‘ऑस्कर’ मिळवणारे पहिले- आणि आतापर्यंतचे एकमेवच- पात्रयोजनाकार म्हणजे ‘कास्टिंग डायरेक्टर’ ही त्यांची प्रसिद्धी! पण या प्रसिद्धीमागे एक इतिहास दडलेला होता आणि तो इतिहास आपण घडवल्याचा अभिमान अजिबात न बाळगणारे निर्व्याज, ऋ जू व्यक्तिमत्त्वदेखील. लिन स्टॉलमास्टर यांचे निधन १२ फेब्रुवारीस झाले तेव्हा हे व्यक्तिमत्त्व लोपले, पण इतिहास उरलाच.
‘ए ग्रेड’, ‘बी ग्रेड’ अशा प्रतवारीत कलावंतांना बसवून, महिन्याला ठरावीक पगारात त्यांच्याकडून अभिनयकाम करवून घेणारे स्टुडिओ जेव्हा होते, त्या १९५०च्या दशकापासूनचा काळ लिन यांनी पाहिला. तेव्हा ते अभिनेतेही होते. पण ‘निव्वळ अभिनयावर जगण्या’च्या शक्यतेवर त्या काळच्या कोणत्याही पापभीरू मध्यमवर्गीयाप्रमाणे त्यांचाही अविश्वासच; म्हणून मग याच आवडीच्या क्षेत्रात दुसरे काम त्यांनी शोधले. त्या काळी नव्याच असलेल्या चित्रवाणी मालिकांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांची वर्णी लागली आणि पात्रे हुडकण्याचे काम त्यांच्यावर पडले. तेव्हापासून ते २०१६ साली ‘कारकीर्द-गौरवाचा विशेष ऑस्कर पुरस्कार’ (सत्यजीत रायना मिळाला, तसा) मिळेपर्यंतची लिन यांची कारकीर्द त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘योगायोगाने’ घडत गेली.
योगायोगांवरच विश्वास ठेवण्याइतके लिन निर्बुद्ध नव्हते, पण स्वत:बद्दल फार कमी बोलण्याइतपत ‘लीनता’ त्यांच्या ठायी नक्कीच होती. अगदी ‘स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड’तर्फे प्रकट मुलाखत घेतली जाण्याचा (सहसा गाजलेल्या अभिनेत्यांनाच मिळणारा) मान त्यांना मिळाला, तेव्हा त्या मुलाखतीतसुद्धा ‘मी काही कुणाला शोधतबिधत नाही.. अहो, तुम्ही अभिनेत्यांनीच स्वत:तले गुण शोधून त्यांना पैलू पाडलेले असतात ना.. मी फक्त निमित्तमात्र ठरतो’ अशी निवृत्तीपर भूमिकाच त्यांनी घेतली. पण ज्या अभिनेत्यांच्या वृत्ती-प्रवृत्तींना त्यांनी वाव दिला त्यांत जॉन ट्राव्होल्टापासून ‘तूत्सी’मधल्या डस्टिन हॉफमनपर्यंत अनेक ‘ऑस्कर’ विजेत्यांची नावे होती. वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालेले लिन उतारवयात आठवणी जरूर सांगत, पण या दिग्गजांची नावे त्या आठवणींत कमी आणि लहानसहान भूमिका करणाऱ्यांची अधिक असत.
चित्रपटांप्रमाणेच चित्रवाणी-मालिका क्षेत्रातही त्यांनी भरपूर काम केले. पुढे १९९० च्या दशकात तर, कोणत्याही अमेरिकी चित्रवाणी-मालिकेच्या पूर्वप्रसिद्धीचा अविभाज्य भाग म्हणजे, पात्रयोजना कशी केली याबद्दल लिन यांच्या तोंडून काही वाक्ये वदवून घेणे! ‘ऑस्कर’मध्ये पात्रयोजनाकारांना स्थानच नाही, याविषयी त्यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती, पण ही खंत ज्यांच्यासाठी होती त्या इतर- तरुण पात्रयोजनाकारांच्या आधी त्यांनाच ऑस्कर मिळाले.