शून्य ते शंभर किमी प्रतितास एवढा वेग गाठण्यासाठी फक्त ३.९ सेकंद एवढाच वेग घेणारी ऑडी आरएस-६ अव्हान्त ही वाऱ्याच्या वेगाने पळते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जर्मन ऑटोमोबाइल कंपन्यांनी कुठल्या कुठे मजल मारली आहे, हे ही गाडी चालवल्यावर सहज लक्षात येते..

ऑडी किंवा बीएमडब्ल्यू अशा महागडय़ा गाडय़ा मुंबईच्या किंवा राज्यातल्या कोणत्याही रस्त्यावर बघण्यात आता फारसे नावीन्य उरलेले नाही. राज्याच्या कोणत्याही शहरात आजकाल हमखास या गाडय़ा दिसतात. अनेकदा या गाडय़ा आणि होंडा, टोयोटा, ह्य़ुंदाई वगरे कंपन्यांच्या गाडय़ा यांच्यात नेमका फरक काय, हे सामान्य डोळ्यांना दिसत असले, तरी आकलनाच्या पलीकडे असते. हा फरक समजून घेण्यासाठी या गाडय़ा हाताळणे आवश्यक असते. ऑडी आरएस-६ अव्हान्त ही गाडी हाताळल्यावर हा फरक खूपच चांगल्या प्रकारे लक्षात येतो. रस्त्यावर नुसती उभी असलेली ही गाडी बघून तिचे कौतुक करणाऱ्या खूपच कमी जणांना ही गाडी म्हणजे निद्रिस्त राक्षस (मॉन्स्टर) आहे याची कल्पना नसते; पण बटणाने सुरू होणाऱ्या या गाडीच्या इंजिनात प्राण फुंकले की, हा राक्षस जागा होतो आणि तातडीने गुरकावून आपल्या अजस्र ताकदीची खात्री देतो.

गाडीचे लुक्स

ऑटोमोबाइल क्षेत्राशी परिचय नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पहिल्यांदा बघितल्यानंतर ही गाडी आणि ऑडी क्यू-७ या दोन गाडय़ांमध्ये तसा फरक जाणवणार नाही; पण दुसरी नजर टाकल्यानंतर नजर विस्फारल्याशिवाय राहत नाही. ही गाडी लांबसडक आहे. गाडीची लांबी तब्बल पाच मीटर एवढी आहे, तर रुंदी दोन मीटर आहे. क्यू-३ किंवा क्यू-७ या गाडय़ांच्या तुलनेत ही गाडी बसकी असून स्पोर्ट्स कार असल्याने गाडीची उंचीही कमी आहे. कमी उंची वगळल्यास गाडीचा पुढचा आकार क्यू-७ च्या जवळ जाणारा आहे. फ्रंट फेसिंगच्या टोकाशी अत्यंत निमुळते असे हेडलाइट्स एखाद्या जंगली जनावराच्या अंधारात चमकणाऱ्या डोळ्यांची आठवण करून देतात. षट्कोनी आकारातील गाडीची ग्रिल चटकन कोणाचेही लक्ष वेधून घेते. २० इंच एवढय़ा आकाराचे अलॉय व्हील्स गाडीला चांगला बेस मिळवून देतात. रूफ रेल्समुळे गाडीच्या स्पोर्टी लुक्समध्ये भर पडते. त्याचप्रमाणे गाडीचे टेल लाइट्सही हेड लाइट्ससारखे निमुळते आणि आयताकृती असून तेदेखील गाडीच्या मागच्या भागाच्या देखणेपणात भर टाकतात. गाडीचा मागचा भाग ऑडीच्या इतर गाडय़ांच्या तुलनेत लांबसडक असून गाडीच्या उंचीच्या मध्यावर तो निमुळता होत गेलेला दिसतो. त्याशिवाय स्पोर्टी लुकसाठी गाडीच्या मागच्या फ्लॅपवर असलेला अँटेनाही देण्यात आला आहे. गाडीचे साइड मिर्स ऑटो अ‍ॅडजेस्टेबल असून गाडीच्या एकूण आकाराच्या तुलनेत ते छोटे आहेत. तरीही ते गाडीच्या सौंदर्यात लक्षणीय भर घालतात.

अंतर्गत रचना

या गाडीत शिरल्या शिरल्या आपण अत्यंत आलिशान गाडीत बसत आहोत, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. गाडी स्पोर्ट्स कार असल्याने आणि गाडी इतर गाडय़ांच्या तुलनेत बुटकी असल्याने बसताना खाली बसल्यासारखे वाटते. गाडीच्या ड्रायव्हर्स सीटवर बसण्याचा अनुभव एखाद्या छोटय़ाशा विमानाच्या पायलट सीटवर बसल्यासारखाच आहे. गाडीचं स्टीअिरग वरच्या बाजूने गोलाकार असलं, तरी खाली म्हणजेच ड्रायव्हरच्या पायांच्या बाजूला थोडंसं चपटं आहे. गाडीच्या डॅशबोर्डवर असलेल्या एका खाचेत मल्टिमीडिया पॅनल बसवण्यात आले आहे. गाडी सुरू झाल्या झाल्या हे पॅनल वर येतं. तसेच पायलट व को-पायलट यांच्या मधल्या भागात गाडीचे सगळे कंट्रोल्स दिले आहेत. गाडीतील प्रत्येक प्रवाशाला त्याच्यासाठी खास वातानुकूलन प्रणाली दिली असून त्या प्रणालीवरील तापमानावर तो प्रवासी स्वत: नियंत्रण ठेवू शकतो. गाडी पाच जणांसाठी आरामदायक असली, तरी शक्यतो चौघांनीच प्रवास करणे सोयीचे आहे. गाडीत पुढच्या आणि मागच्या प्रवाशांसाठी कप ठेवण्याची जागा, बाटली ठेवायला विशेष जागा अशा गोष्टी देण्यात आल्या आहेत. गाडी बसकी असल्याने गाडीत उजेड काहीसा कमी असतो; पण सन-मून रूफला दिलेलं कव्हर बाजूला केल्यास पुरेसा प्रकाश पडतो. पौर्णिमेच्या रात्री वगरे या गाडीतून प्रवासाचा आनंद नक्कीच वेगळा ठरेल.

सुरक्षा

१५० किमी प्रति तास एवढय़ा वेगानेही सहज पळणाऱ्या या गाडीत प्रवाशांची सुरक्षा व्यवस्थाही तेवढीच चोख आहे. गाडी वेगात असताना अचानक ब्रेक दाबल्यास ते ब्रेक अडकू शकतात. तसे होऊ नये यासाठी गाडीत अँटी लॉक ब्रेक प्रणाली आहे. तसेच पाìकग करताना मागच्या कॅमेऱ्यासह पुढील बाजूसही कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचा अंदाज गाडीत बसल्या बसल्या मान वाकडी न करताच घेता येतो. सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड लॉकिंग अशा प्रणालींबरोबरच गाडीत सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. क्रॅश सेन्सर, अँटी थेफ्ट अर्लाम, पॉवर लॉक, साइड आणि रिअर इम्पॅक्ट बीम्स, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, ट्रॅक्शन कंट्रोल अशा सुरक्षेशी निगडित सर्व सुविधा गाडीत देण्यात आल्या आहेत.

इंजिन

या गाडीची मुख्य मदार गाडीच्या अत्यंत शक्तिशाली इंजिनावर आहे. ४ टीएफएसआय पेट्रोल श्रेणीतील या गाडीचे इंजिन ३९९३ सीसी एवढय़ा क्षमतेचे आहे. गाडीचा टॉर्क ७०० एनएम एवढा प्रचंड असून त्यामुळे गाडी सुरू केल्या केल्या १०० किमी प्रतितास वेगापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ३.९ सेकंद एवढाच कालावधी घेते. गाडीच्या इंजिनात ८ सििलडर असल्याने तेवढी ऊर्जा जास्त निर्माण होते. गाडीत टबरे चार्चर असल्याने ओव्हरटेकिंग किवा वेग पकडणे अत्यावश्यक असलेल्या परिस्थितीत गाडी पटकन वेग पकडते. गाडीत ६५ लिटपर्यंत पेट्रोल भरता येऊ शकते आणि गाडी शहरात ६.४० किमी प्रति लिटर आणि हायवेवर १०.४ प्रति लिटर एवढा मायलेज देते.

अनुभव

ऑडी आरएस-६ अव्हान्त ही गाडी चालवण्याचा अनुभव अक्षरश: वाऱ्याशी स्पर्धा करण्याच्या अनुभवासारखाच आहे. मोकळ्या रस्त्यांवर गाडी १८०-१९० किमीपर्यंत अगदी सहज पोहोचते. गाडीचा सर्वाधिक वेग २५० किमी प्रति तास इथपर्यंत पोहोचू शकतो, पण भारतातील रस्ते आणि वाहतुकीची शिस्त यांचा विचार करून १८० किमीपर्यंतच जाणे योग्य आहे. एवढय़ा वेगातही गाडी अजिबात रस्ता सोडत नाही किंवा इतर गाडय़ा बाजूने जाताना हलत नाही. गाडीचं पॉवर स्टीअिरग जबरदस्त असल्याने गाडी तेवढय़ा वेगातही उत्तम प्रकारे नियंत्रित करता येते. गाडीची उंची कमी असल्याने ही गाडी गतिरोधक आणि खड्डे यांच्यापासून जरा जपूनच चालवावी लागते. आतील सोयीसुविधांमुळे एका बठकीत ३००-४०० किलोमीटरची मजल मारतानाही काहीच वाटत नाही. त्या दृष्टीने ही गाडी ड्रायव्हर-फ्रेंडली आहे. वास्तविक ही गाडी चालवण्याचा अनुभव वर्णनातीत आहे.

सोयीसुविधा

सोयीसुविधांच्या बाबतीत ही गाडी कुठेच मागे नाही. गाडीतल्या सोयीसुविधांच्या सर्वसामान्य कल्पनांवर पुरेपूर उतरेल, अशी ही गाडी आहे. गाडीत बसल्या बसल्या गाडीची डिकी उघडता येऊ शकते. त्याशिवाय वातानुकूलन प्रणाली, नॅव्हिगेशन सिस्टम, बसल्या बसल्या मसाज करता येतील अशा सीट्स, सीडी प्लेअर, डीव्हीडी प्लेअर, एफएम रेडिओ अशी मनोरंजनासाठीची प्रणाली, गाडीत पुढे आणि मागे जर्मनीतीलच ‘बोज’ या कंपनीची साऊंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मागच्या सीटवर बसलेल्यांना वाचनासाठी दिवा, इंधन कमी झाल्यास ते दाखवणारी व्यवस्था, लेदर सीट्स, व्हॉइस कंट्रोल, ट्रंकमधील दिवा अशा अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय गाडी चालवताना ड्रायव्हरला समोरच्या काचेवरच वेग, नॅव्हिगेशन आदींचे इंडिकेशन मिळते. त्यासाठी त्याला स्पीडोमीटरच्या डायलकडे बघावे लागत नाही. त्यामुळे ड्रायिव्हग करताना अजिबातच चित्त विचलित होण्याची शक्यता नसते. मल्टिमीडिया पॅनल टच स्क्रीन असून पुढील दोन आसनांमध्ये दिलेल्या बटनांद्वारेही त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. तसेच क्रुझ कंट्रोल फीचर असल्याने सरळ रस्त्यांवर गाडीचा एक वेग निश्चित करून चालक कोणत्याही तसदीशिवाय गाडीचे नियंत्रण करू शकतो.

किंमत

गाडी एवढी दमदार कशी, याचे कारण या गाडीच्या किमतीत आहे. या गाडीची किंमत १.४१ कोटी एवढी आहे; पण तेवढं बजेट असणाऱ्यांसाठी ही गाडी नक्कीच उत्तम आहे, असे म्हणायला हवे.

rohan.tillu@expressindia.com

Story img Loader