वाहननिर्मिती उद्योग एक हा मोठा उद्योग आहे. खरेदीदारांच्या मनात आपल्या उत्पादनाने घर करणे, अधिकाधिक वाहने विकणे आणि अधिक विक्रीबरोबरच वाढीव नफा कमाविणे हे या उद्योगाचे मुख्य उद्दिष्ट असते. याव्यतिरिक्त काही कंपन्या अशा असतात की, त्यांची उत्पादने अव्वल असूनही त्यांना त्यांची विक्री अधिक वाढवायची नसते. रोल्स रॉईस, फेरारी, बुगाटी, लॅम्बोर्गिनी अशी ती काही नावे आहेत.
वाहन खरेदीदार मुख्यत्वे किमतच पाहतात. कोणतेही वाहन निवडताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. तुमची एखादी ठरावीक खर्चमर्यादा असली की तुम्ही मग त्या कारचा लुक, तिचे मायलेज हे सर्व दुर्लक्षिता. वाहन खरेदीमध्ये किंमत ही निर्णयक्षमतेत महत्त्वाची बाब ठरते. कंपन्याही त्यांचे कोणतेही वाहन बाजारात आणताना किंमत काय ठेवायची यावर खूप खल करतात. बाजारपेठेचा अंदाज घेऊन, स्पर्धकांना गृहीत धरून आणि महसूल-नफ्याचा अंदाज घेऊन वाहनाची किंमत निश्चित केली जाते. नफा असल्याशिवाय वाहने तयार करणे, त्यांची विक्री करणे कोणत्याही कंपनीला परवडणारे नाही.
बाजारात आज अशा अनेक कार आहेत ज्या उत्कृष्ट तंत्रज्ञाने सज्ज आहेत पण केवळ अयोग्य किंमतीमुळे त्या अपयशी ठरल्या आहेत. अशा कारच्या किमतीबाबत योग्य निर्णय घेतला गेला असता तर त्यांची विक्री निश्चितच वाढली असती. कोणत्याही कारची कमी किंमत म्हणजे कमी नफा हे झालेच. पण यामुळे त्यांची विक्रीसंख्या वाढू शकते. असे केल्यास कंपन्यांना स्पर्धेत तगही धरता येऊ शकते.
यासाठी भारतातीलच उदाहरण घेऊ या. स्कोडा येती, ह्युंदाई सँटा फे, सोनाटा, शेव्हर्ले ट्रेलब्लेझर या कार तशा उत्तम आहेत. पण त्यांच्या अधिकच्या किमतींमुळे ही वाहने विक्रीत मार खाणारी ठरली आहेत. टाटा मोटर्सला तिची आरिया आणि मारुती सुझुकीला किझाशी यांचे उत्पादन बंद करावे लागले ते किमतीमुळेच. संबंधित श्रेणीतील स्पर्धकांच्या वाहनांच्या तुलनेत संबंधितांच्या वाहनांची किंमत न रुचल्यामुळेच अनेकांनी या वाहनांसाठी पसंती कमी दिली.
स्पर्धक वाहनांच्या किमती अधिक ठेवून ती सादर करण्याबरोबरच अधिक विक्रीची अपेक्षा करण्याची मजलही अनेकदा कंपन्यांची जाते. ह्युंदाई क्रेटा आणि टोयोटा इनोव्हासारखी वाहने याला अपवाद म्हणता येतील. म्हणूनच मारुती सुझुकीचा बाजारहिस्सा निम्मा आहे आणि जनरल मोटर्स अजूनही बाजारात चाचपडतेय. कोणतीही गोष्ट विसरणारे भारतीय मुळातच नाहीत. आणि इथे तर किमतीवरच सारे अवलंबून असते.
pranavsonone@gmail.com