गेल्या दशकभरात ज्या कार तयार झाल्या त्यांच्यात आता बदल करण्याची गरज आहे. खास करून भारतीय बाजारपेठेत उतरलेल्या कारबाबत तर हे नक्कीच. वाहन खरेदीदारांचा कलही आता बदलतो आहे. सर्वसामान्यांमध्ये कंपन्या, त्यांच्या नाममुद्रा, वाहने, वाहनांचा गट याबाबतची मानसिकताही बदलते आहे.
मारुती अथवा ह्य़ुंदाईसारख्या कंपन्यांच्या वाहनांकरिताही १० ते १५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणे खरेदीदारांना सध्या पसंतीचे आहे. यापूर्वी फक्त महागडय़ा गटात वाहन असल्याची प्रतिमा असलेल्या होंडाकडे पाहण्याचा कलही गेल्या पाच वर्षांत बदलला आहे. उच्च मध्यमवर्गीयांची वाहन कंपनी म्हणून तिला मान मिळत आहे.
भारतीयांचे एसयूव्ही प्रकारातील वाहनांवरचे प्रेम जगजाहीर आहेच. अशाच कार खरेदी करण्याचा त्यांचा कल अधिक असतो.
गेल्या दशकभरात तीच वाहने तंत्रज्ञानाच्या बाबत कितपत बदलली हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. कोणत्याही कंपन्या, त्यांच्या वाहनांबाबतचे माहितीपत्रक पाहिले की त्यात खूपच गोष्टी नव्या नमूद केलेल्या असतात. यापूर्वी मर्यादित आलिशान कारमध्येच केवळ आढणारी वैशिष्टय़े आता १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत असलेल्या एखाद्या कारमध्येही आढळतात. पण तंत्रज्ञानाबाबतही अशा कार अद्ययावत झाल्या आहेत का हा कळीचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानावरचे आजचे अवलंबित्व हे आजच्या पिढीतील वाहनांकरिता अधिक गुंतागुंतीचे बनत चालले आहे.
भारतीय वाहन बाजारपेठ यापूर्वी केवळ मारुती, महिंद्रा, टाटासारख्या कंपन्यांच्या वाहनांनी सजली असायची. भारतात या कंपन्यांच्या कोणत्याही वाहनांची कुठेही दुरुस्ती होऊ शकत असे. ही वाहने रस्त्यात कुठेही बंद पडली अथवा खराब झाली नजीकच ती दुरुस्त करण्याची सोय असे. आता थोडे वेगळे चित्र आहे. वाहनांमध्ये आता असणाऱ्या वैशिष्टय़ांची संख्या अधिक आहे. त्यात कुठे थोडासा जरी अडथळा अथवा तांत्रिक त्रुटी आढळली तर त्याचा वाहनावर विपरित परिणाम होतो. आणि जोपर्यंत ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुमची गैरसोय होते.
आपण अद्याप याबाबत संक्रमणावस्थेत आहोत. कारण वाहनांमधील अनेक अद्ययावत उपकरणे ही प्रगतीच्या टप्प्यावर आहेत. ते तयार करणाऱ्या कंपन्याही ते अधिक उपयुक्त कसे होईल, यासाठी आग्रही आहेत. आता पाचच वर्षांपूर्वीचंच घ्या ना. हायब्रिड हा शब्द आपण वाहन या क्षेत्रासाठी तेवढय़ा प्रमाणात ऐकला होता का? आता तर आपल्याकडे मायक्रो हायब्रिड तत्त्वावरील वाहनेदेखील आहे. येत्या पाच वर्षांत सगळी वाहने हायब्रिड तंत्रज्ञानावर चालतील. डिजिटल कार जगत गाठायचे असेल तर संक्रमण आवश्यकच आहे.
pranavsonone@gmail.com