जर्मन बनावटीच्या ऑटोमोबाइल कंपन्यांनी संपूर्ण जग का काबीज केले आहे, याचे उत्तर ऑडी-ए६ ही गाडी चालवताना मिळते. भन्नाट टॉर्क, जबरदस्त क्षमतेचे इंजिन, देखणेपणात कोणत्याही इतर गाडीच्या तोडीस तोड आणि सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत भरवशाची अशी ही गाडी रस्त्यावर खुलून दिसते..

स्वत:चे घर आणि घराच्या दारात एक लांबसडक गाडी हे कोणत्याही सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते; पण ही गाडी कोणती असावी, याबाबत प्रत्येकाची वेगळी निवड असू शकेल. काहींना मर्सिडीजचा तारा खुणावतो, तर काहींना बीएमडब्ल्यूची निळाई साद घालते; पण गेल्या काही वर्षांमध्ये या दोन कंपन्यांव्यतिरिक्त भारतीय मनाला एकमेकींमध्ये गुंफलेल्या चार रिंगांनी अर्थातच ऑडी कंपनीच्या गाडय़ांनी भुरळ घातली आहे. या ऑडीचीच आलिशान गाडी म्हणजे ऑडी-ए६. ही गाडी नुसतीच आलिशान नाही, तर तेवढीच भन्नाटही आहे. ती देखणी आहे, परफॉर्मन्सच्या दृष्टीने तगडी आहे आणि अत्यंत आरामदायकही आहे.

बाह्य़ रूप

ऑडी-ए६ ही गाडी पाहताच क्षणी अचंबित व्हायला होते, एवढी ती आकाराने लांबसडक आहे. समोरून बघितल्यावर तिचे षटकोनी आकाराचे ग्रिल आणि त्या ग्रिलच्या मध्यावर असलेला ऑडीचा एम्ब्लेम लक्ष वेधून घेतो. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी असल्याचे गाडी समोरून बघतानाच जाणवते; पण काळ्या रंगातील डॅशबोर्डसदृश बम्पर्स गाडीला संरक्षण देतात. त्याशिवाय एखाद्या चित्त्याने डोळे मिचकावल्यासारखे गाडीचे हेडलॅम्प्स अत्यंत आकर्षक आहेत. एलईडी दिव्यांनी प्रकाशमान होणारे हे हेडलॅम्प्स अत्यंत शक्तिशाली आहेत. खास करून पूर्ण अंधारात समोरचा मार्ग व्यवस्थित उजळण्याचे काम ते चोख बजावतात. तसेच त्यांची रचनाही आकर्षक असल्याने गाडी अधिकच डौलदार दिसते. ही गाडी बनवताना अत्यंत प्रमाणबद्ध बनवली आहे. गाडीला दोन्ही बाजूंनी थोडासा गोलाकार आकार दिल्याने गाडी वेग घेताना त्याचा फायदा होतो. गाडीचे मून रूफ या गाडीची नुसतीच शोभा वाढवत नाही, तर प्रत्यक्षात गाडी चालवताना संध्याकाळच्या वेळी या मून रूफमधून येणारा हलका प्रकाश भन्नाट वाटतो. गाडीच्या टपावर मागच्या बाजूला असलेला अ‍ॅण्टेना गाडीचा डौल सांभाळतो. गाडीची मागची बाजूही लक्ष वेधून घेणारी आहे. आयताकृती टेललॅम्प्स, दोन्ही बाजूंना असलेले एक्झॉस्ट्स यामुळे गाडीला एक स्पोर्टी लुक मिळतो. तसेच साइड मिर्सही या गाडीच्या आकर्षक रूपात भर घालतात. मिर्सच्या टोकांना एलईडी लॅम्प्स देऊन सिग्नल दिसायची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे हे मिर्स मिटताना वरच्या दिशेने मिटतात, त्यामुळे नुसत्या उभ्या असलेल्या गाडीच्या लुकमध्ये भर पडते.

अंतर्गत रचना

गाडीत शिरल्या शिरल्या आपण एका महागडय़ा गाडीत पाय ठेवल्याची खात्रीच पटते. ही गाडी पाच जणांसाठी अत्यंत आरामदायक असली, तरी मागच्या सीटवर मध्ये बसणाऱ्या व्यक्तीला पाय ठेवायला अडचण होते. त्यामुळे प्रत्यक्षात ही गाडी चार जणांसाठी अत्यंत योग्य आहे. गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या डाव्या बाजूला असलेले गाडीचे कंट्रोल पॅनल एखाद्या विमानातील वैमानिकाच्या कॉकपिटसारखीच आहे. गाडी ऑटोमॅटिक असल्याने गाडीचा गीअर बॉक्स आटोपशीर आहे. गाडी चालू करण्यासाठी एक बटण असून गीअर बॉक्सशेजारीच ते आहे. त्याशिवाय पुढील दोन सीट्सच्या मध्ये असलेल्या पॅनलवर मीडिया, नॅव्हिगेशन, एफएम रेडिओ असे सगळेच कंट्रोल्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोन सीट्सच्या वरच्या बाजूला रिअर व्ह्य़ूसाठीच्या मिररच्या वर सन-मून रूफ उघडण्यासाठीचे बटण आहे. ड्रायव्हरचे स्टीअरिंग व्हील, गाडीच्या सगळ्या सीट्स लेदरमध्ये असल्याने केबिनमधील अनुभव आणखीनच प्रसन्न होतो. त्याचप्रमाणे डॅशबोर्डवर लाकडी काम असल्याने हे काम गाडीच्या श्रीमंतीत भर टाकते. त्याशिवाय मागच्या सीट्सवर बसणाऱ्यांसाठी काचांना अडकवायला काळी जाळीही देण्यात आली आहे. तसेच ब्लेझर अडकवण्यासाठीही दोन्ही बाजूंना जागा आहे.

सुरक्षा आणि आराम

सुरक्षेच्या दृष्टीने ऑडीने पुरेपूर काळजी घेतली आहे. गाडीत एकूण आठ एअरबॅग्ज आहेत. त्यामुळे अपघात झालाच, तर गाडीतील प्रवाशांना कमीत कमी दुखापत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गाडीच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा आहे अथवा नाही, याची सूचना गाडीत बसल्यानंतर लगेचच मिळते. गाडी सुरू होऊनही ड्रायव्हरच्या बाजूच्या आसनावरील व्यक्तीने सीटबेल्ट लावला नाही, तर गाडी तसे सूचित करते. इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन सिस्टममुळे ब्रेक लागल्यानंतर निर्माण होणारी ऊर्जा गाडीच्या चारही चाकांना हव्या त्या प्रमाणात विभागली जाते. त्यासाठी रस्त्याची स्थिती, गाडीतील माणसांची संख्या आदी सगळ्यांचा विचार गाडीचे इंजिन आणि यंत्र करते. त्याशिवाय एबीएस प्रणालीही गाडीत आहे. गाडीत बसल्या बसल्या बूट म्हणजेच डिकी उघडण्यासाठी बटण देण्यात आले आहे. हे बटण दाबल्यावर बूट पूर्णपणे उघडते. गाडीची बूट स्पेसही अत्यंत भव्य आहे. गाडीने वेग पकडल्यानंतर गाडीचे दरवाजे आपोआप बंद होतात. तसेच चाइल्ड लॉक प्रणालीही गाडीत आहे.

आरामाच्या दृष्टीने गाडीतील वातानुकूलन प्रणाली ऑटोमॅटिक असून गाडीतील प्रत्येकाला त्याला हवे तेवढे तापमान ठेवण्याची मुभा आहे. पुढे बसणाऱ्या दोन आणि मागे बसणाऱ्या दोन प्रवाशांसाठी प्रत्येकी एक एक एसी व्हेंट असून प्रत्येक प्रवासी त्याच्यापुरते त्याला हवे तेवढे तापमान सेट करू शकतो. गाडी बटण स्टार्ट असून गाडीत शिरण्यासाठीही चावी लावावी लागत नाही. गाडीत क्रुझ कंट्रोल प्रणाली असल्याने लांबच्या प्रवासात सरळ रस्त्यावर ड्रायव्हरला आराम मिळू शकतो. गाडीचे सर्व मिर्स अँटी ग्लेअर आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवताना मागून येणाऱ्या गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशाने डोळे दिपत नाहीत. त्याचप्रमाणे समोरून येणाऱ्या प्रकाशझोतांची तीव्रताही कमी होते. गाडीत पुढे आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी कप होल्डर देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ड्रायव्हरच्या डाव्या हाताकडे स्टोअरेजसाठी जागा आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांना आरामदायक प्रवास करण्यासाठी उत्तम लेगस्पेस देण्यात आली आहे.

इंजिन व ट्रान्समिशन

ऑडी-ए६ ही गाडी डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारांमध्ये येते. ऑडी-ए६ ३५ टीडीआय या गाडीचे इंजिन डिझेल असून या इंजिनाची क्षमता १९६८ सीसी एवढी आहे. एवढय़ा प्रचंड क्षमतेच्या इंजिनामुळे गाडी ४०० एनएम एवढा टॉर्क देते. गाडी शून्य ते १०० एवढा वेग पकडण्यासाठी केवळ आठ सेकंद लागतात. त्यावरून या गाडीच्या टॉर्कचा अंदाज येऊ शकेल. तसेच डिझेल श्रेणीतील ही गाडी १७ किलोमीटर प्रतिलिटर एवढे दणदणीत मायलेज देते. त्यामुळे ७५ लिटरची टाकी पूर्ण भरल्यावर साधारण गाडी एक हजार किलोमीटर धावू शकते. गाडी पूर्णपणे ऑटो ट्रान्समिशनवर असून सात गीअर्स आहेत. त्याचप्रमाणे मॅन्युअली बदलण्यासाठी गाडीच्या स्टीअरिंग व्हीलवर कंट्रोल देण्यात आले आहेत.

अनुभव

ऑडी-ए६ ही गाडी ड्रायव्हर आणि प्रवासी या सर्वासाठी अत्यंत आरामदायक आहे. गाडीचा व्हील बॅलन्स अत्यंत उत्तम असून १५०-१६० किमी प्रतितास या वेगाने धावतानाही गाडीत बसलेल्यांना जराही हादरे बसत नाहीत. त्याशिवाय एवढय़ा प्रचंड वेगात असताना गाडी झटकन नियंत्रणातही आणता येते. गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्स कमी असल्याने खड्डय़ांच्या किंवा गतिरोधक असलेल्या रस्त्यांवर गाडी जपून चालवावी लागते. ही गाडी प्रचंड स्मार्ट असून ऑडीने आपली विश्वासार्हता जपली आहे.

किंमत

५३ ते ५७ लाख रुपयांच्या रेंजमध्ये आहे. (किंमत एक्स शोरुम)

rohan.tillu@expressindia.com

Story img Loader