संगीत-इतिहासाचे संशोधक, रससिद्धान्ताचे अभ्यासक, समकालीन चित्रकलेचे संग्राहक आणि लघुचित्रशैलींचे जाणकार, मेवाती घराण्याचे एक गायक आणि इतिहासाचे प्राध्यापक अशी मुकुंद लाठ यांची ओळख वैविध्यपूर्ण असली तरी त्या वैविध्यात एक सूत्र होते, ते म्हणजे भारतीय आधुनिकतेचा शोध! स्वातंत्र्योत्तर काळात जाणतेपण आलेल्या पहिल्या पिढीतील प्रा. लाठ वयाच्या ८३व्या वर्षी, ६ ऑगस्ट रोजी निवर्तले. इंग्रजी आणि हिंदीत त्यांनी लिहिलेली पुस्तके आता असतीलच, पण लाठ यांचे – कुणाशीही अदबीने बोलणारे आणि अवघ्या दोनतीन वाक्यांत आपलेसे करून, विशेषत: कलास्वादाकडे गप्पांचा ओघ नेणारे – व्यक्तित्व यापुढे नसेल.

कोलकातास्थित मारवाडी कुटुंबात १९३७ साली जन्मलेले मुकुंद लाठ तिथल्याच जादवपूर विद्यापीठातून संस्कृतमध्ये एम. ए. झाले आणि पीएच.डी.साठी दिल्ली विद्यापीठात आले. दिल्लीत येण्याचे दुसरेही कारण होते- कंठय़संगीताचे रीतसर शिक्षण ते घेत होते. यात खंड आला तो, दीर्घकाळ भारतात राहिलेले आणि भारतीय संगीताचा आदर करणारे फ्रेंच संगीताचार्य अ‍ॅलेन डॅनिएलू यांनी तत्कालीन पश्चिम बर्लिनमध्ये ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर कम्पॅरेटिव्ह म्युझिक स्टडीज अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन’ ही संस्था स्थापल्यानंतर, लाठ यांची पाठय़वृत्तीसाठी निवड केली तेव्हा. ही पाठय़वृत्ती मिळाली, कारण लाठ ‘दत्तिलम्’वर पीएच.डी. करत होते. ‘नाटय़शास्त्र’कार भरताचे पुत्र दत्तिल यांनी संगीतावर लिहिलेला तो आद्यग्रंथ बर्लिनमध्ये होता आणि त्याच्या अभ्यासाची आच डॅनिएलू आणि लाठ, दोघांनाही होती. ही पदवी मिळाल्यावर जयपूरमध्ये राजस्थान विद्यापीठाच्या इतिहास व संस्कृती विभागात प्रा. लाठ रुजू झाले, ते १९९७ पर्यंत तेथे होते. येथेच त्यांच्या सहकाऱ्यांसह आणि मे. पुं. रेगे यांच्या सहकार्याने पाश्चात्त्य व भारतीय तत्त्वज्ञानाचा ‘संवाद’ हा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. सेक्रेड म्युझिक ऑफ एन्शन्ट इंडिया (१९७८), ट्रान्सफॉर्मेशन अ‍ॅज क्रिएशन (१९९८) ही इंग्रजी; तर ‘संगीत एवं चिंतन’, ‘धर्मसंकट और कर्मचेतना के आयाम’, ‘संगीत और संस्कृति’, नामदेवांच्या हिंदी पदावलीचे संपादन तसेच  ‘अनरहनी रहने दो’ (काव्यसंग्रह) व अंधेरे के रंग (ललितगद्य) ही त्यांची पुस्तके. ‘संगीत नाटक अकादमी’चे फेलो आणि ‘पद्मश्री’ (२०१०) या सन्मानांनी त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या पत्नी नीरजा डिझायनर, तर पुत्र अभिजीत हे कोलकाता व दिल्ली येथील ‘आकार प्राकार’ आधुनिक कलादालनाचे संस्थापक.. दुसऱ्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मान्य करण्याचा पाया असा कुटुंबातही घट्ट! भारतीयतेवर अभ्यासूपणे, दुसऱ्याचा किंचितही अनादर न करता निस्सीम प्रेम कसे करावे, याची दिशा दाखवणारा एक स्तंभ त्यांच्या जाण्याने निखळला आहे.

Story img Loader