बॅडमिंटन प्रशिक्षणाने व्यावसायिक रूप धारण केले नव्हते, तेव्हापासून खेळाडू घडवण्याचा वसा घेणारे पुण्यातील निष्ठावंत बॅडमिंटन प्रशिक्षक वसंत गोरे यांचे नुकतेच निधन झाले. बॅडमिंटनमधील प्राथमिक शिक्षण हा त्यांचा हातखंडा. त्यामुळे खेळाडू विशिष्ट दर्जापर्यंत पोहोचला की, पुढील प्रशिक्षणासाठी अन्य मार्गदर्शकाकडे जाण्याचा सल्ला गोरे स्वत:हून देत, नव्हे हेच त्यांचे तत्त्वज्ञान होते. मंजूषा पावनगडकर-कन्वर, तृप्ती मुरगुंडे, धन्या नायर, सावनी जोशी, गौरवी वांबुरकर आणि अदिती मुटाटकर यांच्यासारख्या राष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटनपटूंनी सुरुवातीचे धडे गोरे यांच्याकडे गिरवले. अगदी २०१५ पर्यंत त्यांचे प्रशिक्षणकार्य अथक सुरू होते.
गोरे यांचा जन्म लाहोरमध्ये झाला; परंतु आईवडिलांच्या अपघाती निधनानंतर १९४७च्या फाळणीमुळे हे कुटुंब बडोद्याला स्थलांतरित झाले. या कुटुंबाला खेळाची अतिशय आवड. त्यांचा भाऊ क्रिकेटपटू, तर बहीण राष्ट्रीय टेबल टेनिसपटू. ते स्वत:ही सुरुवातीला क्रिकेट खेळत; पण अपेक्षित यश न मिळाल्यामुळे नंतर हॉकीकडे वळले. पुण्यात वास्तव्यास आल्यावर बृहन्महाराष्ट्र कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. वयाच्या विसाव्या वर्षी ते बॅडमिंटन खेळू लागले. नंतर युको बँकेत नोकरीला लागल्यावर तिथेही खेळण्यासह मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. हिराबाग क्लब व पीवायसी जिमखाना क्लबकडूनही ते खेळले; परंतु खेळण्यापेक्षा मुलांना शिकवण्यात ते अधिक रमत. बालभवन येथे त्यांनी बरीच वर्षे मुलांना मार्गदर्शन केले. ते तंदुरुस्तीविषयी अतिशय जागरूक होते. निवृत्तीनंतरही मुलांना मार्गदर्शन करतानाच पुस्तकांचे वाचन व देशभर भ्रमंती त्यांनी केली. आपल्या जुनाट स्कूटरवरून ते मार्गदर्शनाच्या ईप्सित स्थळी पोहोचायचे. ‘या साठ वर्षांहून अधिक वर्षे साथ देणाऱ्या स्कूटरसह माझ्या अनेक ऋणानुबंधाच्या आठवणी आहेत, त्यामुळे ती मी बदलणार नाही,’ असे ते ठणकावून सांगत.
विविध खेळांमधील गरजू खेळाडूंना आर्थिक पाठबळ देण्याचे क्रीडा-सामाजिक कार्य करणाऱ्या ‘खेळप्रसार’ संस्थेच्या स्थापनेत गोरे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांना पुरस्कार, पैसा यांचा हव्यास मुळीच नव्हता. सरावाला नेहमी साधे कॅन्व्हासचे शूज घालूनच जायचे. एकदा भेट म्हणून आलेले योनेक्सचे महागडे शूज घालून ते सरावाला गेले; परंतु तिथे एका गरजवंताला ते शूज देऊन आले. आपल्याकडील बरेचसे क्रीडा साहित्य त्यांनी गरजू खेळाडूंना दिले. करोनामय स्थितीमुळे गोरे यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या शिष्यांसह बॅडमिंटन क्षेत्रातील अनेकांना हजर राहता आले नाही; परंतु समाजमाध्यमांद्वारे अनेकांनी त्यांना यथोचित श्रेय दिले.