लांब सरळसोट, मागच्या बाजूच्या दरवाजावर जास्तीचे चाक दिलेले, कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर धावू शकणारी अशी फोर्ड एण्डेव्हर अगदी अलीकडच्या काळापर्यंत राजकारणी, बिल्डर, बॉलीवूडचे अभिनेते इत्यादींची लाडकी होती. मात्र टोयोटा फॉच्र्युनरने तिचे मार्केट खाल्ले आणि ही टिपिकल अमेरिकन एसयूव्ही स्पध्रेत मागे पडली. परंतु आता एण्डेव्हरने कात टाकली असून पुन्हा आपले स्थान निर्माण करण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

बॉक्सी डिझाइन असलेली आणि टेलगेटवर चाक असलेले फोर्ड एण्डेव्हरचे जुने रूप आता पालटले आहे. ती आता जास्त कमनीय आणि हल्लीच्या तिच्या स्पर्धकांना तोंड देण्यासाठी दणकट झाली आहे. नव्या एण्डेव्हरच्या टेलगेटवर जास्तीचे चाक (स्पेअर व्हील) तर आहे मात्र त्याला आता कव्हरचा साज चढवण्यात आला आहे. हिचा तोंडवळा अधिक टोकदार झाला आहे. परंतु या सर्व बदलानंतरही एण्डेव्हर अजूनही एका चौकोनी बोटीसारखीच भासते. परंतु दिमाख तोच पूर्वीसारखाच. स्टायलिश दिसण्यासाठी एण्डेव्हरच्या तोंडवळ्यात बदल करण्यात आला आहे. हिच्या पुढच्या बाजूला देण्यात आलेले ग्रील अधिक आकर्षक असून ते या टिपिकल अमेरिकन एसयूव्हीला जास्त सुंदर करतात. गाडीला असलेले हेडलॅम्प्स एलईडी असून दिवसा प्रवास करताना लागणारे प्रोजेक्टर बिम लाइटही आहेत. तसेच मोठमोठे फॉग लॅम्प्स हिचे रूप आणखीनच खुलवतात. स्लिम रूफ रेल्स आणि बॉनेटवरील मऊ क्रिझेस गाडीच्या कमनीयतेला अधिक शोभा देतात. एण्डेव्हरच्या दणकट रूपाला शोभणारे हिचे टायर आणि त्यांची उंची व कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर घट्ट पकड धरून ठेवणारी त्यांची ग्रिप अगदी लाजवाबच.
एण्डेव्हरच्या या बदललेल्या रूपाचे वर्णन इथेच समाप्त होत नाही. एण्डेव्हर एसयूव्ही असली तरी ती स्पोर्ट्सकार ठरावी या उद्देशाने तिची रचना करण्यात आलेलीच नाहीय. आत असलेली प्रशस्त जागा आणि प्रत्येक जागेचा केलेला सदुपयोग हा आपला समज अधिक दृढ करतो. तुम्ही फक्त गाडीत प्रवेश करायचा अवकाश, की तुम्हाला गाडीची भव्यता आणि एक नंबरची एसयूव्ही कशी असावी याचे मूíतमंत उदाहरण पेश होते.
गाडीत प्रवेश करून तुम्ही दार लावून घेतले की त्याच्या होणाऱ्या मोठय़ा आवाजाने तुम्हाला गाडीच्या ताकदीचा अंदाज येतो. ए पिलरवर देण्यात आलेले ग्रॅब हॅण्डलर गाडीच्या मजबुतीचे आणखी एक उदाहरण. चालकाचे सीट थोडे मोठे आहे त्यामुळे मोठय़ा आकाराची शरीरयष्टी असलेला गडीही आरामात या सीटवर बसून एसयूव्ही चालवू शकतो. तसेच सीट अ‍ॅडजस्ट करण्याची सुविधाही आहे. स्टीअिरग व्हीलही अ‍ॅडजस्टेबल आहे. सर्व सोयींनी युक्त असलेल्या एण्डेव्हरमध्ये चावीविना प्रवेश असेल, अशी माझी अपेक्षा होती. मात्र फोर्डने त्यांच्या नेहमीच्याच पारंपरिक चावीयुक्त इग्निशन स्टार्टची सुविधा नव्या एण्डेव्हरमध्येही कायम ठेवली आहे.
एण्डेव्हरचे केबिन एक इंटरेिस्टग गोष्ट आहे. सीट्सना देण्यात आलेले लेदर अपहोल्स्ट्री आणि आकर्षक डॅशबोर्ड यातून केबिनचा एक खास असा क्लास अधोरेखित होतो. मध्यवर्ती कन्सोलचे डिझाइन इकोस्पोर्टसारखे आकर्षक नाही, परंतु त्यात नीटनेटकेपणा आणि साधेपणा यांचा सुंदर मिलाफ असल्याचे लगेचच जाणवते. मला अपेक्षा होती की, टचस्क्रीन एन्फोटेनमेंटची सुविधा असल्याने गाडीच्या आतील भागात जास्त स्विचेस नसतील. अपेक्षा काही फोल ठरली नाही. परंतु नॉब्ज आणि स्विचेसचे डिझाइन एवढे सुंदर आहे की, त्याला स्पर्श केल्याखेरीज राहवत नाही. त्यांना लावलेल्या लेदरच्या वेष्टनामुळे स्पर्श मऊमुलायम वाटतो. डॅशबोर्डच्या खालच्या बाजूला आणि ग्रॅब हॅण्डल्सना वापरण्यात आलेले प्लास्टिक जरा रद्दड वाटते. हे झाले गाडीच्या केबिनचे वर्णन.
मागे सीट्सच्या दोन रांगा आहेत. दुसऱ्या रांगेत तीन माणसे आरामात बसू शकतील एवढी ऐसपस जागा आहे. त्यामुळे दुसऱ्या रांगेत बसणाऱ्यांना बऱ्यापकी लेगरूम मिळू शकते. मागे बसणारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांच्या गुडघ्यांना त्रास होणार नाही, अशा प्रकारेही जागा अ‍ॅडजस्ट करता येऊ शकते. आसनांची तिसरी रांगही काही वाईट नाही, परंतु मागच्या बाजूला बसणाऱ्या व गुडघेदुखीचा त्रास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिसऱ्या रांगेत बसणे त्रासाचे वाटू शकते. मागील दोन्ही रांगांना व्यवस्थित हवा मिळू शकेल, अशा प्रकारे एसी व्हेंट्सची रचना करण्यात आली आहे. दोन्ही रांगांच्या वरच्या बाजूला हे एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत.
गाडीत पुढील बाजूला ब्ल्यूटूथ टेलिफोनी आणि मल्टिफॉरमॅट ऑडिओ कम्पॅटिबिलिटी यांच्याव्यतिरिक्त इंटरनेट हॉटस्पॉट सुविधाही आहे. ते तुमच्या डेटा कार्डच्या किंवा तुमच्या फोनच्या डेटा नेटवर्कच्या साह्य़ाने वापरता येऊ शकते. स्पीडोमीटर मोठे असून त्यावर दोन डिजिटल डिस्प्ले पॅनल्स देण्यात आले आहेत. उजवीकडील पॅनल ट्रिप इन्फो आणि डिजिटल स्पीडोमीटर व टेकोमीटर दर्शवते तर डावीकडील पॅनलवर म्युझिक आणि फोन इन्फो डिस्प्ले होतो. यासाठीचे स्विचेस स्टीअिरग व्हीलवरही देण्यात आले आहेत.
गाडीतील सीट्सच्या तीनही रांगांना १२ व्होल्ट्सचे सॉकेट्स देण्यात आले आहेत आणि मधल्या रांगेत थ्री पिन प्लग आहे. तसेच ही एकमेव अशी एसयूव्ही असेल की ज्यात ऑटोमेटेड पाìकग असिस्टची सुविधा आहे. त्यामुळे गाडी पाìकग करताना तुम्हाला जास्त कष्ट नाही पडत.
गाडीच्या चाचणीदरम्यान एबीएस सिस्टीम उत्तमरीत्या काम करत होती. रस्ता खडबडीत असो वा काँक्रीटचा किंवा मग डांबरी असो गाडीला ब्रेक लावल्यास जिथल्या तिथे गाडी थांबते, असा अनुभव आला. तसेच टायरची रस्त्यावरची पकडही घट्ट आहे. त्यामुळे तुम्ही स्टीअिरगवरचे हात सोडून दिले तर गाडी रस्ता सोडून कुठे भरकटत नाही. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्सही भव्यदिव्य आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरून गाडी अगदी निर्धोकपणे चालवता येऊ शकते.

पॉवरट्रेन
नवी एण्डेव्हर दोन प्रकारच्या इंजिन पर्यायांत उपलब्ध आहे. एक म्हणजे ३.२ लिटर पाच सििलडर युनिटचे इंजिन आणि दुसरे म्हणजे २.२ लिटर चार सििलडर युनिटचे इंजिन. सिक्स स्पीड ऑटोमॅटिक आणि फोर बाय फोर ड्राइव्हट्रेन दोन्ही प्रकारच्या इंजिनांत उपलब्ध आहे. दोन्ही इंजिने आवाज करत नाहीत. गाडी तुम्ही स्टार्ट करून टॉप स्पीड पकडेपर्यंत दोन्ही इंजिने व्यवस्थित काम करतात. त्यांचा आवाज गाडीत बसलेल्यांना तरी जाणवत नाही. गाडी वेगाला चांगली आहे. तसेच पिकअपलाही सर्वोत्तम आहे. ऑटोमॅटिकबरोबरच मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येही नवी एण्डेव्हर उपलब्ध आहे. हिचा मायलेज नऊ ते ११ किमी प्रतिलिटर एवढा आहे.

स्पर्धा कोणाशी
टोयोटा फॉच्र्युनर, रेंज रोव्हर डिस्कव्हरी आणि एक्सयूव्ही५०० या गाडय़ांशी नव्या एण्डेव्हरची स्पर्धा आहे.

किंमत
२५ ते ३० लाख रुपये (वेगवेगळ्या मॉडेलच्या किमती यात समाविष्ट. तसेच किंमत एक्स शोरूम आहे).
समीर ओक -ls.driveit@gmail.com