फॅशन डिझायनिंग या क्षेत्राला जगात आणि विशेषत: भारतात अतिश्रीमंतांचे फावल्या वेळेतील चोचले असे आजही, काहीसे अन्याय्य भाषेत हिणवले जाते. वस्त्र व पोशाखनिर्मितीची या देशाला मोठी परंपरा आहे, तरीही. पोशाखनिर्मितीचा सौंदर्यशास्त्रीय भान असलेला, परंतु बाजारपेठेलाच केंद्रीभूत मानणारा आविष्कार म्हणून फॅशन डिझायनिंग म्हणता येईल. परंतु फॅशन डिझायनिंगशी निगडित मंडळी आणि सर्वसामान्यांचे विश्व हे नेहमीच एकमेकांशी अंतर ठेवून वाटचाल करताहेत असे जाणवते. हल्लीची परिस्थिती बदलत आहे, तरी अमक्या फॅशन डिझायनरची तमुक निर्मिती (प्रत किंवा कॉपी असली तरी) आपल्याला विवाहसोहळ्यात परिधान करायचीच, यापलीकडे आमचे फॅशनभान जात नाही. तरीही पिअरे कारदँ आम्हा बहुतेकांच्या परिचयाचे असतात. ९८ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले; नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधीच, म्हणजे २९ डिसेंबर रोजी त्यांचा जीवनप्रवास थांबला. इटली ही जन्मभूमी आणि फ्रान्स व विशेषत: पॅरिस ही त्यांची कर्मभूमी. १९२४ मध्ये इटलीतील वाढत्या फॅसिस्टवादाला कंटाळून कारदँ यांचे आईवडील फ्रान्सला आले. त्या वेळी पिअरे दोन वर्षांचे होते. त्यांचे वडील अलेस्सांद्रो कारदँ मूळचे सधन जमीनदार. फ्रान्समध्ये त्यांनी वाइनचा व्यापार सुरू केला. पिअरेने वास्तुविशारद व्हावे, असे त्यांना वाटे. परंतु लहानपणापासूनच पिअरे यांचा ओढा पोशाखनिर्मिती आणि संकल्पनाकडे होता. १४व्या वर्षीच ते एका वस्त्रकाराकडे साहाय्यक म्हणून काम करू लागले. तेथे पोशाखांचे संकल्पन, आरेखन आणि बांधणी ही मूलभूत तंत्रे त्यांनी घोटवून घेतली. १९४५ मध्ये ते पॅरिसला आले. तेथे वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्याची त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली खरी, परंतु फॅशन डिझायनिंगमध्येच कारकीर्द करण्याचे त्यांनी ठरवले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्याँ पाक्वां, एल्सा श्यापारेली, ख्रिस्तियन दिओ अशा मोठय़ा फॅशनकारांकडे त्यांनी उमेदवारी केली. त्यांच्या भविष्यकालीन घडणीसाठी ती मोलाची ठरली.
‘ओट कुटुअर’ प्रकारातील अत्यंत महागडे कपडे बनवण्यात खरे तर त्या वेळच्या कित्येक फ्रेंच आणि इटालियन डिझायनरांची हयात गेली. पिअरे कारदँ यांनी या परंपरेपासून हट्टाने फारकत घेतली. चटकन व्यवस्थित अंगावर घालता येतील, असे कपडे घडवण्यास त्यांनी सुरुवात केली. अर्थातच फॅशनविश्वातील अभिजनांनी त्यांना त्या वेळी वाळीतच टाकले. परंतु पिअरे बधले नाहीत. पोशाखांच्या विविध प्रकारांमध्ये त्यांची मुशाफिरी अविरत सुरू राहिली. महिलांसाठी पोशाख बनवण्याची त्यांची खासियत. १९५०च्या दशकात त्यांनी बनवलेला ‘बबल ड्रेस’ विलक्षण गाजला होता. वास्तुशास्त्राच्या अभ्यासामुळे त्यांचे मितिभान उत्तम होते. रूपबंधाची जाण काळाच्या पुढे पाहणारी होती. पोशाख संकल्पनात त्यांनी भूमितीचा वापर खुबीने केला. मुख्य म्हणजे, अभिजनांचा परीघ भेदून त्यांची निर्मिती बहुजनांमध्येही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरू लागली होती. इतर समकालीन फॅशन डिझायनरांप्रमाणे ते कोषबद्ध राहिले नाहीत. सर्जकता असीम असते हे तत्त्व त्यांनी पाळले. ‘पिअरे कारदँ’ हे नाव काहीशा दर्पयुक्त अभिमानाने त्यांनी वागवले, कारण चाकोरीबाहेरचा विचार करणे किंवा त्यांचे समलिंगी असणे या बाबींचा त्यांची टिंगलटवाळी करण्यासाठीही वापर केला जायचा. आज पिअरे कारदँ हे नाव निव्वळ फॅशनेबल कपडेच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधनांपासून महागडय़ा पेनांपर्यंत विविध बाबींवर झळकते. पिअरे यांची महत्त्वाकांक्षा आणि सर्जनशीलता यांच्या व्याप्तीचा तो पुरावा आहे.