दाराजवळच्या छोटय़ाशा गोल दांडय़ाने काचा खाली-वर करायच्या, समोरच्या कॅसेट प्लेअरमध्ये एखादी कॅसेट टाकून शांतपणे गाणी ऐकायची, स्टिअिरगला जोडलेल्या गिअरच्या दांडय़ाने गिअर बदलायचे.. या सगळ्या गोष्टी ऑटोमोबाइल क्षेत्रात आता इतिहासजमा होऊ लागल्या आहेत. मात्र आजही मुंबईच्या किंवा दिल्लीतल्या रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या टॅक्सीमध्ये हॅण्ड गिअर्स आढळतात किंवा एखादा कॅसेट प्लेअर चुकून दिसतो आणि गाडीतील ही हरवत चाललेली वैशिष्टय़े ठळकपणे समोर येतात. अशाच काही हरवत चाललेल्या वैशिष्टय़ांबद्दल..

सील केलेले गोल हेडलाइट्स
फियाट किंवा अ‍ॅम्बेसेडर गाडी आजही ज्यांचा दारी उभी असेल, त्यांना या फीचरबद्दल नव्याने सांगायची गरज नाही. एका स्टीलच्या रिंगने सील केलेले गोल हेडलाइट्स ही वर्षांनुवष्रे गाडय़ांच्या हेडलाइट्सची ओळख होती. दुसऱ्या महायुद्धापासूनच हे गोल हेडलाइट्स गाडय़ांतील एक महत्त्वाचे फीचर होते. भारतात ही ओळख कदाचित मारुती-८००ने पुसली असावी. कारण या गाडीचे हेडलाइट्स चांगले आयताकृती होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये फियाटला असलेले हे गोल हेडलाइट्स इतिहासजमा झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या हेडलाइटभोवतीची रिंग जरा कमी घट्ट झाली, तर त्यातून पाणी आत जायचे आणि लाइट लागल्यावर ते डुचमळताना दिसायचे. हेदेखील आता इतिहासजमा झाले आहे.

पुढे असलेली आडवी सीट
हेदेखील फियाट किंवा अ‍ॅम्बेसेडर गाडीचेच एक फीचर! जास्तीत जास्त प्रवासी गाडीत मावावेत, यासाठी मागील व पुढील सीट सारख्याच आकाराची होती. त्यामुळे मागच्या सीटप्रमाणे पुढेही बेंचसारखी सीट या गाडय़ांमध्ये असायची. याच कशाला, त्या वेळच्या अनेक महागडय़ा गाडय़ांमध्येही पुढील सीट अशी बेंचसारखीच होती. त्यामुळे पुढील बाजूला दोनऐवजी तीन माणसं बसायची. मात्र मधल्या माणसाची होणारी कुचंबणा आजही अनेकांना लक्षात असेल. दोन पायांमध्ये येणारा गिअरलिव्हर गिअर बदलताना कधी उजव्या, तर कधी डाव्या गुडघ्यावर आपटायचा. लहान मुलांसाठी मात्र ही सीट अगदीच आरामदायक होती, यात शंकाच नाही. छोटय़ातल्या छोटय़ा गाडीतही पुढे फक्त दोघांसाठीच जागा असते.

अँटेना
गाडीत रेडिओद्वारे गाडी ऐकण्याची सोय झाल्यापासून जुन्या गाडय़ांवर लागलेले हे लांबलचक अँटेना गाडीचाच एक भाग बनून गेले होते. गाडी चालू करताना तो अँटेना वर खेचून एएम किंवा एफएम चॅनेलचा सिग्नल पकडण्याची धडपड काहींना अजूनही आठवत असेल. मात्र आता हा अँटेना गाडीचाच एक अविभाज्य भाग बनून येतो. कधी समुद्राच्या पाण्यावर दिसणाऱ्या शार्कच्या शेपटासारखा तो असतो, तर कधी जुन्या काळ्या अँटेनाची आठवण करून देणारा! पण या अँटेनामुळेही गाडीला एक वेगळा लूक मिळतो.

हॅण्ड गिअर्स किंवा कॉलम शिफ्टर
स्टिअिरगला जोडलेला गिअर चेंज करण्याचा दांडा म्हणजेच कॉलम शिफ्टर किंवा साध्या बोली भाषेत हॅण्ड गिअर हा प्रकारही आजकालच्या गाडय़ांमध्ये पाहायला मिळत नाही. आजकाल गिअरच्या दांडय़ाऐवजी या ठिकाणी उजव्या-डाव्या बाजूचे सिग्नल देण्याची कळ, व्हायपर चालू-बंद करण्याची कळ आणि हेडलाइट्सचा प्रकाश कमी-जास्त करण्याची कळ असते. त्या काळी भारतात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर धावणाऱ्या गाडय़ा नसल्याने गिअर्स बदलण्याची हीच पद्धत रूढ होती. मात्र या पद्धतीमुळे मधल्या सीटवर बसणाऱ्या तिसऱ्या माणसाला खूपच आरामात बसता येत असे. मर्सििडझ बेन्झ या गाडीत आजही उजव्या बाजूला ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे हॅण्ड गिअर्स आहेत. ते दिसायलाही छान दिसतात. पण आजही एखाद्या म्हातारबुवाला असे गिअर्स असलेली गाडी दिसली की, तो गदगदल्याशिवाय राहत नाही.

पांढरी कड असलेले टायर्स
हीदेखील जुन्या गाडय़ांची एक खासियत होती. साधारणपणे टायर्स पूर्णपणे काळे असतात. पण जुन्या गाडय़ांमध्ये आकर्षक लूक देण्यासाठी अशी पांढरी कड असलेले टायर्स बनवले जात होते. त्यासाठी टायर्स तयार करताना त्यात िझक ऑक्साइड हे रसायन मिसळलं जात होतं. हे पांढरी कड असलेले टायर्स त्या वेळच्या फियाटपासून शेव्हरोले, मर्सििडझ अशा सगळ्याच गाडय़ांची शान होते. पण या िझक ऑक्साइडमुळे टायरची क्षमता कमी होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा हव्यास सोडून ऑटोमोबाइल जगताने पूर्ण काळ्या रंगाचे टायर्स स्वीकारले.
गेल्या २५ वर्षांत भारतात अनेक बदल झाले. अनेक जुने शब्द आणि गोष्टी जाऊन त्यांची जागा नव्यांनी घेतली. गेल्या पाच-सात वर्षांत तर हे बदल आणखी झपाटय़ाने होत आहेत. ऑटोमोबाइल क्षेत्रात तर हे बदल प्रकर्षांने जाणवत आहेत. अगदी २०-२२ वर्षांपूर्वीच्या भारतातील गाडय़ा, त्यांची फीचर्स, त्यांची मॉडेल्स, आकार आणि आत्ताच्या गाडय़ा यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तंत्रज्ञानातील बदलांनुसार हेही फीचर्स अधिकाधिक बदलत चालली आहेत. काही तर अगदी हरवून गेली आहेत.

चावी
चावी हा प्रकार फक्त बटण दाबण्यापुरताच शिल्लक राहिला आहे. एकेकाळी गाडीच्या चावीच्या आकारावरून त्या गाडीची महती पटत होती. मस्त चकचकीत चावी खिशातून काढून ती गाडीच्या दरवाज्याला लावायची आणि गाडी उघडायची, हा जमाना आता केव्हाच मागे पडत चालला आहे. आता हॅचबॅक आणि स्वस्त गाडय़ांमध्येही की लेस एण्ट्री हे फीचर मिळते. आता चावीने दार उघडणे हे काही गाडय़ांच्या बेसिक मॉडेलपुरतेच मर्यादित राहिले आहे. हा बदल चांगला असला, तरी ऑटोमोबाइल जगतातले एक फीचर इतिहासजमा झाले आहे.

क्रँक विण्डो
दरवाज्यावर दिलेली एक छोटीशी कळ फिरवून गाडीच्या काचा खाली-वर करण्याचं फिचर म्हणजे क्रँक विण्डो. आताच्या पॉवर स्टिअिरग आणि पॉवर विण्डोच्या जमान्यात हे फीचर फक्त लो बजेट गाडय़ा किंवा गाडय़ांच्या बेसिक मॉडेलपुरतंच मर्यादित आहे. पण येत्या वर्षांत तंत्रज्ञान विकसित होत जाईल, तसं क्रँक विण्डोचा नामशेष झाला असेल. खिडकीच्या काचा घट्टं झाल्यावर जोर लावून काच लावण्याचा प्रयत्न करा, असे प्रकार कमी झाले असून एक कळ दाबली की, काच आपोआप वर-खाली होण्याची सोय हाताशी आली आहे.

कॅसेट प्लेअर आणि रेडिओची कळ
टच स्क्रीनच्या जमान्यात कॅसेट प्लेअरची गाडी आता शोधून सापडणं मुश्कील आहे. पण एकेकाळी गाडीत कॅसेट प्लेअर असणं आणि त्या प्लेअरवर लावायला भरमसाट कॅसेट्स असणं, हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. लाँग ड्राइव्हला जायचं असेल, तर एखाद्या पेटीत कॅसेट्सचा साठा घ्यायचा, एखादं गाणं पुन्हा ऐकावंसं वाटलं आणि रिवाइंडचं बटण नसलं, तर पेन्सिलने कॅसेट रिवाइंड करायची, ही मजा आताच्या जमान्यात मिळणार नाही. आता छोटय़ाशा पेनड्राइव्हमध्ये अक्षरश: हजारो गाणी सामावलेली असतात. विशेष म्हणजे केवळ व्हॉइस कमाण्डद्वारे त्यातील हवं ते गाणं हव्या त्या वेळी तुम्ही ऐकू शकता. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच जुनी फीचर्स आऊटडेटेड ठरली. नव्या फीचर्सनी गाडी चालवण्याचा अनुभव अधिक सुखद आणि आरामदायक केला. त्यामुळे ही फीचर्स इतिहासजमा झाल्याबद्दल खंत बिलकुलच नाही. पण कधी तरी एखादा कॅसेट प्लेअर गाडीत पाहिल्यावर या फीचर्सची आठवण आल्याखेरीज राहात नाही.
– रोहन टिल्लू
rohan.tillu@expressindia.com

Story img Loader