आज आपण बाइकबद्दल बोलणार आहोत. मी कोणत्याही अमुक कंपनी अथवा तमुकच बाईकबद्दल नाही म्हणत. तर एकूणच दुचाकी बाजारपेठेबद्दल सांगतोय. जागतिक स्तरावर भारत ही या बाबतीत एक मोठी बाजारपेठ आहे. विक्रीबाबत इथे मोठय़ा स्वरूपात आकडय़ांची रेलचेल आहे. पण या क्षेत्रात तसे बदल फारसे झाले नाही. म्हणजे दुचाकी निर्मितीबाबत. तिच्या संशोधन, विकासाबाबत.
भारतातील पहिल्या देशी बनावटीच्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये काही बदल झाले. काही वर्षांपूर्वी यो बाइक ही संपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर/मोपेड म्हणून येथे सादर करण्यात आली. पण यानंतर या क्षेत्रांत फारशी नवी उत्पादने लक्षणीय अशी ठरली नाहीत.
पुण्याच्या टॉर्क मोटरसायकलने नुकतीच देशातील पहिली परिपूर्ण इलेक्ट्रिक मोटरसायकल गेल्याच आठवडय़ात टॉर्क टी६एक्स या नावाने बाजारात आणली. यात अनेक वैशिष्टय़ांचा अंतर्भाव आहे. एकदा का ही बाइक चार्ज केली की १०० किलो मीटपर्यंत धावू शकते. विद्यमान स्थितीत हा वेग चांगलाच म्हणावा लागेल. दिसायलाही ही बाइक चांगली वाटते.
एकदा का बाइक सुरू झाली की ६ किलो व्ॉट लिथियम आयोन्सच्या बॅटरीमधून २७ न्यूटॉन मीटर टर्क प्राप्त होतो. बाइकची बॅटरी पहिल्या तासाभरातच ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. आणि उर्वरित दुसऱ्या तासात.
ट्राओस प्रणालीवर ही बाइक चालते. कारमध्ये ज्याप्रमाणे ईसीयू असतं, ज्याद्वारे वाहनातील सर्व यंत्रणा, प्रवास यांची नोंद असते ते या बाइकमध्ये आहे. कारप्रमाणेच इको आणि स्पोर्ट अशा दोन्ही धर्तीवर चालविण्याचा फिल देणारी यंत्रणा यात आहे. हे केवळ एका बटनाद्वारे करता येतं. (टाटा मोटर्सने तिच्या बोल्ट या हॅचबॅक वाहनात हा प्रकार अंतर्भूत केला होता.)
४.३ स्क्रीनमध्ये जीपीएस, नेव्हिगेशन, मोबाइल सपोर्ट सिस्टीमही आहे. यावर तुम्ही मोबाइलही चार्ज करू शकता. हेल्मेट ठेवण्यासाठी पुरेशी जागा, चोरीच्या दृष्टीने संरक्षक उपाययोजनाही यात आहेत.
अर्थातच या बाइकमध्ये बॅटरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा तिच्याबद्दल अधिक बोलणं अपरिहार्य आहे. तर याबाबत तिचं आयुष्य १,००० पटीने अधिक आहे. ८०,००० ते १ लाख किलो मीटर अंतपर्यंत तिचा उपयोग होऊ शकतो. सध्या केवळ पुण्यातच उपलब्ध असलेली आणि लवकरच दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरांची प्रतीक्षा असलेल्या या बाइकची किंमत १.२५ लाख रुपये आहे.
प्रणव सोनोने – pranavsonone@gmail.com