भारतात आल्या. पुढे ब्रिटनला गेल्या. १९८० मध्ये त्यांनी ईशान्य इंग्लंडमधील संडरलँड विद्यापीठातून रसायनशास्त्र व शरीरशास्त्रात पदवी घेतली. त्यांचे पती दक्षिण आफ्रिकेत असल्याने त्यांना १९८१ मध्ये तिकडे जावे लागले. दरबान येथील क्वाझुलु विद्यापीठातून त्यांनी बालरोगशास्त्रात पीएच.डी. केली. सकाळी सहा वाजता उठून मुलांना शाळेसाठी तयार करणे, स्वयंपाक  करणे, मुलांना घरी आणणे, त्यांचा अभ्यास घेणे हे करून त्या रात्री दोनपर्यंत शोधनिबंध लिहीत असत. पीएच.डी. करतानाच एचआयव्हीवरचे संशोधन हेच त्यांचे ध्येय ठरून गेले होते. नंतर त्या दरबानमधील एचआयव्ही प्रतिबंध संशोधन केंद्राच्या प्रमुख झाल्या. एचआयव्ही प्रतिबंधाच्या अनेक साधनांच्या चाचण्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. लंडन स्कूल ऑफ हायजडीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन व सियाटलमधील वॉशिंग्टन विद्यापीठ या संस्थांच्या त्या मानद प्राध्यापक होत्या. दक्षिण आफ्रिकाच नव्हे तर संपूर्ण जगातील तरुण वैज्ञानिकांसाठी त्या आदर्श ठरल्या. दक्षिण आफ्रिकेतील महिला व मुलींना एड्सचा धोका खूप मोठय़ा प्रमाणावर होता तो कमी करण्यात त्यांनी मोठे यश मिळवले.