सतार हे वाद्य ऐकायला जेवढे मधुर तेवढेच वाजवण्यास अवघड. त्यावर हुकमत मिळवण्यासाठी बोटांना डोळे यावे लागतात. पंडित देबब्रत (देबू) चौधरी हे अशा अनेक ज्येष्ठ सतार वादकांपैकी एक. त्यांचे चिरंजीव प्रतीक चौधरी हेही आजच्या काळातील एक अतिशय महत्त्वाचे वादक. या दोघाही पितापुत्रांचे अगदी आठवड्याच्या अंतराने करोनामुळे निधन होणे हा संगीताच्या क्षेत्रावरील दुहेरी आघात आहे. गेली अनेक दशके  या पितापुत्रांनी सतारीच्या दुनियेत अखंड साधना करून आपले वेगळेपण सिद्ध के ले होते.

सेनिया घराण्याचे देबू चौधरी यांनी पंछू गोपाल दत्ता तसेच उस्ताद मुश्ताक अली खाँ यांच्याकडे तालीम घेतली. संगीताबरोबरच लेखक म्हणूनही आपली वेगळी ओळख सिद्ध केली होती. नवरागनिर्मितीच्या ध्यासातून त्यांनी आठ नव्या रागांची रचना के ली. त्यांच्या नावावर सहा ग्रंथ जमा आहेत, त्यांपैकी ‘सितार अ‍ॅण्ड इट्स टेक्नीक’  (१९८१) हा पहिला ग्रंथ  विद्यापीठीय क्षेत्रात प्रमाणग्रंथ मानला जातो. ‘सितार अ‍ॅण्ड इट्स म्यूझिक’ (२०१४) या पुस्तकावर सहलेखक म्हणून प्रतीक चौधरी यांचेही नाव आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून सतारीवर हात फिरवणाऱ्या देबब्रत यांचा वयाच्या अठराव्या वर्षी आकाशवाणीवर कार्यक्रम झाला आणि तेव्हापासूनच ते नावारूपाला आले. उत्तम वादक आणि उत्तम अध्यापक असा त्यांचा लौकिक होता. दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागाचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले. या विद्यापीठातील त्यांची सुमारे दोन दशकांची कारकीर्द त्यांचे शिष्य आजही आठवतात. अमेरिकेत दिवसाच्या २४ तासांसाठी २४ सीडीजचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. ‘पद्माभूषण’ (१९९२) चे मानकरी असलेल्या देबूजींनी प्रत्यक्ष मैफिली वादन व शिक्षण-संशोधन अशा दोन्ही क्षेत्रांत मोठी कामगिरी के ली.

त्यांचे पुत्र पंडित प्रतीक यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सतारवादनाच्याच क्षेत्रात आपले जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. जन्मापासूनच सतारीचा झंकार ऐकत आलेल्या प्रतीक यांनी देशभरातील अनेक संगीत महोत्सवातून आपली कला सादर केली. बनारसच्या संकटमोचन संगीत महोत्सवाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. देशातील एक अत्यंत महत्त्वाचे कलावंत म्हणून प्रतीक यांना मान होता. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात सतारवादक म्हणून रसिकांमध्ये स्थान निर्माण करणे ही क्वचित घडणारी गोष्ट. ती प्रतीक यांनी साध्य केली होती. वडिलांचे छत्र असले, तरी मुलाला रसिकांसमोर स्वत: परीक्षा द्यावी लागते. ‘सांगे वडिलांची कीर्ती’ असे म्हणत प्रयोगकलांच्या दुनियेत कोणालाच मानाचे स्थान मिळत नाही. प्रतीक यांनी ते स्वष्टाने मिळवले आणि त्यासाठी प्रचंड साधना केली. कलावंत म्हणून लौकिक मिळवलेल्यांपैकी फारच थोड्यांना संशोधन, अध्यापन यांसारख्या शैक्षणिक बाबींमध्येही रस असतो. देबब्रत यांच्याप्रमाणेच प्रतीक यांनीही दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात के ली. प्रतीक यांना वडील देबब्रत हे गुरू म्हणून लाभलेच परंतु देबू यांचे गुरू उस्ताद मुश्ताक अली खाँ यांच्याकडे प्रतीक यांनाही सतारीचे शिक्षण घेता आले. गुरू आणि शिष्य, पिता आणि पुत्र अशा दोघाही स्वरसाधकांचे निधन ही संगीतक्षेत्रासाठी चटका लावणारी घटना ठरली आहे.

Story img Loader