गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ‘राजकारणातील एक पिढी संपुष्टात आली’ असे वाटण्यामागे, त्यांचे ९४ वर्षांचे वय, एवढे एकच कारण नव्हते. त्यांच्या जाण्याने राजकारणात सभ्यता, साधेपणा आणि काही वैचारिक चौकट बाळगत जगणाऱ्यांची एक पिढी संपुष्टात आली हे जास्त महत्त्वाचे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ही देशमुखांची कर्मभूमी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून ते शेतकरी कामगार पक्षाच्या झेंडय़ाखाली राजकारणात आले आणि पुढे मृत्यूपर्यंत त्यांचे पक्षासोबतचे बंध कायम राहिले. १९६२ साली सांगोला मतदारसंघातून ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरा वेळा ते निवडून आले. १९६२ ते अगदी कालपरवा २०१९ पर्यंतच्या या प्रदीर्घ काळात त्यांच्यासाठी १९७२ आणि १९९५ असे दोनच अपवाद ठरले. परंतु गणपतराव यांची ओळख या आकडेवारीहून खूप मोठी आहे. सार्वजनिक जीवनातील आपले सबंध आयुष्य सभ्यता, साधी राहणी आणि मानवी विचारांची कास धरून जगलेला हा नेता. आपल्या ५२ वर्षे आमदारकीचा बहुतांश काळ ते विरोधी बाकावर बसले. राजकीय महत्त्वाकांक्षेतून ना त्यांना कधी शेकापसारखा छोटा पक्ष सोडावा वाटला ना कुणा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जावे वाटले. कधीतरी एकदा आमदार बनलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ता, संपत्ती, डामडौल, पेहराव, भाषा यात पडत जाणारा बदल हा जनतेच्या नित्य अनुभवाचा असताना गणपतराव या राजकीय पटावर तब्बल ५२ वर्षे तसेच साधे सामान्यांमधले राहिले. मोटारी, बंगले, पुण्या-मुंबईत सदनिका, नातेवाईकांचे सत्तेचे जाळे असा कुठलाही मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही. १९६२ साली मंत्रालयात येण्यासाठी एसटीची पायरी चढणाऱ्या या लोकनेत्याने शेवटपर्यंत याच सरकारी वाहनाने प्रवास केला. प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी राहिल्याने त्यांना सर्वाधिक निवृत्ती वेतन मिळत होते. परंतु ही सारी रक्कम त्यांनी पुन्हा समाजासाठी वापरली. आमदार म्हणून मिळणाऱ्या वर्तमानपत्रांची रद्दी विकून ती रक्कम पुन्हा सरकारदरबारी भरणारा हा नेता होता. राजकारणातून कधीच हरवलेली सचोटी, सभ्यता, साधेपणा हीच त्यांची आभूषणे होती. लोकांच्या प्रश्नांसाठी सतत झगडणारा, त्यांच्या जगण्याशी समरस झालेला हा नेता. म्हणूनच त्यांचे अलौकिकत्व हे ते किती काळ आमदार होते, यापेक्षा खूप निराळे आहे. गेल्या काही वर्षांत राजकारणात दुर्मीळ झालेले हे दर्शन त्यांच्या जाण्याने आता जवळपास संपुष्टात आले आहे.
गणपतराव देशमुख
१९६२ साली सांगोला मतदारसंघातून ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 03-08-2021 at 02:09 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politician ganpatrao deshmukh profile zws