नवी दिल्ली परिसरात (ग्रेटर नोएडा, एनसीआर) दर दोन वर्षांनी भरणाऱ्या ‘ऑटो एक्स्पो’चं यंदाचं दुसरं सत्र. अनेक उत्पादनं, काहींचा नव्याने सहभाग असं सुरुवातीला सांगितलं गेलेलं हे प्रदर्शन प्रत्यक्षात मात्र निराशाच अधिक करणारं ठरलं. प्रदर्शनाचे पहिले दोन दिवस खास प्रसारमाध्यमांकरिता राखून ठेवण्यात आले होते. त्याचीच संधी साधून दिसलेल्या या सोहळ्याचं हे चित्र-शब्दरूप
* ‘सिआम’च्या ५ ते ९ फेब्रुवारी २०१६ असे सहा दिवस भरलेल्या वाहन प्रदर्शनास ६ लाख १ हजार ९१४ जणांनी भेट दिली. प्रदर्शनाच्या संकेतस्थळावरून १०,००० माहिती डाऊनलोड झाली; तर फेसबुकला १.५० लाख हिट्स व ट्विटरला १० हजार फॉलोअर्स मिळाले. या दरम्यान १०८ नवी उत्पादने सादर करण्यात आली. ६५ निर्मित कंपन्यांची दालने येथे होती.
* बॉलीवूडमधील कतरिना कैफ, रणबीर कपूर, अनिल कपूर, जॉन अब्राहम, अक्षयकुमार, मनोज बाजपेयी, आलिया भट्ट, तापसी पानू तर क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, झहीर खान, पीयूष चावला, मोहिंदर अमरनाथ यांचेही दर्शन या वेळी घडले.
* ऑडीच्या क्यू७चं सादरीकरण विराट कोहलीनं केलं, तर बीएमडब्ल्यूबरोबर सचिन तेंडुलकरनं क्षणिक पोझ दिली.
* ‘एक्मा’, ‘सीआयआय’ यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाला भेट देऊ इच्छिणाऱ्यांकरिता दिल्ली रेल्वे स्थानक, विमानतळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणांहून थेट वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. एनसीआर परिसरातील वाहन प्रदर्शनाबरोबरच राजधानी नवी दिल्लीत वाहनांशी निगडित सुटे भाग आदींची दालने प्रगती मैदानावर याच दरम्यान खुली होती.
* बीएमडब्ल्यू, ऑडीच्या निवडक कार या वेळी सादर करण्यात आल्या.

मर्सिडिज बेन्झ :
प्रीमियम गटातील सर्वच वाहन प्रकारात तीनही जर्मन कंपन्यांमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मर्सिडिज बेन्झनं जीएलसी एसयूव्ही सादर करून बीएमडब्ल्यू, ऑडीला अस्वस्थ करण्याचा यत्न प्रदर्शनाच्या माध्यमातून केला. मर्सिडिजच्याच जीएलए आणि जीएलईच्या मधल्या गटात बसणारी जीएलसी व्होल्वोच्या एक्ससी६० आणि लॅण्ड रोव्हरच्या डिस्कव्हरी स्पोर्टला नक्कीच आव्हान देऊ शकेल.
सर्व छायाचित्रे : वीरेंद्र तळेगावकर

टोयोटा :
जपान-भारत भागीदारीतून निर्माण झालेल्या या कंपनीच्या इनोव्हाने मैलाचा दगड रचला आहे. तिच्या दशकापूर्वीच्या मोठय़ा एमपीव्ही या गटातील वाहनाचे गारूड अद्यापही कायम आहे. टोयोटा इन्व्होला आता क्रिस्टाचीही जोड मिळाली आहे. अर्थातच तिची किंमत सध्याच्या इन्व्होपेक्षा अधिक असेल. इन्व्होव्हातही नुकताच बदल करण्यात आला होता. हीदेखील यशस्वी ठरेल असं वाटतं. त्याचबरोबर कंपनीने प्रायस ही हायब्रिड कारही सादर केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला यश मिळालं आहे. तिचा इथला प्रवास पाहावा लागेल.

ह्य़ुंदाई :
टस्कॉन ही एसयूव्ही गटातील कार कोरियन कंपनीने काहीशी नव्या रूपात सादर केली. कंपनीच्याच सॅन्टा फे आणि नव्या क्रेटा यांच्या मधल्या फळीत बसणारी ही कार फारशी आकर्षक नाही. सेदान श्रेणीतील ही कार ह्य़ुंदाईच्या या गटातील प्रतीच्या वाहनांची मालिका देण्यात पुरून उरली आहे. .चर्चेतल्या, पसंतीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटात ह्य़ुंदाईने सादर केलेली नवी कार बरी वाटली. कंपनीने अद्याप तिचे नामकरण केले नाहीय. स्पर्धक मारुतीच्या नवागत व्हिटारा ब्रेझाच्या बरोबरीने कदाचित ती जाऊ शकेल.

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा :
महिंद्रकडून तिच्या एसयूव्ही गटातील मातबरता यंदा दिसली नाही. कंपनीने प्रदर्शनात सध्या रस्त्यावर असलेल्या केयूव्ही१००, एक्सयूव्ही५००च किरकोळ बदलासह सादर केल्या. याचंच साधम्र्य असलेली एण्डुरन्स ही एसयूव्ही लक्ष वेधत होती. मात्र माहिती दिली जात नव्हती.

फियाट :
फियाटची जीप मात्र २०१६ करिता सज्ज होत आहे. यानुसार जीप व्रॅन्गलर आणि ग्रॅण्ड चेरोकी या दोन अनुक्रमे एसयूव्ही व प्रीमियम एसयूव्ही गटातील गाडय़ा भारतातूनही तयार होऊ लागतील. काहीशा मागे पडलेल्या फियाटची आता भारतातील एसयूव्ही बाजारपेठेवर नजर आहे.

होण्डा :
होण्डाने बीआर-व्ही ही छोटी एसयूव्ही सादर केली. होण्डाची प्रीमियम एसयूव्ही गटातील सीआर-व्ही तशी मोजकीच ठरली. अमेझ या सेदान श्रेणीतल्या वाहन प्रतिसादाने हुरळून गेलेल्या होण्डानेही तिच्या निवडक चार ते पाच वाहन नाममुद्रेवरच लक्ष केंद्रित करण्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

मारुती सुझुकी :

काहीशा उशिराने या वाहन श्रेणीत दाखल झालेल्या मारुतीची जुन्या व्हिटारा (पूर्वी एसयूव्ही गटात) नावाची नवी ब्रेझा सादर करण्यात आली. या माध्यमातून कंपनीने फोर्डच्या ईकोस्पोर्ट तसेच रेनोच्या डस्टर या यशाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिटारा ब्रेझा ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही तुलनेत या गटात नक्कीच स्थान मिळविण्यास पात्र आहे. कंपनीने थोडय़ाफार याच गटात बसणाऱ्या इग्निस आणि बलेनो आरएस या हॅचबॅक (आधीची बलेनो सेदान श्रेणीतील) वाहनांची मांडणीही प्रदर्शनात केली.

फोक्सवॅगन :
कंपनीची नवी वाहने सादर करताना भारतीय बाजारपेठेत गुणवत्तेला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही, हे कंपन्यांच्या प्रमुखांनी मुद्दाम सांगितलं. प्रदूषण चाचणीतील फसवणुकीमुळे चर्चेत आलेल्या या कंपनीने प्रदर्शनाच्या निमित्ताने एकदम तीन-चार वाहने सादर केली. त्यातही जर्मन कंपनीची अमेयो ही कॉम्पॅक्ट सेदान आकर्षण ठरली. याचबरोबर कंपनीने तिच्या पोलो, व्हेण्टो आणि पॅसट (हायब्रिड), टिगॉन (प्रीमियम एसयूव्ही) चे नवे रूपही सादर केले.

टाटा मोटर्स :
संपूर्ण प्रदर्शनात ही कंपनी चर्चेत राहिली ती तिच्या झिका या नावामुळे. या नावाच्या हॅचबॅक आणि सेदान अशा दोन्ही कार कंपनीने सादर केल्या. इंडिकासदृश दिसण्याचा मोह यंदा झिका हॅचबॅकने टाळला आहे. मारुतीच्या अल्टोदी छोटय़ा कारच्या तुलनेत हिचा आकार चांगला आहे, पण नकारात्मक चर्चेत राहिल्याने कंपनी तिचे नाव बदलणार आहे. शिवाय सेदान श्रेणीतील झिकाच्या काईट५ चेही नाव अंतिम आहे, असे नाहीच. टाटा मोटर्सने हेक्सा (आरियाप्रमाणे एमपीव्ही गटातील) आणि नेक्सॉन (इंडिकासारखी हॅचबॅक श्रेणीतील) या वेगळ्या गटातील दोन कारही या वेळी सादर केल्या. हॅचबॅकमधील स्पोर्टही होती.

शेव्हर्ले :
जनरल मोटर्सच्या या लोकप्रिय नाममुद्रेंतर्गत फार काही नवी वाहने उतरविण्यात आली नाहीत. एमपीव्ही गटातील स्पिन सादर करून कंपनीने तिचा या श्रेणीतील विस्तार केला एवढंच. तिची टव्हेरा तर बंदच आहे. शिवाय एन्जॉयलाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. क्रूझ व बिट या अनुक्रमे सेदान व हॅचबॅक गटातील बदलते वाहन तेवढे होते.

निस्सान :
कंपनीची एक्स-ट्रेल तसेच डॅटसनच्या गो चा विस्तार इथं पाहायला मिळाला. जीटी-आर ही स्पोर्ट गटातली मोठी गाडीचं नावीन्य कायम होतं.

रेनो :
फ्रान्स बनावटीच्या रेनोनं क्विडचं नवं व्हर्जन सादर केलं. यशस्वी डस्टरचं नवं रूपही दाखविलं. एमपीव्ही गटात तिनं लॉजी सादर केली. मारुतीच्या एर्टिगा, शेव्हर्लेच्या एन्जॉयच्या गटात ती मोडेल.

जग्वार :
टाटा मोटर्सच्या अखत्यारीतील ही ब्रिटिश नाममुद्रा. तिच्याच यशावर टाटा मोटर्स तरली आहे, असं म्हणता येईल. तर जग्वारची एक्सई ही सेदान कार जर्मन बनावटीच्या आघाडीच्या तीन कंपन्यांना ४० लाख रुपयांच्या घरात टक्कर देऊ शकेल.

यांची पाठ..
वाहन प्रदर्शन म्हणजे वायफळ खर्च असल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या बजाज ऑटोचं यंदाच्या प्रदर्शनात सहभाग नव्हता. यापूर्वीच्या प्रदर्शनामुळे कंपनीची कायद्याच्या कचाटय़ात अडकलेली चार चाकी रिक्षा खूपच चर्चेत होती. त्याचबरोबर स्कोडा, व्हॉल्वो यांचंही नामोनिशाणही दिसलं नाही.
वीरेंद्र तळेगावकर – veerendra.talegaonkar@expressindia.com

Story img Loader