यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत अविस्मरणीय सुवर्णपदक जिंकल्याने देशभर सुरू झालेला उत्सवजल्लोष अद्याप ओसरलेला नाही. या जल्लोषातही ओ. एम. नंबियार यांचे निवर्तणे खंतावणारे ठरले. ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या सुवर्णफेकीपूर्वी जे मोजके अ‍ॅथलीट पदकाच्या जवळपास गेले ते होते मिल्खासिंग आणि पी. टी. उषा. मिल्खासिंग दुङ्मखद पार्श्वभूमीतून जवळपास स्वयंभू घडले. उषा मात्र घडवावी लागली.

केरळमध्ये पायोली येथील या सुसाट पळणाऱ्या मुलीला जागतिक दर्जाची अ‍ॅथलीट बनविले नंबियार सरांनीच. भारतीय हवाईदलात ते रुजू झाले, अ‍ॅथलेटिक्समध्येच नाव कमावण्यासाठी. शिस्त आणि प्रशिक्षण या खेळाडू बनण्यासाठी अत्यावश्यक बाबी आणि जोडीला शाश्वत रोजगार अशी त्रिसूत्री त्या काळात सैन्यदलांमध्येच उपलब्ध व्हायची. मिल्खासिंग याचे ठसठशीत उदाहरण. पण गुणवत्ता असूनही नंबियार यांना अ‍ॅथलेटिक्समध्ये अत्युच्च स्तर गाठता आला नाही. त्याचा विषाद न बाळगता ते प्रशिक्षणाकडे वळले. पतियाळात रीतसर प्रशिक्षण पदविका घेऊन ते केरळ सरकारच्या अमदानीत रुजू झाले.

यानंतर बरोबर सहा वर्षांनी त्यांनी एका उंचेल्या मुलीला विशेष प्रशिक्षणासाठी निवडले. या मुलीचे वैशिष्ट्य म्हणजे, नंबियार सरांनी सांगितलेल्या सगळ्या कवायती ती वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण करायची. पिलावुल्लकंदी थेकेपरम्बिल अर्थात पी. टी. उषा हे तिचे नाव. ‘पायोली एक्स्प्रेस’ असे तिचे नामकरण झाले होते. पण निव्वळ वेगवान असून शर्यती जिंकता येत नाहीत, त्यासाठी वेगाबरोबर तंत्रही आत्मसात करावे लागते. हे तंत्र नंबियार सरांनी उषाकडून घोटवून घेतले. उषा १०० मीटर्स आणि २०० मीटर्समध्ये निपुण होती. १९८२ दिल्ली एशियाडमध्ये तिने याच दोन प्रकारांमध्ये रौप्यपदके जिंकली होती. लांब-लांब ढांगा टाकत धावण्याची तिची ढब पाहून नंबियार सरांनी तिला ४०० मीटर्स हर्डल्स प्रकारात धावण्यासाठी तयार केले. १९८४ लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये याच प्रकारात उषाचे कांस्यपदक एकशतांश सेकंदाने हुकले. याची हळहळ देशवासीयांबरोबरच नंबियार सरांनाही होती.

परंतु न खचता त्यांनी उषाला अधिक परिपूर्ण अ‍ॅथलीट बनवण्यासाठी प्रयत्न केले. सोल एशियाडमध्ये तिने २०० मीटर्स, ४०० मीटर्स, ४०० मीटर्स हर्डल्स आणि ४ बाय ४०० मीटर्स रिले शर्यतींमध्ये सुवर्णपदके जिंकली. त्या वेळची ‘स्प्रिंट क्वीन’ म्हणवली जाणारी फिलिपिन्सची लिडिया द व्हेगा हिच्याबरोबर तिच्या शर्यती विलक्षण रंगल्या. लिडियाची सद्दी मोडून भारताचे नाव जागतिक अ‍ॅथलेटिक्स नकाशावर झळकवण्यात उषाचा वाटा मोठाच. पण तिच्या या कामगिरीमागील प्रेरणा होती नंबियार सरांची.

१९८४ आणि १९८६मधील उत्तम कामगिरीनंतर अनेक परदेशी प्रशिक्षकांनी उषाला स्वतङ्महून प्रशिक्षण पुरवण्याविषयी विचारले. पण नंबियार सरांची ही शिष्योत्तमा अखेरपर्यंत गुरूंशी एकनिष्ठ राहिली. द्रोणाचार्य पुरस्कार सुरू झाले, त्या पहिल्याच वर्षी म्हणजे १९८५मध्ये तो प्राप्त झालेल्या तीन गुरूंपैकी नंबियार एक. आज ते कार्यरत असते, तर अधिक आधुनिक सुविधांच्या जोरावर त्यांनी आणखीही ‘उषा’ तयार केल्या असत्या.

Story img Loader