मला जुनी गाडी घ्यायची असून माझे साधारण तीन लाख रु.पर्यंत बजेट आहे. मला आरामदायक गाडी घ्यायची असून होंडा सिविक, होंडा सिटी, फोर्ड फिएस्टा अशा प्रकारच्या गाडय़ांमध्ये पेट्रोलवर चालणारी कोणती गाडी योग्य राहू शकेल?
– तुषार रत्नपारखी
तुम्ही होंडा सिटीचे २०१०चे मॉडेल घेऊ शकता. ते तुम्हाला तीन लाखांत मिळेल. परंतु गाडीची स्थिती जाणून घेऊन मगच निर्णय घ्यावा. गाडी जास्तीत जास्त ७० हजार किमी चाललेली असावी.
माझे बजेट दहा लाख रुपये असून मला रोजच्या वापरासाठी ऑटोमॅटिक एसयूव्ही घ्यायची आहे. माझ्या पत्नीलाही गाडी चालवता यावी यासाठी ऑटोमॅटिकला प्राधान्य आहे. तसेच आम्ही लॉँग ड्राइव्ह आणि पिकनिकलाही जातो. त्यासाठीही गाडीचा वापर होईल. सध्या माझ्याकडे एव्हिओ यूव्हीए ही गाडी आहे.
– प्रसाद पारकर
तुमच्या बजेटात बसू शकेल अशी एकच एसयूव्ही आहे आणि ती म्हणजे मिहद्रा टीयूव्ही३००, डिझेल. बाकी सर्व एसयूव्ही १५-१६ लाखांच्या घरात आहेत. मात्र, तुम्हाला हॅचबॅक प्रकारातली गाडी हवी असेल तर मारुतीच्या इग्निस एएमटीचा विचार करायला हरकत नाही.
सर, माझे मासिक रिनग एक हजार किमी आहे आणि माझे बजेट अडीच ते साडेतीन लाख रुपये आहे. मला सेकंड हँड मारुती स्विफ्ट, टोयोटा इटिऑस लिवा जीडी यांपकी कोणती गाडी घेऊ, मार्गदर्शन करा? (सर्व डिझेल गाडय़ा आहेत.)
– माऊली मुंडे
तुमचे रिनग कमी असेल तर नक्कीच तुम्ही पेट्रोल स्विफ्ट घ्या किंवा मग होंडा जॅझचा विचार करा. परंतु तुमचे रिनग वाढणार असेल तर मग तुम्ही फोक्सवॅगन पोलो टीडीआय ही गाडी घ्यावी. जुन्या गाडय़ांमध्ये डिझेल इंजिनाचे काम जास्त निघते. त्यामुळे इंजिन नीट तपासून घ्यावे.
मला दोन ते अडीच लाखांपर्यंत सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. तुम्ही कोणती गाडी घेण्याचा सल्ला द्याल. कृपया मार्गदर्शन करावे.
– केतन अहिरे
तुम्ही सेकंड हँडमध्ये आय१० ही गाडी घ्या. ती उत्तम आणि दीर्घकाळ चालणारी गाडी आहे. तिचा मेन्टेनन्सही कमी आहे. सेडानमध्ये तुम्ही मारुती डिझायर पेट्रोल ही गाडी घ्यावी.
माझे बजेट सात लाख रुपये असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी घेण्याचा माझा विचार आहे. माझे मासिक रिनग सुमारे १२०० किमी आहे. सप्ताहाअखेरीसच यातील बहुतांश रिनग होते. कृपया मला गाडय़ांचे विविध पर्याय सांगा.
– मोहन निकम
तुम्ही डिझेल मॉडेलचाच जास्त विचार करावा. कारण तेच तुम्हाला परवडणारे आहे. मारुतीची इग्निस ही डिझेल प्रकारातील एकमेव अशी एएमटी गाडी आहे की जी तुमच्या बजेटमध्ये अगदी योग्यरीत्या बसते. हिचा मायलेज २४ किमी प्रतिलिटर आहे. शिवाय गाडी सर्वोत्तम आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com