मला दररोज १०० किमी प्रवास करावा लागतो. मला गाडी घ्यायची आहे. डिझेलवर चालणारी घेऊ की एलपीजी. स्मॉल कारमध्ये चांगली गाडी कोणती आहे. कृपया मार्गदर्शन करा.

संतोष टाकळे

एवढे जास्त रनिंग असेल तर लहान गाडी घेऊ नका. तुम्ही मारुती स्विफ्ट डिझेल कार घ्यावी. थोडे बजेट वाढवले तर डिझेल अ‍ॅमिओ हा पर्याय चांगला ठरेल. एलपीजी वगैरे गाडी घेऊच नका.

मला नवीन गाडी घ्यायची आहे. टाटा टियागो आणि व्ॉगन आर यांपैकी कोणती गाडी चांगली आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग किमान ६०० किमी होते. लो मेन्टेनन्स आणि उत्तम मायलेज असणारी गाडी मला हवी आहे. कोणती गाडी माझ्यासाठी योग्य ठरेल.

प्रतीक कोमहिरे

तुम्ही डॅटसन गो ही गाडी घ्या. ती तुम्हाला उत्तम पॉवर आणि मायलेज देते शिवाय हिचा मेन्टेनन्सही खूप कमी आहे. तिच्यात स्पेसही खूप चांगली आहे. परंतु तुम्हाला तेवढय़ाच किमतीत एखाद्या डीलरकडे मारुती रिट्झ मिळत असेल तर अवश्य घ्या.

माझा रोजचा प्रवास ६० किमीचा आहे. मला बलेनो किंवा स्विफ्ट डिझायर यांपैकी एखादी गाडी योग्य वाटते. कोणती गाडी सर्वोत्तम आहे. कृपया सांगा. माझे बजेट साडेसात ते आठ लाख रुपये आहे.

डॉ. कैलास सानप

तुम्ही जर शहरातल्या ट्रॅफिकमधून प्रवास करत असाल तर तुम्ही बलेनो अ‍ॅटोमॅटिक गाडी घ्यावी. परंतु तुम्ही जर हायवेला गाडी चालवत असाल तर मी तुम्हाला फोक्सव्ॉगन अ‍ॅमियो डिझेल ही गाडी सुचवेन.

नव्यानेच लाँच झालेली मारुती इग्निस या गाडीविषयी जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे. माझ्याकडे सध्या मारुती ८०० आहे आणि मला नवीन गाडी घ्यायची असली तरी मारुतीचीच घ्यायची आहे.  माझे मासिक ड्रायव्हिंग १०० किमी आहे. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. माझ्या कुटुंबात पाच जण आहेत. कृपया चांगली गाडी सुचवा.

नील जोशी

मारुती सुझुकी इग्निस ही रिट्झपेक्षा छोटी गाडी आहे. बाकी काही त्यात वेगळेपण नाही. तुम्हाला रिट्झ मिळाली तर उत्तम अन्यथा इग्निस उत्तम गाडी आहे.

माझे बजेट सहा लाखांचे आहे. मला डिझेल गाडी घ्यायची असून गावी जाण्यासाठी तिचा जास्त वापर होणार आहे. मी टाटा टियागो ही गाडी घेऊ का. नसेल तर कोणती घेऊ. महिन्याला एक हजार किमी ड्रायव्हिंग होते.

प्रमोद तुपे, औरंगाबाद

तुमचे ड्रायव्हिंग जास्त आहे. तर तुम्ही पेट्रोल गाडी घ्यावी. तुम्ही महिंद्रा केयूव्ही१०० ही गाडी घ्या. ती तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com