डिसेंबर सुरू झाला की बहुतेक सर्वाना वेध लागतात ते नवीन वर्षांच्या स्वागताचे, संकल्पांचे. कारण नवे वर्ष हे नवी आशा, उमेद घेऊन येणारे असते. त्यामुळेच मनाचाही हुरूप वाढू लागलेला असतो. आपल्या आयुष्यात भौतिक सुखाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे अमुक एक गोष्ट आपल्याकडेही असावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. वाहन ही अशाचपैकी एक गोष्ट आहे. वाहनाला आता सुख म्हणायचे की काळाची गरज हा विषय वेगळा आहे. मात्र वाहन, मग ते दुचाकी असो वा चारचाकी, ते आपल्याकडे असावे, अशी प्रबळ इच्छा प्रत्येकालाच असते. वाहन आणि डिसेंबर यांचा संबंध काय? होय नक्कीच आहे, कारण याच महिन्यात वाहन उत्पादक कंपन्या विशेषत: चारचाकी उत्पादकांकडून अनेक सवलती जाहीर केल्या जातात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक वर्षांपासून जानेवारीमध्ये वाहनांच्या किमतीत उत्पादकांकडून वाढ होत आहे. पुढील वर्ष म्हणजे जानेवारी २०१८ मध्ये कारच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ करणार असल्याचे काही कंपन्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे साहजिकच मिळत असणारे डिस्काऊंट, कर्जावरील आकर्षक व्याजदर यांच्यामुळे कार घेण्याचा मोह नक्की होऊ  शकतो. कारवर डिस्काऊंट मिळते आहे म्हणून कार घ्यायची का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे; पण वाहन कंपन्या स्वत:ची इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी डिस्काऊंट जाहीर करीत असतात. काही वेळा डिस्काऊंट हे रोख स्वरूपात, तर काही वेळा अ‍ॅक्सेसरीज, एक्स्चेंज बोनस, लॉयल्टी बोनस अशा स्वरूपांमध्ये दिले जाते; पण याचा अर्थ असा नाही, की कोणतीही चौकशी न करता एखादी ऑफर स्वीकारायची. त्यामुळे कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी तिच्या संदर्भातील सर्व बाबी तपासून घेणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या बाजारातील परिस्थितीत ग्राहकाचा वरचष्मा असला, तरी पुढील काही गोष्टी जाणून घेतल्यास कार घेताना किमतीबाबतही चांगल्या वाटाघाटी आपल्याला करता येऊ  शकतात.

कारवर देण्यात येणाऱ्या ऑफर..

अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ, जीएसटी यांचा परिणाम वाहन कंपन्यांच्या विक्री कामगिरीवर झाला आहे. त्यामुळेच वाहन कंपन्यांनी गेल्या वर्षांच्या डिसेंबरच्या तुलनेत अधिक डिस्काऊंट दिले आहेत. या वर्षी डिसेंबरमध्ये कारवर पस्तीस हजार ते एक लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिले आहेत. मारुती सुझुकीच्या अल्टो ८०० ते अर्टिगा या कारवर लाभ देण्यात येत आहेत. प्रामुख्याने इन्व्हेंटरी म्हणजे कारचा साठा कमी करण्यासाठी हे डिस्काऊंट देण्यात आले असून, ४० हजार रुपयांपर्यंत ते आहेत. तसेच, उत्पादन खर्च वाढत असल्याने जानेवारीमध्ये कारच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. होंडा, टाटा मोटर्स, फोर्ड आणि महिंद्र अँड महिंद्र, ह्य़ुंदाई आणि फोक्सवॅगनच्या कारवर मोफत इन्शुरन्स, एक्स्चेंज ऑफर तसेच अन्य डिस्काऊंट दिले गेले आहे. मात्र, काही मॉडेल या डिस्काऊंटला अपवाद आहेत. होंडा सिटीवर कोणतेही डिस्काऊंट नाही. बहुतेक कंपन्यांनी कारवर आकर्षक लाभ दिले आहेत. त्यामुळेच कार खरेदीसाठी ही एक चांगली संधी आहे; पण डिस्काऊंटचा लाभ घेण्यासाठी सर्व बारकाव्यांचा विचार केल्यास डील नक्कीच लाभदायी ठरेल.  दुचाकी कंपन्यांकडून मोठय़ा ऑफर जाहीर झाल्या नसल्या तरी आकर्षक व्याजदर, कमी किमतीत इन्शुरन्स वा मोफत इन्शुरन्सच्या स्कीम डिसेंबरमध्ये दिल्या जात असतात. त्यामुळेच दुचाकी खरेदी करतानादेखील चौकशी करून खरेदी केल्यास खरेदीदाराचा फायदा होणार आहे, यात शंका नाही.

स्पेअर पार्ट आणि सव्‍‌र्हिस याकडे लक्ष द्या

आपल्याला कोणत्या प्रकारचे वाहन घ्यायचे आहे आणि बजेट किती आहे हे निश्चित करून घेणे आवश्यक आहे. हॅचबॅक, सेदान वा कॉम्पॅक्ट एसयूव्ही का एसयूव्ही या प्रकारांपैकी कोणते वाहन घ्यायचे? प्रत्येक सेगमेंटमध्ये इंधन प्रकारानुसार मॉडेल उपलब्ध आहेत. पेट्रोल, डिझेल वा पेट्रोल-सीएनजीवर धावणारी कार घ्यायची हेही निश्चित करायला हवे. पॉवर विंडो, म्युजिक सिस्टम यांच्यासाठी थोडी अधिक किंमत मोजावी लागली तरी चालेल; मात्र हायएंड व्हेरिएंट घ्यायचे किंवा अशा सुविधा नसलेले लो एंड व्हेरिएंट घ्यायचे? स्पेअर पार्टवर (सुटे भाग) होणारा खर्च आणि सव्‍‌र्हिस यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. यातून कोणत्या कारची निवड करायची हे निश्चित करण्यास मदत मिळेल.

अनपेक्षित खर्च टाळा

कारच्या किमतीच्या पन्नास टक्क्यांहून अधिक रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून भरण्याची तयारी असल्यास अधिक चांगले. डिस्काऊंट मिळण्यासाठी वाटाघाटी अधिक योग्य पद्धतीने करता येऊ  शकतात. तसेच, आपण घेत असलेल्या कार लोनवर प्रोसेसिंग फी किती आहे, कागदपत्रांसाठी किती पैसे लागणार आहेत, मुदतपूर्व कर्जफेड वा एकरकमी कर्जफेड करायची झाल्यास प्रीपेमेंट शुल्क किती भरावे लागेल, हेही कार घेण्यापूर्वी जाणून घ्यायला हवे. यामुळे अनपेक्षित खर्च टाळता येऊ  शकतात. तसेच, बँकेबरोबर चांगले, दीर्घकालीन नाते असल्यास आणि क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास व्याजदर कमी करण्यासाठी किंवा प्रोसेसिंग फी रद्द करण्यासाठी वाटाघाटी करा. यामुळे झाला तर आपलाच फायदा होऊ  शकतो. तसेच, कार घेताना अनेक एवढय़ा मूल्याच्या अ‍ॅक्सेसरीज मोफत असे प्रलोभन दिले जाते. प्रत्यक्षात खुल्या बाजारात अ‍ॅक्सेसरीजच्या किमती या शोरूममधील अ‍ॅक्सेसरीजच्या तुलनेत स्वस्त असू शकतात. (अनेकांचे तसे अनुभव आहेत.) त्यामुळेच खुल्या बाजारात कोणत्या अ‍ॅक्सेसरीज किती रुपयांना मिळतात, कोणत्या डीलरकडे काय ऑफर आहे, याची पूर्ण माहिती घ्यावी. यामुळे अधिकाधिक अ‍ॅक्सेसरीज कारबरोबर मिळविता येऊ शकतात.

मोठय़ा कारच्या विक्रीला चालना मिळण्यासाठी कार कंपन्या मोठे डिस्काऊंट ऑफर देतात. मात्र, अशा ऑफरच्या मोहात पडून खरेदी करण्याचा निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते. तुमच्या गरजा पूर्ण करणारी कारच घेण्याचा विचार करावा. महिन्याला कार किती चालविणार, पार्किंग जागा, किती मासिक हप्ता देता येऊ  शकतो आदीचा विचार करावा. मोठय़ा कारवर देखभाल खर्च अधिक असतो.

ls.driveit@gmail.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discount on vehicle purchase car purchase