रस्त्यावरून आपली गाडी जाताना सगळ्यांनी मागे वळून गाडीकडे बघितले पाहिजे, ही काही जणांची अपेक्षा असते. ऑडी एस-५ ही गाडी त्या अपेक्षेवर पुरेपूर उतरते. देखणेपणा, परफॉर्मन्स, सुरक्षा या सगळ्या कसोटय़ा ही गाडी पूर्ण करते आणि यशस्वीदेखील ठरते..
ऑटोमोबाइल क्षेत्रात प्रत्येक कंपनीची एक विशिष्ट ओळख असते. मर्सडिीज, बीएमडब्ल्यू या कंपन्यांच्या गाडय़ांची ग्रिल्स मॉडेल बदलले, तरी साधारणपणे सारखीच असतात. ऑडीदेखील त्याला अपवाद नाही. हेडलाइट्स आणि टेल लाइट्सची रचना, ग्रिलची ठेवण या सगळ्याच गोष्टी साधारणपणे सारख्याच असतात. तरीही ऑडीची एस-५ ही गाडी इतर गाडय़ांपेक्षा देखणी ठरते. या गाडीचे देखणेपण जसे त्या गाडीच्या रचनेत आहे, तसेच त्या गाडीच्या रंगांमध्येही आहे. पिवळा, लाल असे एकदम उठावदार रंग नेहमीच चांगले दिसतात; पण वरवरच्या देखणेपणापेक्षाही ही गाडी परफॉर्मन्सलाही खूप छान आहे.
बाह्य़रूप
ही गाडी ऑडी आरएस-७ अव्हान्तसारखीच दणकट आहे. समोरून बघताना गाडीचे षट्कोनी ग्रिल एखाद्या आऽऽ वासलेल्या व्हेल माशासारखे दिसते. अंधारात झाडीतून डोकावणाऱ्या चित्त्याच्या डोळ्यांसारखे हेडलाइट्स, योग्य ठिकाणी वळणदार बम्पर्स आदी गोष्टी गाडीला आणखीनच देखणी बनवतात. गाडीचा रंग पियानो फिनिश असल्याने गाडी उन्हात मस्त चकाकते. गाडीची लांबी ४७०० मिमीपेक्षा जास्त असून रुंदी २०२० मिमी एवढी आहे. त्यामुळे आकाराने ही गाडी चांगलीच लांबसडक आहे. गाडीची उंची मात्र केवळ १३८२ मिमी एवढी असल्याने गाडी बसकी वाटते, किंबहुना उंची कमी असल्यानेच या गाडीला स्पोर्टी लुक येतो. गाडीकडे मागून बघितल्यानंतर गाडीचा सायलेन्सर लक्ष वेधून घेतो. हेडलाइट्सच्या ठिकाणी असणारी वळणे टेललाइट्सच्या डिझाइनमध्येही दिसतात. त्यामुळे गाडीच्या लुकमध्ये एक प्रकारची एकसंधता दिसते. गाडीचा व्हील बेस २८०० मिमीपेक्षा जास्त असल्याने गाडीचे टायर्स चांगलेच दणकट आहेत. ते मोठे असल्याने गाडीच्या डौलदारपणात भर पडते. मागच्या बाजूने वर उचललेले आणि पुढील बाजूकडे निमुळते होत गेलेले गाडीचे डिझाइन गाडीला वेग घेण्यासाठी फायद्याचे ठरते. ही गाडी दिसताना एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखी दिसते आणि ती सुरू झाल्यावर तशाच वेगात पुढे सरकते. गाडीचे साइड मिर्सही आकर्षक आहेत. त्याशिवाय गाडीच्या मागच्या बाजूला वर असलेली अँटेना पाण्यावर दिसणाऱ्या डॉल्फिनच्या पंखासारखी दिसते. गाडी एकुणातच अत्यंत आकर्षक आहे, यात वादच नाही.
आतील रचना
गाडी पाच जणांसाठी असली, तरी चौघांसाठी अत्यंत आरामदायक आहे. गाडीचे मागील आसन काहीसे खोलगट असल्याने मागे बसलेल्यांना काहीसे कोंदट वाटू शकते. त्यावर उपाय म्हणून मून-सन रूफ देण्यात आले आहे. त्याशिवाय गाडीची केबिन एखाद्या कॉकपिटसारखीच आहे. गाडीत बसण्याआधी गाडी सुरू कशी करायची, हे समजून घ्यायला हवे. ऑडीच्या इतर गाडय़ा सुरू करण्यासाठी चालक आणि त्याच्या बाजूच्या आसनांमध्ये असलेल्या पॅनलवर बटण देण्यात आले आहे, पण या गाडीत चावीसदृश दिलेली गोष्ट स्टीअिरग व्हीलच्या डावीकडे असलेल्या एका खोबणीत टाकून गाडी चालू करावी लागते. ऑटो ट्रान्समिशन गीअर, पुढे व मागे बसलेल्या प्रवाशांसाठी वेगवेगळे एसी व्हेंट्स, आरामदायक लेग स्पेस, रिअर व्ह्य़ूसाठी असलेला मिरर या सगळ्याच गोष्टी खूपच आकर्षक आहेत. त्याशिवाय गाडीत लेदर सीट्स असल्याने त्या गाडीच्या अंतर्गत रचनेचा डौल वाढवतात. गाडीत पुढील प्रवाशांसाठी दोन बॉटल व कप होल्डर देण्यात आले आहेत, तसेच मागे बसणाऱ्यांसाठीही दोन कप होल्डर दिले आहेत. ऑडी कंपनीच्या इतर कोणत्याही गाडीप्रमाणेच या गाडीतही सोयीसुविधांची चन आहेच.
सोयीसुविधा
सोयीसुविधांच्या बाबतीत ही गाडी सध्याच्या सर्व गाडय़ांमधील सोयीसुविधांशी स्पर्धा करते. गाडीत वातानुकूलित यंत्रणा असून चारही प्रवाशांसाठी स्वतंत्र वातानुकूलन होण्याची सोय आहे. त्याशिवाय पॉवर स्टीअिरग, गाडीत बसूनच ट्रंक व फ्युएल लीड उघडण्याची सोय, नॅव्हिगेशन सिस्टम, आपल्या सोयीप्रमाणे पुढे-मागे करता येतील अशी आसने, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर क्वालिटी कंट्रोल, मागील आसनांवर बसणाऱ्यांसाठी हेडरेस्ट, रीिडग लँप आदी सर्व सोयीसुविधा गाडीत ठासून भरल्या आहेत. गाडीत क्रूझ कंट्रोल हे फीचर असल्याने गाडी चालवणे अधिकच आरामदायक होते.
इंजिन आणि ट्रान्समिशन
गाडीचे इंजिन ३.० लिटर पेट्रोल श्रेणीचे असून त्याची क्षमता २९९५ सीसी एवढी आहे. ६ सििलडरवर चालणारे हे इंजिन अत्यंत शक्तिशाली आहे. गाडीचा टॉर्कही ४४० एनएम एवढा प्रचंड आहे. गाडी ऑटो ट्रान्समिशनवर धावत असून सात ऑटो गीअर्स आहेत. तसेच कंपनीच्या म्हणण्यानुसार गाडी शहरात ९.२८ किमी प्रतिलिटर आणि हायवेवर १२.२८ किमी प्रतिलिटर एवढे मायलेज देते. गाडीचा सर्वाधिक वेग २५० किमी एवढा असून ० ते १०० एवढय़ा वेगात येण्यासाठी गाडी केवळ ५ सेकंदांचा अवधी घेते.
सुरक्षा
ऑडी जर्मन कंपनी असल्याने सुरक्षेबाबत कोणतीही हयगय करत नाही. अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टम, सेंट्रल लॉक सिस्टम यांच्यासह चालक, चालकाबाजूचा प्रवासी आणि मागील आसनांवर बसलेले प्रवासी या सर्वासाठी एअर बॅग्ज देण्यात आल्या आहेत. गाडी उभी करताना पुढील आणि मागील असे दोन्ही पाìकग सेन्सर उत्तम काम करतात. सीटबेल्ट वॉìनग, क्रॅश सेन्सर्स, ब्रेक असिस्ट, चाइल्ड लॉक, गाडीला बाजूने ठोकल्यास तीव्रता कमी करणारे बीम्स, पुढून किंवा मागून ठोकल्यास तीव्रता कमी करणारे बीम्स यांचाही समावेश आहे. इंजिन मोबिलायझर, ट्रॅक्शन कंट्रोल, रिअर कॅमेरा, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स अशा सुरक्षा व्यवस्थेमुळे गाडी आणखीन स्मार्ट बनते.
अनुभव
ही गाडी चालवण्याचा अनुभव तर उत्तम आहेच, पण गाडी नुसती दाराबाहेर उभी असल्याचा अनुभवही खूप सुखद आहे. गाडीच्या पहिल्या दर्शनानेच ती मन जिंकून घेते. गाडी चालवताना १०० किमी प्रतितास हा वेगही खूपच कमी वाटतो. तेवढय़ा वेगातही गाडी अजिबातच हलत नाही. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स म्हणजेच जमिनीपासूनचे अंतर खूपच कमी आहे. त्यामुळे शहरातील गतिरोधकांवर किंवा खड्ड्य़ांमध्ये ही गाडी खूपच जपून चालवावी लागते. अनेकदा अक्षरश: गाडीचा वेग शून्यावर आणून ती गाडी पुढे नेऊन पुन्हा वेग वाढवावा लागतो. एवढी एकच गोष्ट सोडल्यास गाडी अत्यंत समाधानकारक आहे.
किंमत
फीचर्स आणि एकंदरीत इंजिन वगरेच्या मानाने गाडीची किंमत परवडण्याजोगी म्हणजेच फक्त ६६.२० लाख एवढी आहे.
रोहन टिल्लू rohan.tillu@expressindia.com