कारचे इंजिन हा कारमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यावर कारची कामगिरी अवलंबून असते. इंजिन चांगले असल्यास देखभाल खर्च कमी होतो. इंजिन चांगले असल्याने काही कंपन्यांची विक्रमी विक्री झाली आहे, तर काही कंपन्या या उत्तम इंजिन उत्पादक म्हणून नावारूपाला आल्या. सध्या वापरात असलेल्या व चांगल्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा घेतलेला आढावा.
गाडी मग ती कोणतीही असो दुचाकी की चारचाकी आपल्याला त्याबद्दल उत्सुकता असतेच. त्यामुळेच भलेही बाजारात आलेली प्रत्येक गाडी घेऊच असे नाही. पण, तिच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. गाडीचे रंग, रूप, फीचर यांच्याबद्दल जोरदार चर्चा होते वा ती सर्वाधिक चर्चिली जाते. पण, गाडीचे इंजिन याबाबत चर्चा वा त्याबद्दल जाणून घेण्यात फारची रुची नसते. गाडीला किती सीसीचे, किती बीएचपीचे, कोणत्या तंत्रज्ञानाचे इंजिन बसविले आहे, यावर भर देण्यापेक्षा ते इंजिन किती इंधनक्षम आहे याबद्दल फार तर विचारणा होते.
प्रत्यक्षात कारचे स्टाइल, फीचर, डिझाइन यापेक्षाही महत्त्वाचे इंजिन असते आणि त्याबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यावर भर दिला पाहिजे. इंजिनाबद्दल माहिती ही आपला मेकॅनिक वा तज्ज्ञांकडून नक्कीच मिळू शकते. काही वेळा कंपन्याही आपल्या इंजिनाची जाहिरात करतात. कारण, इंजिन दमदार तर गाडीची कामगिरी दमदार, असे एक गणितच असते. इंजिन जेवढे चांगले तेवढा कारचा देखभाल खर्च कमी असतो. अर्थात, काही कारचे सुटे भाग महाग असतात, हे वेगळे. पण, असो. इंजिन हे गाडीमधील महत्त्वाचा हिस्सा आहे. काही वेळा इंजिन चांगले असूनही बाजारात गाडी चालत नाही, या मागे वेगवेगळी कारणे असतात. दुचाकीपेक्षा कार उत्पादक कंपन्यांकडून इंजिनबद्दल अधिक माहिती जाहीर केली जाते.
मारुती सुझुकी, ह्यूंदाई या कार कंपन्यांची इंजिन गाजलेली आहेत. तसेच, काही कंपन्यांची इंजिन चांगली असली तरी त्यांच्या कार मात्र व्यावसायिक पातळीवर अपयशी ठरल्याची उदाहरणे आहेत. यावेळी कोणत्याही कारबद्दल माहिती न लिहिता इंजिनाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
के सीरिज पेट्रोल इंजिन
गेल्या दोन दशकात देशातील वाहन तंत्रज्ञानात नक्कीच बदल झाला आहे आणि पर्यावरणाचे निकष बदलल्याने तसेच मायलेज प्रिय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्याबरोबर अधिकाधिक बाजारहिस्सा काबीज करण्यासाठी उत्तम इंजिनाची निर्मिती करण्यावरही कार उत्पादक कंपन्यांनी भर दिला आहे. पेट्रोल इंजिनमध्ये २००५ नंतर सर्वाधिक बदल झाले आणि इंजिनमध्ये अॅल्युमिनियमचा वापरदेखील वाढला. यामुळे इंजिनाचे लाइफ वाढते. मारुती सुझुकीने २००८ मध्ये आपल्या पेट्रोल इंजिनमध्ये मोठा बदल केला आणि पूर्वीच्या इंजिनच्या जागी अधिक इंधनक्षम, ताकदवान इंजिन विकसित केले. हेच इंजिन पुढे के-सीरिज इंजिन म्हणून प्रसिद्ध झाले. केवळ भारतीय बाजारपेठेसाठीच नव्हे तर जागतिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या सुझुकीच्या प्रत्येक पेट्रोल कारसाठी हे इंजिन वापरण्यात येत आहे. इंजिनची कामगिरी दमदार असल्याने मारुतीच्या अनेक पेट्रोल कार यशस्वी झाल्या असून, विक्रीचे विक्रमही स्थापित केले आहेत. तसेच, या इंजिनला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. के-सीरिज इंजिन सुरुवातीस २००८ मध्ये मारुती सुझुकीने भारतात ए-स्टार (आता विक्री नाही) या कारमध्ये बसविले आणि त्यानंतर अल्टो के १०, सेलेरियो, वॅगन आर, स्विफ्ट डिझाइयर, अर्टिगा, रिट्स, सियाझ या कारना बसविले गेले आहे. नवीन इंजिनमध्ये कंपनीने कार्बन डायऑक्साइडचे पहिल्या तुलनेत कमी उत्सर्जन प्रमाण, इंजिनच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यावर भर दिला गेला आहे. यांच्यामुळे मायलेजमध्ये कमालीची सुधारणा होऊ शकली आहे. मारुती सुझुकीचे के सीरिज इंजिन एक हजार सीसीपासून सुरू असून, कारच्या सेगमेंटनुसार त्याच्या सीसीमध्ये बदल करण्यात आला आहे. इंजिन पॉवर ६७ बीएचपीपासून ९० बीएचपीपर्यंत आहे. त्यामुळेच इंजिनच्या क्षमतेनुसार व मॉडेलनुसार मायलेजमध्येही फरक आहे. एक हजार सीसीचे व ६७ बीएचपी असलेल्या अल्टो के १० कारचे मायलेज प्रति लिटर २४.०७ असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच, वॅगनआर, सेलेरियो यांनाही एक हजार सीसीचे इंजिन बसविले आहे आणि या कारचे मायलेजही जवळपास सारखे आहे. मात्र, या कारना सीएनजीचा पर्याय असल्याने त्याचे मायलेज यापेक्षाही अधिक आहे. के सीरिजमधील १.२ लिटर इंजिनचे मायलेज प्रति लिटर २२ किमी, तर १.४ लिटर इंजिनचे मायलेज प्रति लिटर २० किमी आहे. मायलेज, मेंटेनन्स फ्रेंडली इंजिन असल्याने मारुती सुझुकीचे के सीरिज इंजिन प्रसिद्ध आहे. डिझेल इंजिनच्या कार मारुती सुझुकी विकत असली तरी डिझेल इंजिन मारुती सुझुकी उत्पादित करीत नाही. मात्र, मारुती वापरत असलेले डिझेल इंजिन उत्तम आहे.
१.३ लिटर मल्टिजेट डिझेल इंजिन
डिझेल इंजिनचे तंत्रज्ञान सुधारल्याने कार उत्पादक कंपन्यांनी डिझेल इंजिन असलेल्या कार बाजारात आणण्यास सुरुवात केली. उत्तम इंजिन, उत्तम मायलेज, कमी आवाज, कमी देखभाल तसेच, डिझेल आणि पेट्रोलच्या दरात असणारी मोठी (पाच-सहा वर्षांपूर्वी) तफावत यांच्यामुळे भारतात डिझेल कारची विक्रीही जोरात होती. आता पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये फरक मोठा नसल तरी तो आहे आणि दिवसाला किमान पन्नास ते सत्तर किमी रनिंग असणारे डिझेल कारच घेणे पसंत करतात. मारुती सुझुकीच्या रिट्स, स्विफ्ट, डिझायर, इग्निस, व्हिटारा ब्रेझा, सियाझ आदी कारना वापरण्यात येणारे डिझेल इंजिन हे फियाटचे १.३ लिटरचे मल्टिजेट डिझेल इंजिन आहे. तसेच, टाटा मोटर्सही अनेक वर्षे व्हिस्टा आणि मांझा या कारसाठी आणि आता झेस्ट आणि बोल्ट कारसाठी इंजिन वापरते. या इंजिनास क्वाड्राजेट इंजिन असे म्हंटले असून, ते १.३ लिटर ७५ पीएस व ९० पीएस पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यातील ७५ पीस पॉवर आणि १९० एनएम टॉर्क असणारम्य़ा इंजिनला जॉमेट्री टर्बोचार्जर आहे. मात्र, प्रत्येक कार कंपनीनुसार इंजिची पॉवर व टॉर्कमध्ये फरक आहे. ९० पीएस पॉवर आणि २०० एनएम असणारे इंजिन हे डिझेलमध्ये कॉम्पॅक्ट सेदान वा प्रीमियम हॅचबॅक कारमध्ये वापरले जाते. ९० पीएसमुळे इंजिनच्या पिकअपमध्ये कमालीचा फरक जाणवतो. या इंजिनमध्ये व्हेरिएबल जॉमेट्री टबरेचार्जर वापरला जातो. यामुळे आवश्यकता असताना इंजिनला अतिरिक्त पॉवर देता येते. ९० पीएसची कार चालविताना पॉवर कमी पडत असल्याचे जाणवत नाही. फियाटचे मल्टिजेट डिझेल इंजिन चांगले असल्यानेच मारुती सुझुकीच्या डिझेल मॉडेलनाही चांगली मागणी आहे. मात्र, उत्तम इंजिनचे उत्पादन करणाऱ्या फियाटच्या कारना ग्राहकांनी आपलेसे केले नाही. त्यामुळे फियाटची कार विक्री ही अगदी मर्यादित आहे.
कप्पा इंजिन
जागतिक पातळीवर पर्यावरण मानकांचे निकष बदलल्यावर ह्यूंदाईनेही आपल्या कारच्या इंजिन तंत्रज्ञानामध्ये बदल केला. पहिल्या इंजिनचे उत्पादन थांबवून नव्याने विकसित केलेले अॅल्युमिनियचा वापर केलेले कप्पा इंजिन आपल्या कारमध्ये वापरण्यास सुरुवात केली. भारतात याची सुरुवात आय १० या कारपासून सुरू झाली. हे इंजिन १.२ लिटर ते १.४ लिटर क्षमतेचे असून, ते ७७ पीएस ते १०७ पीएस पॉवरचे आहे. पहिल्या इंजिनच्या तुलनेत हलके आणि अधिक मायलेज देणारे, कमी प्रदूषण करणारे, असे हे ह्यूंदाईचे इंजिन आहे. यामध्ये मल्टि पॉइंट फ्यूएल इंजेक्शन प्रणाली वापरण्यात आली आहे. यामुळे इंजिनला अपेक्षित असा इंधन पुरवठा आणि ताकद मिळते. कप्पा इंजिन भारतात ग्रँड आय टेन, एक्सेंट, व्हर्ना या कारमध्ये वापरण्यात येत आहे. कप्पा इंजिनचे मायलेज प्रति लिटर १८-२० किमीपेक्षा अधिक आहे. मात्र, कारच्या मॉडेल आणि बीएचपीनुसार यामध्ये फरक आहे. एपीएफआय सिस्टिममध्ये बॅच्ड्, सायमलटेनियस आणि स्विक्वेन्शियल, असे तीन प्रकार आहेत. मारुती सुझुकी, ह्यूंदाई तसेच अन्य कंपन्याही पेट्रोल इंजिनासाठी एपीएफआय हीच सिस्टम वापरण्यात येत आहे.