प्रशासकीय सेवेत पुरुषांचे वर्चस्व असताना १९७२ मध्ये मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील नीला मांडके (पुढे सत्यनारायण) यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला. मालती तांबे-वैद्य या राज्यातील पहिल्या मराठी आयएएस अधिकारी; त्यांच्यानंतर तीन महिला अधिकारी राज्य सेवेत होत्या, पण तिघी बाहेरच्या राज्यातील. चित्कला झुत्शी व नीला सत्यनारायण या दोघी मूळच्या मराठी अधिकारी. पण प्रशासकीय सेवेसह साहित्यातही नीला सत्यनारायण यांनी ठसा उमटविला.
महाराष्ट्रासारख्या ‘पुरोगामी’ राज्यात मुख्य सचिवपदी अद्याप एकाही महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही; पण राज्याचे निवडणूक आयुक्तपद सत्यनारायण यांनी भूषविले. हे घटनात्मक पद भूषविणाऱ्या त्या आतापर्यंतच्या एकमेव महिला अधिकारी ठरल्या. २०१२ मध्ये झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या देखरेखेखाली पार पडल्या होत्या. निवडणुकांच्या काळात प्रसंगी कठोर भूमिका त्यांनी घेतली होती. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरून एका राजकीय पक्षाला त्यांनी मान्यता रद्द करण्याची नोटीस बजाविली होती. राज्याच्या सेवेत गृह, महसूल, वने, ग्रामीण विकास, समाजकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे सचिवपद त्यांनी भूषविले. महिला सक्षमीकरणावर त्यांचा नेहमी भर असायचा. प्रशासकीय सेवेत असताना ‘होयबा’ व्हायचे नाही, हे तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत पाळले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करताना, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या एका बुजुर्ग आयसीएस अधिकाऱ्याने- ‘साधे राहण्याचा, साधे बोलण्या-लिहिण्याचा’ दिलेला कानमंत्र नीला सत्यनारायण यांनी पुढल्या चार दशकांच्या कारकीर्दीत जपला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेत संस्कृत विषयात प्रावीण्य मिळवून त्या पहिल्या आल्या होत्या, हिंदी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते आणि मराठीविषयीची त्यांच्यातील आस्था त्यांच्या दोन डझनांहून अधिक पुस्तकांत दिसून येतेच. प्रशासकीय सेवेतल्या अनुभवांवर आधारित लेखन त्यांनी केलेच, पण मानवी नातेसंबंध आणि वैयक्तिक जीवनाबाबतही प्रांजळपणे लिहिले. ‘रात्र वणव्याची’ या त्यांच्या कादंबरीवर आधारित दूरदर्शन मालिका, तर त्यांच्या एका कथेवरील ‘बाबांची शाळा’ हा चित्रपटही प्रसिद्ध झाला. टाळेबंदीमुळे आपल्या मतिमंद मुलाची घुसमट होते, कारण त्याला बाहेर फिरायला नेता येत नाही, असे सांगत नीला सत्यनारायण यांनी समाजमाध्यमांतून गेल्याच आठवडय़ात कठोर टाळेबंदीबाबत नापसंती व्यक्त केली होती. दुर्दैवाने त्यांनाच करोनाचा संसर्ग झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले.