एन्ट्री लेव्हलच्या हॅचबॅक प्रकारातील गाडय़ांमध्ये मारुतीच्या अल्टो  ८०० चे वर्चस्व निर्वविाद आहे. मात्र, तरीही अल्टोला टक्कर देण्यासाठी नवनवीन हॅचबॅक बाजारात येतच असतात. आता त्यात डॅटसनच्या रेडी-गो या ‘टॉलबॉय’ची भर पडली आहे. डॅटसनच्या गो आणि गो प्लस या अनुक्रमे हॅचबॅक व कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या पाश्र्वभूमीवर रेडी-गो या एन्ट्री लेव्हल हॅचबॅकचे आगमन झाले आहे. अल्टोला स्पर्धा करू शकेल, अशी वैशिष्टय़े नक्कीच आहेत या गाडीत..

प्रमुख वैशिष्टय़े..

  • वातानुकूलन यंत्रणा
  • सेंट्रल लॉकिंग
  • पॉवर स्टीअरिंग
  • पॉवर विण्डोज
  • रिमोट कंट्रोल्ड बूट

किंमत

  • मुंबई : अडीच ते साडेतीन लाख
  • पुणे : दोन लाख ६२ हजार ते तीन लाख ६६ हजार

(किमती एक्स शोरूम आहेत)

बाहय़रूप

गाडीचे बाहय़रूप पाहताक्षणी प्रेमात पडावे असेच आहे. हॉरिझोंटल ग्रिल आणि आकर्षक हेडलॅम्प्स यामुळे गाडीचा तोंडवळा आकर्षक झाला आहे. मागील लॅम्पची रचनाही त्रिमितीय पद्धतीने करण्यात आली आहे. लाइम, रुबी, पांढरा, चंदेरी आणि करडा या रंगांत रेडी-गो उपलब्ध आहे. ग्राऊंड क्लिअरन्समुळे गाडी थोडी उंच वाटते. त्यामुळे तिला टॉल बॉय म्हणूनही संबोधले जाते. गाडीचा पत्रा दणकट आहे. तसेच त्यावरील कव्‍‌र्हज् आणि कॅरेक्टर लाइन्समुळे गाडीच्या रूपात भरच पडते.

इंजिन आणि ट्रान्समिशन

डॅटसन रेडी-गोचे इंजिन ८०० सीसीचे आहे. पिकअप चांगला आहे. यात पाच स्पीड मॅन्युअल गीअर्स आहेत. इंजिनात इंटेलिजंट स्पार्क ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी (आयसॅट) वापरण्यात आल्याने हमरस्त्यावर गाडी वेगात धावताना रस्ता सोडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. गाडीची लांबी तीन हजार ४२९ मिमी, उंची १५४१ मिमी, तर रुंदी १५६० मिमी इतकी आहे. हिचा ग्राऊंड क्लिअरन्सही १८५ मिमी इतका आहे. रेडी-गोची तुलना करायचीच झाल्यास रेनॉ क्विडपेक्षा ही गाडी थोडी कमी लांबीची आहे.

अंतरंग

रेडी-गोमध्ये तुम्ही प्रवेश केलात, की तिची आतील प्रशस्तता लगेच लक्षात येते. रेडी-गोचे अंतरंग आटोपशीर आहे. डॅशबोर्ड साधा, सोपा आणि सुटसुटीत आहे. आसनांची रचना आरामदायी आहे. मात्र, मागील बाजूला बसणाऱ्यांच्या गुडघ्यांना त्रास होऊ शकतो. वातानुकूलन यंत्रणा चांगली आहे. मागेही एसी व्हेंट्स देण्यात आल्याने संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्हाला एसी सुरू ठेवता येऊ शकणार आहे. चालकाच्या आसनाची रचना आरामदायी आहे. त्यामुळे कितीही लांबचा प्रवास असला तरी त्याला शीण जाणवणार नाही, अशी तजवीज आहे. बाकी गाडीत कपहोल्डर्स, इन्फोटेनमेंट सिस्टीम वगरे जामानिमा आहेच. शिवाय लेगस्पेस आणि बूटस्पेसही चांगला आहे. चौघे जण आरामात प्रवास करू शकतील, अशी आसनांची रचना आहे.

ब्रेकिंग आणि सुरक्षा

रेडी-गोच्या टॉप एन्ड व्हेरिएन्टमध्ये चालकाच्या बाजूला एअरबॅग्जची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर गाडीला पुढील बाजूला डिस्क ब्रेक, तर मागील बाजूला ड्रम ब्रेक्सची सुविधा देण्यात आली आहे.

मायलेज

रेडी-गो प्रतिलिटर २५ किमीपर्यंत धावू शकते असा कारनिर्मात्यांचा दावा आहे. मात्र, त्यासाठी गाडी शहर आणि हमरस्ता अशा दोन्ही ठिकाणी चालवून पाहायला हवी, कारण प्रीमियम हॅचबॅकमध्ये अग्रणी असलेली अल्टो ८०० शहरात १८ किमी प्रतिलिटर, तर हमरस्त्यावर २० किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते, तर रेनॉ क्विड २५ किमी प्रतिलिटरचा वायदा करते. रेडी-गो ही तेवढाच मायलेज देत असेल तर अल्टो आणि क्विडसाठी हे आव्हानात्मक आहे. रोजच्या प्रवासात रेडी-गो नेमका किती मायलेज देऊ शकेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

गाडीचा परफॉर्मन्स

रेडी-गोचे फीचर्स चांगले आहेत. एन्ट्री लेव्हलला ही गाडी चांगली आहे. हे सर्व ठीक. मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर या गाडीचा परफॉर्मन्स कसा आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण रेडी-गोची स्पर्धा अखेर मारुती सुझुकीच्या सर्वात लोकप्रिय अशा अल्टो-८०० हिच्याशी आहे. रेडी-गोच्या टॉप मॉडेलमध्येच इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंग देण्यात आले आहे.

रेडी-गो का घ्यावी..

यंदाच्या वर्षांतली ही उत्तम अशी प्रिमियम हॅचबॅक आहे. त्यामुळे ही अल्टो, क्विड यांना चांगली स्पर्धा देईल. परंतु मेन्टेनन्सचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेडी-गो घेताना हा मुद्दाही विचारात घ्यावा लागेल. एरव्ही गाडी आतून-बाहेरून चांगली आहे. आरामदायी आहे आणि मुख्य म्हणजे लांबच्या प्रवासासाठी उत्तम आहे.

स्पर्धा कोणाशी..

  • अल्टो-८००,
  • ह्य़ुंदाई ईऑन,
  • रेनॉ क्विड