माझ्याकडे स्विफ्ट डिझायर गाडी आहे. ती नवीनचं आहे. मला सीएनजी कीट बसवायचे आहे. बसवू शकतो का?. हो असल्यास कोणते बसवू आणि कुठे मिळेल हे सांगा. मी कल्याण येथे राहतो. सीएनजीमुळे इंजिन खराब होणार नाही ना याबाबत कृपया मार्गदर्शन करा.
– हेमंत केळकर
तुमचा वापर कमी आहे. सीएनजी लावल्यावर तुमचा वापर वाढणार असेल तर तुम्ही नक्कीच लोवॅटोचा सिक्वेनशियल कीट बसवू शकता. खूप फायदा होईल.
मला नवीन कार घेण्याची इच्छा आहे. गेल्या १० वर्षांपासून मी मारुती अल्टोचा वापर करीत आहे. माझी उंची ६ फूट असून, मला चांगली एसयूव्ही खरेदी करावयाची आहे. बजेट ७ ते ८ लाख या दरम्यान आहे. ब्रेझ्झा, टाटा नेक्सन, इकोस्पोर्ट, टीयूव्ही३०० यापैकी कोणती योग्य आहे, याबाबत मार्गदर्शन करा.
–गिरीश कुलकर्णी, परभणी.
या सर्वामध्ये जर तुमचा वापर जास्त असेल तर टाटा नेक्सॉन ही डिझेल इंजिनमध्ये उत्तम पर्याय राहील. अन्यथा कमी वापर असेल तर तुम्ही फोर्ड इकोस्पोर्ट घेऊ शकता.
माझे बजेट ८ ते ९ लाख रुपये आहे. आणि मी प्रथमच कार घेत आहे. माझा प्रवास अत्यंत कमी असून, फक्त चार लोकांच्या कुटुंबाकरिता कोणती कार घेऊ.
–डॉ. राजेंद्र उल्हमाळे, कल्याण.
तुम्ही फोर्ड इकोस्पार्ट पेट्रोल व्हर्जन घ्यावी. नुकतेच तिच्यामध्ये पेट्रोल इंजिन १.५ लिटरचे नवीन इंजिन बसवण्यात आले आहे. बाकीसुद्धा इतर सुधारणा केल्या आहेत. गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्सही उत्तम आहे.
मला पाच आसनी नवीन कार घ्यायची आहे. बजेट सात लाख आहे. टाटा नेक्सन ही गाडी कशी आहे. कृपया उत्तम गाडी सुचवा.
–अक्षय वाघमारे
तुम्ही टाटा नेक्सन ही गाडी घ्यावी. ती ६.८० लाखांमध्ये उपलब्ध असून, उत्तम एसयूव्हीप्रमाणे यामध्ये आरामदायीपणा आहे. दुसरा पर्याय म्हणून तुम्ही मारुती बलेनो घेऊ शकता.
मी एएमटी गाडी घेण्यासाठी इच्छुक आहे. वॅगनआर किंवा रेनॉल्ट क्विड यापैकी कोणती कार घ्यावी याबाबत मेळ होत नाही. मासिक प्रवास ३०० ते ३५० किमी असून, कृपया कोणती कार घेऊ याबाबत मार्गदर्शन करा.
–ललित सातविलकर
सध्या तरी उत्तम आणि विश्वसनीय अशी एएमटी मारुतीची आहे. तुम्ही सेलेरियो किंवा वॅगनआर एएमटीला प्राध्यान द्यावे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com