विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी) घेतल्यावर त्यांनी आंध्र विद्यापीठ-विशाखापट्टण येथील हवामानशास्त्र विभागातून पीएच.डी. केली. ‘हवामानशास्त्रातील पहिले पीएच.डी.धारक’ असे त्यांचे कौतुक त्यांच्या मूळ राज्यात-आसामात-झाल्यानंतर जोऱ्हाट येथील कृषी विद्यापीठामध्ये, कृषी-हवामानशास्त्र विभागातील प्राध्यापकी स्वीकारली, त्यानंतर संशोधनाच्या अनेक संधी त्यांना खुणावत होत्या. पण त्यांनी निराळ्या संधीला प्रतिसाद दिला… शांततेची संधी! जोऱ्हाटला कृषी विद्यापीठाच्या आवारातच असलेल्या बंगलेवजा घरात त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहून ही संधी कारणी लावली. गुरुवारी, ३ जून रोजी कोविडने झालेल्या त्यांच्या निधनानंतर, एरवी एकमेकांना अप्रामाणिक समजणाऱ्या साऱ्या आसामी राजकीय संघटनांपासून ते आजी-माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी लक्ष्मीनंदन बोरा यांना आदरांजली वाहिली, ती कृषी-हवामानशास्त्रज्ञ म्हणून नव्हे, तर साहित्यिक म्हणून! जिवंतपणीही त्यांचे साहित्यिक कार्यच नावाजले गेले. साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९८८), के.के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सम्मान’ (२००८) आणि २०१५ मध्ये ‘पद्माश्री’ असे मानसन्मान त्यांना मिळाले. ६२ व्या आसामी साहित्य संमेलनाचे-म्हणजे ‘असम साहित्य सभे’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आसामी साहित्यपरंपरा आधुनिकतावादी किंवा सुधारकी, पण आसामच्या अस्मितेचाही आदर करणारी. आधुनिकतावाद आणि अस्मितावाद यांच्यातील द्वंद्व वाढत जाण्याचा काळ गेल्या ५० वर्षांचा; नेमक्या त्याच काळात बोरा साहित्यनिर्मिती करीत होते आणि दूरस्थपणे पाहिल्यास असे दिसते की, आधुनिकतेच्या चिकित्सेपासून त्यांचा प्रवास सुरू होऊन, अस्मितावादी स्मरणरंजनाकडे झाला. अर्थात या प्रवासामध्ये त्यांच्यासह जे साहित्यगुणांचे संचित होते, ते वाचकांसाठी लोभस-रोचकच राहिले. त्यामुळेच तर, त्यांच्या ‘कायाकल्प’ (२००८) चे २२ भाषांत, तर ‘गंगा चिलोनीर पाखी’ (१९६३)चे १८ भाषांत अनुवाद झाले. १९८८ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ‘पाताल भैरवी’(१९८६) ला मिळाला. या तीन गाजलेल्या कादंबऱ्यांसह एकंदर आठ कादंबऱ्या आणि सात कथासंग्रहांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, पण त्यांची एकूण पुस्तकसंख्या ६० वर जाते. ग्रामीण-शहरी मूल्यसंघर्षापासून बोरा यांचा मूल्यप्रवास सुरू होतो आणि शंकरदेव व महादेव या आसामी संतांविषयीच्या चरित्रकादंबऱ्या लिहून मग, ‘कायाकल्प’पाशी पोहोचतो! या कादंबरीचा नायक अनुज कृपलानी हा यशस्वी शास्त्रज्ञ. घरच्या कटकटींना वैतागून, मराठीतल्या भाऊ पाध्यांच्या ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’सारखा हा अनुज एका दुर्गम हिमालयीन खेड्यात येतो. तिथे त्याला मन:शांती मिळतेच, पण चिरतारुण्य देणारे औषध कसे बनवावे, याचे गुपितही एका योग्याकडून मिळते. प्रयोगशाळेत ‘कायाकल्प’औषध कसे बनवायचे, याचे आडाखे अनुज मांडतो खरा, पण ‘हे गुपित कायमच राखावे’ असा निर्णय तो घेतो! एक प्रकारे, विज्ञानाची नैतिक मर्यादा स्वीकारतो.

‘अखिल आसाम स्टुडंट्स युनियन’ (आसू) च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे १९८३ मध्ये ‘रासुका’खाली बंदिवान झालेल्या बोरांनी ‘रंगपूर’ (जुन्या आहोम राजधानीचे नाव) या अल्पजीवी नियतकालिकाचे संपादनही केले. त्यांच्या निधनाने आसामी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे.

Story img Loader