* मला माझ्या वडिलांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळी सात आसनी गाडी भेट घेऊन द्यायची आहे. मला कळत नाहीए की अर्टिगा घ्यावी की लॉजी. कृपया मला मार्गदर्शन करा.
– तेजस्विनी तायडे
* तुमच्या वडिलांचा गाडीवापराचा दरमहिन्याचा हिशेब जर एक हजार किमीपेक्षा कमी असेल तर मग अर्टिगा ही गाडी घेणे योग्य ठरेल. तेही पेट्रोल व्हर्जनमध्ये. मात्र, तुम्हाला ऑटोगीअर एसयूव्ही हवी असेल तर महिंद्राची टीयूव्ही३०० टी८ हे मॉडेल खूप छान आहे.
* माझा रोजचा अप-डाऊन प्रवास २०० किमीचा आहे. मला दणकट, सुरक्षित आणि चांगल्या मायलेजची कार हवी आहे. पेट्रोल की डिझेल कार घेऊ. माझे बजेट सहा ते सात लाख रुपये इतके आहे.
– डॉ. अरुण लाडे
* तुम्ही डिझेलवर चालणाही गाडीच घ्यावी आणि तेही फोर्डची फिगो हे मॉडेल घ्यावे. ही गाडी सर्वात ताकदवान आणि दणकट आहे. तुम्ही थोडे बजेट वाढवण्यास इच्छुक असाल तर फोक्सवॅगनची पोलो टीडीआय हाही एक उत्तम पर्याय मी सुचवू शकतो.
* सर, माझ्याकडे २०१३ची स्विफ्ट व्हीडीआय ही गाडी आहे; परंतु मला डाव्या पायाने सारखा सारखा क्लच दाबल्याने त्रास होत आहे. मला स्विफ्ट गाडी विकायची असून ऑटोगीअरमधील एखादी डिझेलवर चालणारी गाडी तुम्ही सुचवाल का.
– साहेबराव मोरे
* सध्याच्या काळात महिंद्राची टीयूव्ही३०० टी८ हीच उत्तम गाडी आहे. ही गाडी तुम्हाला दहा लाखांत मिळू शकेल; परंतु तुम्हाला सेडान कार हवी असेल तर स्विफ्ट डिझायर ऑटोमॅटिक डिझेल ही कार घ्यावी. दुसरा पर्याय नाही.
* मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझे बजेट साडेपाच ते साडेसहा लाख रुपये एवढे आहे. माझा गाडीचा दररोजचा वापर २० किमीपर्यंत असेल. दरमहा २०० किमी तर वर्षांतून तीन-चार वेळा असेल. मी टियागो, पोलो, ग्रँड आय१०, लिवा आणि बलेनो या पेट्रोलवर चालणाऱ्या गाडय़ा पाहिल्या. तुम्हीच सांगा कोणती योग्य ठरेल.
 संजय अहेर
* मी तुम्हाला फोक्सवॅगनची पोलो ही गाडी सुचवेन. सहा लाख रुपयांत ही गाडी उपलब्ध आहे. या गाडीचा मायलेज आणि पॉवर अगदी उत्कृष्ट आहे. या गाडीची आयुर्मर्यादाही इतर समकालीन गाडय़ांच्या तुलनेत जास्त आहे.
* मी व माझी पत्नी आम्ही दोघेही नोकरी करतो. आमचे रोजचे रनिंग ६० ते ७० किमी आहे. मला रोजच्या वापरासाठी डिझेलवर चालणारी गाडी घ्यायची आहे. मी महिंद्राची केयूव्ही१०० ही गाडी पाहिली आहे. या गाडीचा मी गांभीर्याने विचार करतो आहे. मला या गाडीविषयी माहिती द्या.
– अमोल काळे, केज
* डिझेलवर चालणारी उत्तम कार म्हणजे फोर्ड फिगो १.५ लिटर टीडीआय. या गाडीत तुम्हाला उत्तम मायलेज आणि उत्तम ताकदवान इंजिन या दोघांचाही मिलाफ आढळून येईल; परंतु तुम्हाला एसयूव्हीसारखी गाडी हवी असेल तर मात्र महिंद्रा केयूव्ही१०० ही गाडी चांगली आहे. मात्र, हिला पॉवर जरा कमी आहे.
* नमस्कार सर, मला शेतात व इतर कामांसाठी रोज १०० ते १५० किमी फिरावे लागते. मला त्यामुळे गाडी घ्यायची आहे. कमी मेन्टेनन्स आणि दणकट इंजिन असलेली गाडी कोणती. माझे बजेट दहा ते १२ लाख रुपये आहे.
– मनोज करडे, उस्मानाबाद
* तुम्ही महिंद्रा सीआरडीई थार ही गाडी घ्यावी. यात तुम्हाला एसी मॉडेलही मिळू शकेल. आणि मजबुती व मायलेज आणि पॉवर या सगळ्यांचा फायदा कमी किमतीत मिळू शकेल.
* मला गाडी शिकण्यासाठी घ्यायची आहे. माझे बजेट दोन लाख रुपये आहे. अल्टो किंवा वॅगन आर घ्यावी असे वाटते. मला सेकंड हॅण्ड गाडी घ्यावीशी वाटते. तुम्ही काय सुचवाल.
– नितीन गोरे, पुणे
* तुम्हाला गाडी शिकायचीच असेल तर सेकंड हॅण्ड गाडी घ्या, भरपूर फिरवा आणि तुमचा गाडी चालवण्याचा आत्मविश्वास वाढला की मग नवीन गाडी घ्या. तुम्ही अल्टो किंवा वॅगन आर या दोन्हींपैकी कोणतीही गाडी घ्या. शक्यतो अल्टो वॅगन आरपेक्षा कमी किमतीची आहे.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com
समीर ओक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा