उन्हाळ्याची सुटी लागलीय, कुठेतरी फिरायला जावेसे वाटतेय..निळाशार समुद्र.. घनदाट जंगल असलेल्या ठिकाणी. चला गाडी काढा! पण.. आपला प्रवास सुखकर होण्यासाठी प्रवासादरम्यान काही काळजी न घेतल्यास संकटांना सामोरे जावे लागते. फिरायला जाते वेळी जेवनाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आपण करतोच. पण ज्या वाहनाने आपण जाणार आहोत त्याची काळजी घेतली का? गाडीचे टायर, हवा, इंजिन कुलंट, पाण्याची सोय, ब्रेक सिस्टिम आदींची तपासणी करणे आरामदायक आणि सुरक्षित प्रवासासाठी खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग ‘टूरवर’ निघायच्या आधी या सर्व बाबींची तयारी करूया..
सहलीचे नियोजन..पण नेटके..
कोठेही फिरायला जाताना सर्वात आधी तेथील प्रेक्षणीय स्थळं, त्यांच्यातील अंतर, प्रवासाला लागणारा वेळ आदींची माहिती घ्यावी. बहुतांश सुट्टीचा कालावधी कमी असल्यामुळे कमी वेळेत प्रवास आणि जास्त मजा, अशी टूर आखावी. जेणेकरून प्रवासाची दगदग न जाणवता मस्तपैकी सहलीचा आनंद लुटू शकतो. दिवसाला आठ तासांवर ड्रायव्हिंग नको.
भ्रमणध्वनी
कार्यालय, घर यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी भ्रमणध्वनी सोबत हवा. वाटेत एखादी दुर्घटना घडल्यासही याचा वापर करता येतो. याचसोबत पॉवर बँकही हवी.
साहित्य
सोबत मोजके साहित्यच न्यावे. प्रथमोपचार पेटी, पाणी, खाण्याचे पदार्थ आदी. जेणेकरून गाडीचे वजन जास्त होणार नाही. प्रतीमाणसी एक बॅग असावी.
बेबी ऑन बोर्ड
लहान मूल गाडीमध्ये असल्यास मागील खिडकीवर ‘बेबी ऑन बोर्ड’चा स्टिकर लावावा. जेणे करून मागून येणाऱ्या वाहनांना काळजी घेता येईल.
धोकादायक भाग
निर्जन रस्ता, जंगल याची पुरेपूर माहिती घ्यावी. घाटातून उतरताना किंवा सुनसान रस्त्यावरून जाताना दिवसाच जाण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी लुटालूट किंवा दुर्घटना होण्याचे प्रमाण जास्त असते. एखाद्या ठिकाणी जाताना दोन तीन मार्ग असतील तर त्यापैकी सुरक्षित वर्दळीच्या मार्गाची निवड करावी.
ड्रायव्हिंग वेळी मोबाइल टाळा
ड्रायव्हिंग करताना मोबाइलमध्ये संदेश पाठविणे, बोलणे असे प्रकार केले जातात. यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वाहन चालविताना सहकाऱ्यांसोबत ‘सेल्फी’ घेणे जीवघेणे ठरू शकते.
पाणी, खाण्याचे पदार्थ
प्रवासात शक्यतो बाहेरील पदार्थ, पाणी पिणे टाळावे. निघताना सोबत पुरेसे थंड पाणी, खायचे पदार्थ गरम राहण्यासाठी व्यवस्था करावी. वाहन चालविताना मद्यपान करू नये.
वाहनाची तपासणी
प्रवासाला निघते वेळी वाहनाची तपासणी खूप महत्त्वाची. टायरमधील हवेचा दाब हा ऋतूनुसार बदलतो. उन्हाळ्यामध्ये हवा प्रसारण पावत असल्यामुळे काहीशी कमी प्रमाणात हवा ठेवावी. वायपर चालतात का ते पहावे. यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंजिन. ऑइल, पाणी व कुलंट यांची पातळी योग्य आहे का ते पाहणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात इंजिन तापत असल्याने ही तपासणी महत्त्वाची. हॉर्न, लाइट, इंडिकेटर यांची तपासणीही करावी. याचबरोबर गाडीची कागदपत्रे, पीयूसी, इन्शुरन्स आदी जवळ बाळगावे. सोबत गाडीची दुसरी चावी बाळगावी.
नकाशा किंवा जीपीएस
सहलीच्या ठिकाणाचा नकाशा किंवा जीपीएस प्रणाली बाळगल्यास प्रवास करताना कोणतीही अडचण येत नाही.
रस्ते सुरक्षा नियमांचे पालन
सर्वच रस्ते चांगले असतीलचे असे नाही. अनेकदा मातीचे रस्तेही असतात. अशा वेळी वेग मर्यादा, सीटबेल्ट, मोटारसायकलवर असल्यास हेल्मेट, वळायचे किंवा लाइन बदलायची असल्यास इंडिकेटर देणे आदी साधे नियम पाळावेत. अशाने मोठय़ा दुर्घटनेतून आपण वाचू शकतो. दुसऱ्या वाहनचालकांचाही आदर करावा. त्यांना हूल देणे, डोळ्यावर लाइट मारणे आदी प्रकार करू नयेत.
प्रतिनिधी – ls.driveit@gmail.com