‘‘अर्थ आणि अन्वय’ या ब्लॉगवरील नवी नोंद- कोविड—१९ विरूद्ध नागरीकरण/एकत्रीकरण ? ’ अशा अर्थाचा विरोप (ईमेल) संदेश माधव दातार यांच्या अनेक वाचकांपर्यंत मंगळवारी (२८ एप्रिल) रात्री पोहोचला आणि बुधवारी सकाळी त्यांची निधनवार्ता आली. अवघ्या पासष्टीच्या दातार यांचे प्राणोत्क्रमण झोपेतच झाले. स्थिर आणि शांत व्यक्तिमत्वाचे दातार, अखेरच्या क्षणीदेखील ही वैशिष्टय़े टिकवणारे ठरले. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना नैमित्तिक लेखक आणि विशेषत: बँकिंग क्षेत्राबद्दल लिहिणारे म्हणून दातार यांची ओळख असेल, पण राजकीय अर्थशास्त्राचे भाष्यकार म्हणून त्यांची नाममुद्रा उमटत होती आणि त्यांच्या संयत, नेमक्या लिखाणाची आज गरजही होती.
माधव दातार यांचे मूळ गाव हिंगोली. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आणि अर्थशास्त्रातील पुढचे- डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईस आले. १९८२ च्या सुमारास ‘आयडीबीआय’ या वित्तसंस्थेत ते अर्थतज्ज्ञ (इकॉनॉमिस्ट) या पदावर रुजू झाले तेव्हा, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘‘शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्या कुणालाही व्यापारी संस्थेत काम करताना अनिश्चितता किंवा हुरहूर वाटते ती’’ (‘एनएसई’चे प्रथमाध्यक्ष डॉ. रा. ह. पाटील यांच्यावरील आदरांजलीलेख, लोकसत्ता/ मे २०१२) दातारांनाही वाटली होती! पण ऑफिसचे काम सांभाळून ज्याला ‘डूइंग’ असा शब्दप्रयोग हल्ली अभ्यासक्षेत्रांत रूढ झाला आहे त्या प्रकारचे- आपल्या विद्याशाखेसंबंधाने वास्तवात जे जे प्रश्न दिसतात त्या साऱ्या प्रश्नांना भिडण्याचे – काम त्यांनी सुरू ठेवले. महाराष्ट्रातील अनेक चळवळी, अनेक संघटना आज ‘माधव दातार आमचेच’ असे सांगतात ते हे- प्रश्नांना भिडणारे माधव दातार! आयडीबीआयची पुढे बँक झाली, तिथेही ते कार्यरत राहिले आणि जनरल मॅनेजर (जोखीम व्यवस्थापन) या पदावरून निवृत्त झाले. त्यांचा पत्ता जुहूऐवजी खारघरचा झाला. मात्र वाचन, आकडेवारीच्या आधारे विश्लेषण आणि लेखन हा शिरस्ता वाढला. ‘ईपीडब्ल्यू’मध्ये एम. के. दातार या नावाने त्यांचे लिखाण येई, पण समाज प्रबोधन पत्रिका, साधना, परिवर्तनाचा वाटसरू आदी नियतकालिकांतून ते राजकीय प्रश्नांकडेही पाहू लागले. ‘अच्छे दिन – एक प्रतीक्षा’ किंवा ‘महाराष्ट्र संकल्पनेचा मागोवा’ ही पुस्तके त्यातून तयार झाली. अर्थशास्त्रांवरील व्यक्तिलेखांचे ‘अर्थचित्रे’ हे पुस्तक, त्या शास्त्राचीही विविधांगी ओळख करून देते. ‘माधवदातार.ब्लॉगस्पॉट.कॉम’ हा ठेवा आंतरजालावर ठेवून दातार आपल्यातून गेले.