दुचाकी असो वा चार चाकी तिच्या निर्मिती क्षेत्रात – कंपन्यांमध्ये पडद्याआड काय घडते हे उलगडून दाखविणारे हे नवे सदर वाचकांसाठी. चालक-वाहन खरेदीदारांच्या आर्थिक, सामाजिक, मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या बाबींचा ऊहापोहही यात केला जाईल. त्याचबरोबर नवनव्या वाहनांमधील वैशिष्टय़पूर्ण अ‍ॅक्सेसरीजची ओळख व त्याची भारतीय वाहन क्षेत्र तसेच येथील रस्ते-वाहतूक व्यवस्थेबरोबरची सांगडही ‘न्युट्रल व्हय़ू’द्वारे दर आठवडय़ाला येथे घातली जाईल.
भारतातल्या माणसाची सरासरी उंची ६ फूट असावी. अशांसाठी एखादी बजेट कार म्हणजे त्यात घुसणं आणि त्यातून बाहेर पडणं म्हणजे द्राविडी प्राणायमच. आता बघा ना. माझी उंचीच ६ फूट ३ इंच. म्हणजे सरासरी भारतीयापेक्षा अधिकच. तेव्हा माझी काय हालत होत असेल! असो.
तर कार किंवा अन्य प्रवासी वाहने बनविताना कंपन्या हे कितपत लक्षात घेतात याबाबत शंकाच आहे. किंबहुना वाहनातील आसन रचना निश्चित करताना या वर्गाचा विचार करणं आवश्यक ठरतं. चालकाच्या कम्फर्टसाठीच नव्हे तर देशातील मोठय़ा संख्येने असलेल्या या गटाकरिता तरी. एसयूव्ही वाहनांमध्ये ही अडचण येत नाही. पण हल्लीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीदेखील याबाबत हॅचबॅक, स्मॉल कारचा कित्ता गिरवितात.
अनेक छोटय़ा कारमध्ये तर सीट हाइट अ‍ॅडजेस्टमेंटही नसते. अशा कारना अधिक उंची देता येत नाही कबूल. मात्र ही सुविधा तरी हवी. शिवाय त्यानुसार स्टेअिरग अ‍ॅडजेस्टमेंटही हवे. अर्थात हे सारे भारतात टॉप एण्ड मॉडेलमध्ये असते म्हणा. टेलिस्कोपिक स्टिअिरग देता येत नसेल तर टिल्ट स्टिअिरग तरी असावे. टेलिस्कोपिक स्टिअिरग जग्वारने १९४५ मध्येच उपलब्ध करून दिले. पुढच्या दोन दशकात तर ते अमेरिकेतील जवळपास सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिसू लागले. बरं. त्यासाठी त्यांना फार किंमत मोजावी लागली असेही नाही.
आज ५० वर्षांनंतरही बजेट कारमध्ये याबाबतची सोय नसणे हे तंत्रज्ञानाला काहीसे लाजविण्यासारखे आहे. एवढय़ा मोठय़ा कालावधीनंतरही ज्या कार उत्पादकांचे ध्येय पहिल्यांदा गाडी घेणारा ग्राहक मिळविण्याचे आहे तेदेखील या बाबींकडे दुर्लक्ष करतात. आधी म्हटल्याप्रमाणे टॉप एण्ड मॉडेलमध्येच सीट व स्टिअिरग अ‍ॅडजेस्टमेंट असते. बेसिक एन्ट्री लेव्हल कारमध्ये अनेकदा स्टिरिओ सिस्टीमही दिली जाते. मात्र या दोन गोष्टी नाहीत. कदाचित या दोन्ही गोष्टींकरिताही वाहन खरेदीदार हा मोठय़ा रकमेतील वाहनांकरिताच पसंती देत असावा. बडय़ा गाडय़ांमध्ये अशा अत्याधुनिक सुविधा देऊन कंपन्यांनाही अधिक नफा पदरात पाडून घेता येतो आणि जिथे चालकालाच कम्फर्ट नसेल तर त्याच्या वाहन चालविण्यातील आनंद आणि सुरक्षा यांचे काय? इतरांना त्याचा फारसा त्रास होत नाही. पण अधिक उंचीच्या व्यक्तीला ही अडचण मुख्य वाटते. हे सारे पाठीचा आणि गुडघ्याचा त्रास वाढण्यासही कारणीभूत ठरतात.
असेच काहीसे एअरबॅगबाबतही. जीवनरक्षक ही सुविधा भारतातील स्टॅण्डर्ड कारमध्येही सापडत नाही. असे केल्याने कार उत्पादकांची ३० हजार रुपयांपर्यंत बचत होते खरी. पण जेव्हा आयुष्याचा प्रश्न येतो तेव्हा खरेदीदारही एवढय़ा रकमेकरिता मागे-पुढे पाहत असेल, असे पटत नाही. फोक्सव्ॉगन, स्कोडासारख्या काही कंपन्या तिच्या स्टॅण्डर्ड व्हर्जनच्या मॉडेलमध्ये एअरबॅग देतात. त्यामुळे त्यांची किंमत ही स्पर्धकांच्या तुलनेत वाढते, मात्र सुरक्षेला ते अधिक महत्त्व देतात, असे दिसते. टोयोटानेही नुकतेच असेच काहीसे पाऊल टाकले आहे. ऑप्शनल फीचर म्हणूनही अनेक कंपन्या असे करीत नाहीत. भविष्यात एअरबॅग अनिवार्य होणारच आहेत म्हणतात. पण तत्पूर्वी सर्व कार उत्पादकांनी एकत्र येऊन त्याबाबत स्वत:वर बंधन घालून घ्यायला हरकत नाही. जिथे तासाला १६ मृत्यू हे अपघाती मृत्यू ठरतात तिथे तर हे आवश्यक नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रणव सोनोने
pranavsonone@gmail.com

प्रणव सोनोने
pranavsonone@gmail.com