जमिनीवर चालणारी गाडी अचानक एखाद्या बोटीसारखी पाण्यातूनही जाऊ लागली तर.. परदेशात सर्रास अशा गाडय़ा दिसतात, मात्र भारतात अद्याप अशी गाडी तयार झाली नव्हती. भारतातील पहिली उभयचर किंवा अँफिबियन जीप मुंबईतल्या उदय लोंढे यांनी तयार केली आहे..
मुंबईतल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक विचार नक्कीच येऊन गेलेला असतो. आपल्या वाहनाला पंख असते तर किंवा बदकाप्रमाणे आपलं वाहन पाण्यातूनही लीलया पार गेलं असतं तर.. पण हा विचार प्रत्यक्षात येत नसल्याने सगळे गपगुमान समोरच्या गाडीचा धूर खात उभे असतात. त्याच वेळी कधी परदेशात जाण्याचा योग आला, तर मात्र अशा जमिनीवर आणि पाण्यातही चालणाऱ्या गाडय़ा, दुचाकी आढळतात. मग लोक त्या गाडय़ांचं कौतुक करत स्वदेशात परततात आणि वाहतूक कोंडीत अडकल्यावर पुन्हा तसंच स्वप्न रंगवायला सुरुवात करतात.
पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ घातलं आहे. मुंबईतील पेशाने स्थापत्यविशारद असलेल्या उदय लोंढे यांनी भारतातली पहिलीवहिली अँफिबियन जीप तयार केली आहे. विशेष म्हणजे सध्या परदेशातून एक अँफिबियन बस घेण्याचा प्रस्तावही एमटीडीसी आणि जेएनपीटी यांच्यामार्फत अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्याच वेळी संपूर्णपणे देशी बनावटीची ही जीप तयार झाली आहे. ही जीप पाहताना मानवी कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते.
बाहेरून पाहताना ही जीप अगदी अमेरिकन आर्मीच्या जीपप्रमाणेच दिसते. पण हात लावून पाहिल्यानंतर ही जीप लोखंड, स्टील, पत्रा किंवा अल्युमिनियमपासून नाही, तर चक्क लाकडापासून तयार केली असल्याचा साक्षात्कार होतो. ही जीप तयार करण्याआधी लोंढे यांनी खूप बारकाईने जीपची रेखाटने काढली. त्यानंतर प्रत्येक भागाची रेखाटने लाकडावर काढून ते भाग तसेच कापून घेतले. हे भाग एकत्र जोडून ही जीप तयार करण्यात आली आहे. गाडीची चेसिस मात्र अल्युमिनियमची आहे. गाडी तयार करण्यासाठी खास मरिन प्लायवूड वापरण्यात आले आहे. त्यानंतर त्यावर वॉटरप्रूफ कलर देण्यात आला आहे. गाडीचं इंजिन मागच्या बाजूला असून ते वरती ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे पाण्याचा आणि इंजिनाचा एकमेकांशी काहीच संबंध येत नाही. त्याचप्रमाणे गाडी पाण्यातून चालवण्यासाठी ट्रॉलर फॅन देण्यात आला आहे. हा फॅन मागच्या बाजूला लावला जातो. गाडी जमिनीवरून चालताना तो काढून ठेवता येतो.
गाडीचं इंजिन ४०० सीसी पेट्रोल एवढय़ा क्षमतेचं आहे. या गाडीतून दोन जण प्रवास करू शकतात. तसेच ही गाडी एलपीजी गॅसवरही धावू शकते. गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर असून गाडीच्या चारही चाकांवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. ट्रॉलर फॅन चालण्यासाठी लागणाऱ्या बॅटरीज् गाडीच्या पुढील बॉनेटमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या बॅटरीज मरिीन बॅटरीज असल्याने पाण्यात भिजल्या तरी त्या चालू राहतात.
सध्या अशा प्रकारची एकच जीप तयार करण्यात आली आहे. या जीपची किंमत १० ते १२ लाखांच्या आसपास आहे. ही जीप नदीचं पाणी, तलाव किंवा धरणात चालू शकते. त्याचप्रमाणे शेतीच्या कामासाठीही ही जीप वापरता येऊ शकते. ही जीप मोठय़ा प्रमाणावर तयार करता यावी, यासाठी आता उदय लोंढे यांनी नितीन गडकरी यांच्यापासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेकांसह पत्रव्यवहारही केला आहे. मेक इन इंडिया ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. वास्तविक परदेशी कंपन्यांपेक्षा खूपच कमी खर्चात त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अशा अँफिबियन गाडय़ा तयार करू शकतो. मात्र त्यासाठी सरकारची मदत लागणार आहे, असे उदय लोंढे यांनी सांगितले.
– रोहन टिल्लू
rohan.tillu@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा