उद्या, १ जुलैपासून देशभरात वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होत आहे. त्या निमित्ताने काय महाग होणार आणि कशाची स्वस्ताई अवतरणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. वाहन उद्योगही त्याला अपवाद नाही. त्यानिमित्ताने ‘जीएसटी’ पूर्व ऑफर्सच्या जाहिरातीही सध्या मोठय़ा प्रमाणात झळकत आहेत. ‘जीएसटी’ आल्यानंतर सर्व गाडय़ा महागच होणार आहेत, अशाच थाटाच्या या जाहिराती आहेत. त्यामुळेच गाडी आता घ्यावी की ‘जीएसटी’नंतर याबाबतही ग्राहकांमध्ये द्विधा मनस्थिती आहे. खरंच वस्तू व सेवाकर लागू झाल्यावर गाडय़ा महाग होणार आहेत का, की त्या आणखी स्वस्त होणार आहेत. कोणत्या सेगमेंटमधल्या गाडय़ा महाग होतील, कोणत्या नाही. बाइक स्वस्त होणार का, या शंकांचे निरसन करणारा हा लेख..
अर्थसंकल्प जवळ आला की, काय स्वस्त होणार, काय महाग होणार यासंबंधीच्या बातम्या झळकायला लागतात. मात्र, अर्थसंकल्प नसतानाही सध्या स्वस्त-महागची चर्चा सुरू आहे, ऐन पावसाळ्यात! घरात लागणाऱ्या जिन्नसांपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत कोणत्या वस्तू ‘जीएसटी’च्या जाळ्यात जातील आणि कोणत्या नाही, याविषयीही खमंग चर्चा सुरू आहेत. वाहनांच्या बाबतीतही तेच. दुचाकी, कार स्वस्त होणार की महाग याबाबत खरेदीदार अद्याप साशंक आहेत. वाहन उत्पादक मात्र कराबाबतच्या सुरुवातीच्या स्पष्टीकरणानेच धास्तावले आहेत. कारण कर वाढविण्यापेक्षा त्यावर लावलेल्या अधिभाराने त्यांचे कंबरडे मोडले आहे.
वाहन उत्पादकांसाठी एप्रिलप्रमाणेच जूनही भरभराटीचा जाणार आहे. प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर कंपन्यांची त्यांची बीएस३ वाहने एप्रिलमध्ये विक्रीला काढावी लागली होती. परिणामी त्या महिन्यात घसघशीत वाहन विक्री झाली. चालू महिन्याचेही तसेच आहे. जुलैपासून वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी होत असल्याने व परिणामी वाहनांच्या किमती वाढणार असल्याने कंपन्यांनी जूनमधील खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे. सध्या वाहनांवर मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्क, पायाभूत सेवा अधिभार, जकात, हरित अधिभार आदी कर आहेत. शिवाय हे कर राज्य-शहरनिहाय भिन्न असतात. वस्तू व सेवा करात एकाच कराचा समावेश आहे. आणि त्यातही अधिकाधिक वाहने ही सर्वोच्च अशा २८ टक्के गटात आहेत. शिवाय १ ते १५ टक्क्यांचा अधिभार सर्वच गटांतील वाहनांवर आहे. अपारंपरिक स्रोतावर धावणाऱ्या वाहनांनाही कराच्या वाढत्या जाळ्याच्या टप्प्यात आणून ठेवले आहे.
सर्व प्रकारच्या कारवर तर सर्वाधिक २८ टक्के कर लागणार आहे. मात्र त्यातही विविध इंजिन व आकार गटातील कारवर अधिभार निराळा असेल. तसेच अधिभारही १५ टक्क्यांपर्यंत वेगळा वेगळा असेल. ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या १.२ ते १.५ लिटर इंजिनच्या पेट्रोल व डिझेल कारवर सध्या २६ ते २८ टक्के कर आहे. तो वस्तू व सेवा करामुळे २८ टक्के होईल. आणि अधिभार अतिरिक्त असेल. म्हणजेच छोटय़ा कारकरिता आता अधिक पैसे मोजावे लागतील. ४ मीटरपेक्षा अधिक लांबीच्या मात्र १,५०० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिकच्या (सेदान) कारवर सध्या ३१ टक्क्यांपर्यंत कर जातो. तो आता ४३ टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये स्पोर्ट्स युटिलिटी प्रकारातील (एसयूव्ही) वाहनांना खरेदीदारांची वाढती पसंती होती. या वाहनाचा अनुभव कमी किमतीत वाहन खरेदी करणाऱ्यांनाही मिळावा म्हणून कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही नवी श्रेणी अवतरली. फोर्ड इकोस्पोर्ट, रेनो डस्टर यानंतर मारुती व्हिटारा ब्रेझा, ह्य़ुंदाई क्रेटा यांना अधिक प्रतिसाद लाभला. हा वाहन प्रकार वाढीव वस्तू व सेवा करानंतरही सकारात्मकतेचा लाभ उठवू शकतील. २८ टक्के कर टप्पा आणि १५ टक्के अधिभारानंतरही सध्याच्या ४८ टक्के करांच्या तुलनेत तो या गटासाठी कमीच असेल. परिणामी एसयूव्ही वाहने येत्या महिन्यापासून अधिक स्वस्त होणार आहेत. आकडय़ातच सांगायचे झाले तर टोयोटाची फॉच्र्युनर, फोर्डची एन्डेव्हर या मानाच्या समजल्या जाणाऱ्या एसयूव्ही एक लाख रुपयांपर्यंत तरी स्वस्त होतील.
दुचाकी गटात स्वस्त – महागबाबत संमिश्र वातावरण असेल. म्हणजे ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकी स्वस्त तर त्यापेक्षा वरच्या नाममात्र महाग होणार आहेत. महागाईचा फटका रॉयल एनफील्डच्या बुलेट वा तत्सम गटातील वाहनांना बसू शकतो. उलट गिअरलेस स्कूटर, मोटरसायकलकरिता कमी किंमत मोजावी लागेल. तीन चाकी, मध्यम आकारातील व्यापारी वाहनांवरील कारभार किरकोळ वाढणार आहे. मात्र १० आसनीपेक्षा अधिक क्षमतेच्या बस, बांधकाम क्षेत्राला लागणारी वाहने, शेती व्यवसायासाठी वापरली जाणारी वाहने मात्र सध्याच्या तुलनेत महाग होणार आहेत. आधी नोटाबंदी नंतर प्रदूषण चाचणी आणि नुकतीच बीएस३ अशा एकामागोमागच्या घडामोडींनी वाहन उद्योग स्थिर राहू शकला नाही. आता वस्तू व सेवा कर यंत्रणेतील करवाढीपेक्षा अधिभाराचा काय प्रतिसाद मिळतो, याची प्रतीक्षा या क्षेत्राला आहे. असे असले तरी भारतीय वाहन क्षेत्र नव्या उत्पादनांसह २०१८ मधील ऑटो एक्स्पोला सामोरे जाणार, हे निश्चित!
- रेनोची नवी क्विड सध्या २.६५ लाख रुपयांना पडत असेल तर वस्तू व कर मात्रेनंतर ती २.७१ लाखांपर्यंत जाईल. मारुतीची स्विफ्ट डिझायर १ जुलैनंतर घ्यायची झाल्यास ७.७६ लाख आणि वर २१ हजार रुपये मोजावे लागतील.
- मारुती, ह्य़ुंदाई, टाटा, टोयोटाच्या छोटय़ा कार घेण्यापेक्षा बीएमडब्ल्यू, ऑडी (अर्थात बजेट असेल तर) स्वस्त मिळणार आहेत! वस्तू व सेवा करप्रणालीत आलिशान गटातील मानल्या जाणाऱ्या या कारनाही २८ टक्के कराच्या टप्प्यात ठेवण्यात आले असले तरी त्यावरील अधिभार धरूनही त्या आता अधिक स्वस्तच होणार आहेत.
- सध्या बीएमडब्ल्यूची ३ सिरीजमधील किंवा ऑडी ए४ खरेदी केली तर त्यावर ४४.५ टक्क्यांपर्यंत कर बसतो. नव्या यंत्रणेत तो किंचितसा खाली येऊन ४३.५ टक्क्यांपर्यंत येईल. म्हणजेच या कार ५०,००० रुपयांपर्यंत स्वस्त होतील. ऑडी ए४ डिझेलची किंमत सध्या ४०.२० लाख रुपयांच्या घरात आहे.
- टोयोटाची फॉच्र्युनर, फोर्डची एन्डेव्हर या मानाच्या समजल्या जाणाऱ्या एसयूव्ही एक लाख रुपयांपर्यंत तरी स्वस्त होतील.
veerendra.talegaonkar@expressindia.com