ऑटो क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते त्या फोर्ड मोटर्सने आता भारतात आपले पाय अधिकाधिक घट्ट रोवायचे ठरवले आहे. त्यांच्या फिगो, फिगो अस्पायर, इकोस्पोर्ट या गाडय़ांना भारतात मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांचा हुरूप वाढला आहे. त्यामुळेच आता फोर्डने उच्चभ्रूंना भुरळ घालू शकेल, अशी मस्टँग भारतीय बाजारपेठेत आणली आहे. मस्टँग खरं तर फोर्डचं जुनं अपत्य. मात्र, त्यांनी भारतात ते कधी आणले नव्हते. परंतु वाढती बाजारपेठ आणि विस्ताराच्या नवनवीन संधी यामुळे फोर्डने आपलं हुकमाचं पान आता भारतीय वाहनबाजारात उतरवलं आहे. त्यामुळेच मस्टँगमध्ये खास भारतीय पद्धतीचे बदल करत फोर्डने ती सादर केली आहे.
तब्बल ५२ र्वष आणि पाच पिढय़ांनंतर (मस्टँगच्या) फोर्डने मस्टँगची पोनी कार भारतात आणली आहे. हॉलीवूड चित्रपटांत हमखास दिसणारी लांबलचक बोनेट आणि मागे फास्टबॅक रूफ असलेली मस्टँग आता भारतीय रस्त्यांवर धावताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. युरोप-अमेरिकेतील नियमांनुसार लेफ्ट हँड ड्रायिव्हग असलेली मस्टँग आता भारतीय अवतारात दिसेल. अशी मस्टँग चालवण्याचा अनुभव मला ग्रेटर नोएडा येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सíकट येथे मिळाला. येथील फास्ट ट्रॅकवर मस्टँग चालवण्याचा अनुभव अद्वितीयच होता. ट्रॅकवर अत्यंत वेगात पळणारी मस्टँग भारतीय रस्त्यांवर नेमकी कशी पळेल, हे मात्र सांगता येणे कठीण आहे.
अंतरंग
आरामदायी आसनांची रचना, रेट्रो लुक असलेली रंगसंगती आणि प्रशस्त जागा यामुळे मस्टँगमध्ये प्रवेश करताच तुम्हाला एक सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार असल्याची खात्री मिळते. गाडीच्या डॅशबोर्डवर सर्व गाडय़ांप्रमाणेच व्यवस्था आहे. इन्फोटेन्मेंटसाठी स्क्रीन आहे. शिवाय मोबाइल चाìजगसाठी पॉइंटर आहे. एॅक्सिलरोमीटर आहे. तसेच इंजिन स्टार्टसाठी पुश बटनही आहे. बाकी कपहोल्डर्स, एसी व्हेंट्स, एअरबॅग्ज या सुविधाही आहेतच.
चालवण्याचा अनुभव
मस्टँग एफ वन ट्रॅकवर चालवल्याने प्रत्यक्ष रस्त्यावर ही गाडी कशी चालेल हे सांगता येत नसले तरी मस्टँगचा ग्राउंड क्लिअरन्स लक्षात घेता आणि भारतीय रस्त्यांची अवस्था पाहता मस्टँगला केवळ एक्स्प्रेस वेवरच टॉप स्पीड गाठता येऊ शकेल, असे वाटते. बाकी एफ वन ट्रॅकवरील ड्रायिव्हगचा अनुभव शब्दातीत आहे. मस्टँगला विमानाशी स्पर्धा करायची आहे की काय, अशी शंका या गाडीचा वेग पाहता मनात डोकावून जाते.
स्टीअिरग आणि ब्रेकिंग
स्टीअिरग अर्थातच इलेक्ट्रिकली असिस्टेड आहे. त्यामुळे स्टीअिरग इतर लक्झरियस गाडय़ांसारखेच आहे. ते हाताळताना फारसे श्रम पडत नाहीत. गाडी वेगात असताना अचानक एखादे वळण आले (एफ१ ट्रॅकवर हा अनुभव जरा जास्त होता) आणि स्टीअिरगवर हलकासा दाब देऊन ते वळवले की पुढील आणि मागील चाके यांच्यातील समन्वय साधला जाऊन गाडी हलकेच वळण घेते. अर्थात ही प्रक्रिया सर्व गाडय़ांत सारखीच असली तरी मस्टँगमध्ये आरामदायीपणाचा अनुभव जास्त आला. मस्टँगला ब्रेम्डो ब्रेक्स देण्यात आले आहेत. गाडी कितीही स्पीडला असली तरी तुम्ही या ब्रेक्सचा वापर केला की ती जागच्या जागी थांबते असा अनुभव आला. कम्फर्ट, स्पोर्ट प्लस, बर्फाळ आणि ओलसर असे सर्व प्रकारचे ड्रायिव्हग मोड्स मस्टँगमध्ये उपलब्ध आहेत.
मायलेज
पाच लिटर क्षमतेचे व्ही८ इंजिन आणि त्याला डायरेक्ट फ्यूएल इंजेक्शन सिस्टीमची साथ, या दोन्हींच्या बळावर मस्टँगचा मायलेज न वाढता तरच नवल होते. हमरस्त्यावर मस्टँग नऊ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. एकंदर या गाडीचा आब आणि रुबाब पाहता नऊ किमी हा मायलेज चांगलाच म्हणावा लागेल.
इंजिन आणि गीअरबॉक्स
मस्टँगचे शक्तिस्थळ अर्थातच तिचे व्ही८ हे इंजिन आहे. भारतातील वातावरणात चपखल बसण्यासाठी या इंजिनात काही बदल करण्यात आले आहेत. कारण भारतातील पेट्रोल पंपांवर अतिशुद्ध स्वरूपाचे पेट्रोल मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे कमी दर्जाच्या पेट्रोलवरही इंजिनाने चांगले काम करावे आणि गाडी उत्तम चालावी या हेतूने मस्टँगच्या भारतीय आवृत्तीसाठी व्ही८ मध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. गाडी चालू केल्यानंतरच्या काही सेकंदांतच मस्टँग शून्य ते १०० किमी प्रतितास एवढा प्रचंड वेग गाठते. तसेच इंजिनाचा कोणताही आवाज येत नाही.
भारतातील मस्टँगसाठी सहा स्पीड सिलेक्ट शिफ्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली आहे. इतर देशांमध्ये मस्टँगला सहा मॅन्युअल गीअरबॉक्स देण्यात आलेले असतात. भारतातच वेगळी सुविधा का, याचे उत्तर म्हणजे फोर्ड इंडियाला मस्टँग ही ग्रँड टूरर म्हणून प्रस्थापित करायची आहे. लोकांनी तिच्याकडे स्पोर्ट्स कार म्हणून पाहू नये, यासाठीही फोर्डने ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गीअरबॉक्स दिले आहेत. तसेच भारतीय शहरांमध्ये सातत्याने होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊनही फोर्डने मस्टँग ऑटोमॅटिक ठेवण्यावरही भर दिला आहे.
फायदे
* प्रत्यक्षात चालवण्याचा अनुभव खूप छान.
* आकर्षक बारूप आणि तिचे रस्त्यावरील अस्तित्व मनात भरणारे आहे.
* गाडीच्या इंजिनाची ताकद वर्णनातीत आहे.
तोटे
* ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे.
* मायलेज तसे कमीच आहे.
किंमत
६५ लाखांपासून पुढे
सल्ला
तुमच्या बँक खात्यात ७५ लाखांची रक्कम सहज असेल तर तुम्ही ही गाडी नक्की घेऊ शकाल आणि अभिमानाने मिरवू शकाल.