नवी दिल्ली : टाटांच्या टियागो या हॅचबॅकच्या बुकिंगसाठी टाटा मोटर्स आणि कारअँडबाइक डॉट कॉम यांच्यात करार झाला आहे. कारअँडबाइक डॉट कॉमवर टियागोचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. टियागो घेण्यास इच्छुक असणारे कारप्रेमी या संकेतस्थळावर बुकिंग करू शकतील तसेच टियागोचा ब्रँड अॅम्बासिडर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला भेटण्याची संधीही ग्राहकांना मिळू शकणार आहे. या योजनेद्वारे आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे सहजसुलभ होणार असून ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून टियागोला उत्तम प्रतिसाद मिळू शकेल, असा विश्वास टाटा मोटर्सतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. कारअँडबाइक डॉट कॉम या संकेतस्थळावर नवीन तसेच युज्ड कार्स व बाइक्सची खरेदीविक्री केली जाते.
रॉयल एन्फिल्डची हिमालयन बाजारात
नवी दिल्ली : बुलेटप्रेमींमध्ये मानाचे स्थान असलेल्या रॉयल एन्फिल्डने हिमालयन ही ४११ सीसीची बाइक गुरुवारी बाजारात दाखल झाली. हिची ऑन रोड किंमत एक लाख ७३ हजार रुपये आहे. ग्रॅनाइट आणि स्नो अशा दोन रंगांत हिमालयन बाइक उपलब्ध असेल. मात्र, सध्या तरी ही बाइक फक्त दिल्लीतील रॉयल एन्फिल्डच्या शोरूम्समध्येच विक्रीसाठी उपलब्ध असेल. हिमालयातील खडतर रस्त्यांवरही उत्तमरित्या पळू शकेल, अशी या बाइकची रचना करण्यात आली असल्याने बाइकप्रेमींना हिमालयन नक्कीच आवडेल, असा आशावाद रॉयल एन्फिल्डचे अध्यक्ष रुद्रतेजसिंह यांनी व्यक्त केला आहे. पाच गीअरच्या हिमालयनचा ग्राऊंड क्लिअरन्स २१० मिमी आहे. नजीकच्या काळात २५० आणि ७५० सीसीमध्येही हिमालयन उपलब्ध असेल.